जीवविज्ञान विषयातील ही एक शाखा असून या शाखेत प्राणिसृष्टीचा सांगोपांग अभ्यास केला जातो. प्राणिविज्ञान ज्ञानशाखेत अस्तित्वात असलेल्या तसेच विलुप्त झालेल्या प्राण्यांची संरचना, भ्रूणविज्ञान, उत्क्रांती, वर्गीकरण, प्राण्यांच्या सवयी, वितरण आणि परिसंस्थांबरोबर होणारी त्यांची आंतरक्रिया अशा बाबींचा अभ्यास होतो.

प्राणिविज्ञानाचा इतिहास पहिला तर प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत प्राणिसृष्टीच्या अभ्यासाच्या खुणा आढळतात. पूर्वेतिहासिक काळात मानव इतर प्राण्यांकडे केवळ शिकारीच्या नजरेतून पाहत होता. मात्र मानवाचा सांस्कृतिक विकास झाला आणि प्राणी आपल्यासारखेच एक सजीव आहेत याची कल्पना मानवाला झाली. प्राण्यांना सांभाळ करीत असताना मानवाला प्राण्यांची पद्धतशीर आणि खास काळजी घ्यावी लागली. शहरीकरणानंतर प्राणिज उत्पादितांची सतत व मोठी गरज भासल्यामुळे मानवाची ती निकडच झाली.

भारतात इ.स.पू. १०—६ व्या शतकापर्यंतच्या काळात दुधासाठी गायी-म्हशी पाळणे, दळणवळणासाठी घोडे सांभाळणे इ.मुळे प्राण्यांचा अप्रत्यक्ष अभ्यास होत होता. प्राचीन भारतात वैद्यक शिक्षणाची सुरुवात धन्वंतरी, सुश्रुत, अत्रेय आणि चरक या वैद्यांनी केली. मात्र प्राणिविज्ञानाच्या अभ्यासाचा पाया खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य देशांत घातला गेला. इ.स.पू. ३०० काळात ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल, थीओफ्रॅस्टस आणि गालेन यांनी प्राणिविज्ञानाची सुरुवात केली. पुढे मध्ययुगात मुस्लिम आणि कॅथलिक अभ्यासकांनी ते पुढे नेले. युरोपातील प्रबोधनयुगामध्ये व्हेसॅलियस आणि विल्यम हार्वे यांनी प्राणिविज्ञानाला काळजीपूर्वक निरीक्षणाची आणि प्रयोगाची जोड दिली.

सतराव्या शतकात रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला, तर एकोणिसाव्या शतकात टेओडर श्व्हान, मातीआस याकोप श्लायडेन आणि रूडॉल्फ विरशॉ यांनी पेशी सिद्धान्त मांडला. लेव्हेनहूक यांनी सूक्ष्मदर्शीचा शोध लावून त्याद्वारे पेशी आणि सूक्ष्मजीवांचा अभ्यास सुरू केला होता. लूई पाश्चर यांनी एकोणिसाव्या शतकात तो अभ्यास पुढे नेला. अठराव्या शतकात कार्ल लिनीअसने सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धत सुरू केली. झॉर्झ क्यूव्हे यांनी पुराजीवविज्ञानाचा पाया घातला. एकोणिसाव्या शतकात डार्विन, लामार्क आणि द व्ह्‌रीस यांनी उत्क्रांतीचा अभ्यास केला. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी हाइन्रिख व्हॉल्तेअर, सटन, बोव्हेरी यांनी गुणसूत्रांचा आणि आनुवंशिकतेचा सिद्धान्त मांडला. विसाव्या शतकाच्या मध्यावर वॉटसन आणि क्रिक यांनी न्युक्लिइक आम्लांची संरचना सांगितली. बर्ग आणि लिंडी यांनी जनुकीय अभियांत्रिकी शाखेची निर्मिती केली. विसाव्या शतकाच्या शेवटी थॉमस किंग, रॉबर्ट ब्रिजेस, ईथन विलमुट यांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून डॉली या कृत्तक (क्लोन) मेंढीची निर्मिती केली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निरनिराळ्या आणि नवनवीन उपकरणांचा शोध लागल्यामुळे प्राणिविज्ञानाच्या संरचना, शरीरक्रिया, उत्क्रांती, वर्गीकरण, वर्तनशास्त्र इ. क्षेत्रांत मोलाचे संशोधन झाले.

संरचना : पेशींची संरचना आणि शरीरक्रियात्मक गुणधर्मांचा अभ्यास (वर्तन, आंतरक्रिया आणि पर्यावरण यांसह) पेशी जीवविज्ञानात केला जातो. हा अभ्यास जीवाणूंसारख्या एकपेशीय सजीवांपासून मानवासारख्या बहुपेशीय सजीवांपर्यंत सूक्ष्म आणि रेणवीय अशा दोन्ही पातळीवर होतो. सर्व जैविक विज्ञानांच्या अभ्यासात पेशींची संरचना आणि कार्य समजून घेणे, हे मूलभूत उद्दिष्ट असते. रेणवीय जीवविज्ञानात (मॉलिक्युलर बायलॉजी) पेशींच्या प्रकारातील साम्य-भेद महत्त्वाचा असतो. शरीररचनाविज्ञानात प्राण्यांच्या दृष्टिगोचर संरचनांचा, जसे इंद्रिय आणि इंद्रिय संस्था यांचा अभ्यास करतात. मानवाच्या तसेच प्राण्यांच्या शरीरात इंद्रिये आणि इंद्रिय संस्था संयुक्तपणे कसे कार्य करतात आणि इंद्रियांचे कार्य स्वतंत्रपणे कसे चालते, यांसंबंधी अभ्यास केला जातो. शरीररचनाशास्र आणि पेशीविज्ञान या दोन विषयांचा एकमेकांशी दृढ संबंध आहे.

शरीरक्रिया : या क्षेत्रात सजीवांच्या शारीरिक, यांत्रिक आणि जैवरासायनिक प्रक्रियांचा अभ्यास होत असून संरचनांचे कार्य एकत्रितपणे कसे चालते, हे समजून घेतात. पारंपरिक पद्धतीत शरीरक्रियात्मक विज्ञान हे वनस्पती  शरीरक्रिया आणि प्राणी शरीरक्रिया असे दोन भागात विभागले जाते. परंतु शरीरक्रियेची काही तत्त्वे सार्वत्रिक असतात. जसे, किण्व पेशीच्या काही शरीरक्रिया मानवी पेशींनाही लागू पडतात. चेतासंस्था, प्रतिक्षम संस्था, श्वसन संस्था, अंत:स्रावी संस्था आणि रक्ताभिसरण संस्था इ. संस्थांचे कार्य कसे होते आणि त्यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो, याचा अभ्यास शरीरक्रियाविज्ञानात होतो.

उत्क्रांती : या संशोधनात एखाद्या जातीचे मूळ व ती कशी उत्क्रांत झाली, याची माहिती मिळवितात. तसेच काळानुरूप त्या जातीमध्ये घडून आलेले बदल अभ्यासतात. या क्षेत्रातील वैज्ञानिक पक्षिविज्ञान, कीटकविज्ञान, सस्तन प्राणिविज्ञान इ. विषयांत पारंगत असले, तरी वैज्ञानिक या सजीवांकडे एक संस्था म्हणून पाहतात आणि अशा अभ्यासातून उत्क्रांतीविषयक सामान्य प्रश्नांची उत्तरे शोधतात. उत्क्रांतीविषयक जीवविज्ञान पुराजीवविज्ञानावर आधारित असल्याने या विषयाच्या अभ्यासासाठी जीवाश्मांचा वापर करतात. तसेच हा विषय काही प्रमाणात समष्टि आनुवंशिकी आणि उत्क्रांती सिद्धान्त यांवर अवलंबून असतो. जसे, विसाव्या शतकात डीएनए अंगुलीमुद्रण तंत्र विकसित झाल्यामुळे प्राण्यांची समष्टि समजून घेण्यासाठी या तंत्राचा वापर होत आहे.

वर्गीकरण : जीववैज्ञानिकांनी प्रजाती किंवा जाती यानुसार सजीवांचे गट केले आहेत. गट पाडण्याच्या या शास्त्रीय पद्धतीला वर्गीकरण म्हणतात. कार्ल लिनीअसने समान भौतिक गुणधर्म असलेल्या जातींचे गट केले. त्यावर आधुनिक जीवविज्ञानाच्या वर्गीकरणाची मुळे रूजलेली आहेत असे म्हणता येईल. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार हे वर्गीकरण सुसंगत असावे, या उद्देशाने या गटांचे पुनर्परीक्षण करण्यात आले.

कुमार विश्वकोशात सजीवांच्या मोनेरासृष्टी, प्रोटिस्टासृष्टी, फंजायसृष्टी, वनस्पतिसृष्टी आणि प्राणिसृष्टी अशा पंचसृष्टी वर्गीकरणाचा अवलंब केला आहे. यापुढे, प्रत्येक सृष्टीचे क्रमाक्रमाने उपविभाग केले जातात, या क्रमाचा शेवटचा टप्पा स्वतंत्र जातीचा असतो. हा क्रम सामान्यपणे सृष्टी, संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती, जाती असा असतो.

वर्तनशास्र : नैसर्गिक परिस्थितीत प्राणी कसे वागतात, याचा वस्तुनिष्ठ आणि शास्रशुद्ध अभ्यास वर्तनशास्रात केला जातो. केवळ प्राण्यांमध्ये चेतासंस्था असते आणि त्याचा परिणाम भावना (संवेदना/जाणीव), समन्वयन, दिशादर्शन (शिकणे आणि स्मृती) या बाबींवर होत असतो. या क्षेत्रात संशोधन करणारे वैज्ञानिक नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताच्या आधारे प्राण्यांचे वर्तन कसे असते, त्यात बदल कसे होतात याचे निरीक्षण करतात. चार्ल्स डार्विन याला पहिला आधुनिक वर्तनशास्रज्ञ म्हणता येईल.

प्राणिविज्ञानाच्या अभ्यासाच्या पुढील उपशाखा आहेत; वर्गीकरणविज्ञान, बाह्यशरीररचनाविज्ञान, अंत:शरीररचनाविज्ञान, तौलनिक इंद्रियविज्ञान, ऊतीविज्ञान, पेशीविज्ञान, शरीरक्रियाविज्ञान, परजीवीविज्ञान, जीवविकासविज्ञान, अंत:स्रावी ग्रंथीविज्ञान, पुराप्राणिविज्ञान, विकृतीविज्ञान, कीटकविज्ञान, शिंपलेविज्ञान, मत्स्यविज्ञान, सरीसृपविज्ञान, पक्षिविज्ञान, सस्तन प्राणिविज्ञान, पशुपालनविज्ञान, कुक्कुटपालनविज्ञान, मधुमक्षिकाविज्ञान, रेशीमकीटक विज्ञान, प्राणिवर्तन विज्ञान, आनुवंशिकीविज्ञान इत्यादी शाखांच्या नावावरून त्यांच्या अभ्यासाचे विषय स्पष्ट होतात. याचबरोबर सध्याच्या काळात रेणवीय जीवविज्ञान, संवर्धन जीवविज्ञान, प्राणी जैवतंत्रविज्ञान अशा उपशाखा विकसित झाल्या आहेत.

प्रयोगशाळेत प्राणिविज्ञानाचा अभ्यास प्राण्यांचे टिकाऊ स्वरूपात जतन केलेले नमुने पाहून, प्राण्यांचे विच्छेदन करून, सूक्ष्मछेद घेऊन, कायमस्वरूपी काचपट्टिकांचा अभ्यास करून तसेच प्राण्यांची चित्रे, छायाचित्रे व पारदर्शिका पाहून करतात. प्राण्यांच्या अभ्यासासाठी जलजीवालय, प्राणिसंग्रहालये, प्राणिउद्याने, नदी, तलाव, समुद्रकिनारे यांना अभ्यास भेटी आयोजित करतात. स्थलांतरीत प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या विशिष्ट अधिवासाला भेटी  दिल्या जातात.

महाराष्ट्र राज्यात माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमात प्राणिविज्ञानाचा समावेश विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये केला आहे. उच्च-माध्यमिक स्तराच्या अभ्यासक्रमात प्राणिविज्ञानाचा समावेश जीवविज्ञानात केला आहे. पदवीस्तरावर प्राणिविज्ञान हा स्वतंत्र विषय अभ्यासता येतो. पदव्युत्तर पदवीसाठी देखील प्राणिविज्ञान हा स्वतंत्र विषय निवडता येतो. प्राणिविज्ञानात संशोधनाच्या अनेक संधी असून या विषयात एम्‌.एस्‌सी., एम्‌.फिल्‌, पीएच्‌.डी. अशी पदवी मिळविता येते. महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक महाविद्यालयांत आणि विद्यापीठांत या पदव्यांसाठी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा