मेहता, विजया : (४ नोव्हेंबर १९३४ ). सुप्रसिद्ध नाट्य व चित्रपट दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्यप्रशिक्षक. पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत. त्या नाट्यक्षेत्रात ‘बाई’ या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात दत्तात्रेय व भुराबाई या दांपत्यापोटी बडोदा (गुजरात) येथे झाला. वडील दत्तात्रेय जयवंत हे थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये कार्यरत होते. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केल्यानंतर दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून (National School of Drama) त्यांनी नाट्यप्रशिक्षक इब्राहिम अल्काझी व मर्झबान यांच्याकडून नाट्यप्रशिक्षण घेतले; परंतु तत्पूर्वी त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यशाखेतून अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली होती. शिवाय त्या १९५१ पासून भारतीय विद्याभवनातील नाटकांतून अभिनय करीत असत. ऑथेल्लो  नाटकाचे मराठी रूपांतर झुंजारराव (१९५३) या नाटकातील ‘कमळजे’च्या भूमिकेपासून विजया मेहतांचा मुंबई मराठी साहित्य संघासोबतचा प्रवास सुरू झाला. साहित्य संघाच्या नाटकांतून त्यांनी प्रामुख्याने अभिनेत्री म्हणून संशयकल्लोळ (भूमिका : कृत्तिका, १९५५), तुझे आहे तुजपाशी (भूमिका : उषा, १९५६), सुंदर मी होणार (भूमिका: दीदीराजे आणि मेनका, १९६० ते १९६२ ) या नाटकांतून काम केले. विजया मेहता १९६० च्या दशकातील मराठी रंगभूमीच्या चेहरा होत्या. त्यांनी नाटककार विजय तेंडुलकर, दिग्दर्शक-अभिनेते अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत मुंबईत ‘रंगायन’ या संस्थेची स्थापना केली (१९६०). रंगायनतर्फे त्यांनी मॅक्झिम गॉर्की लिखित आणि माधव मनोहर अनुवादित मदर आई (१९६१), गो. नी. दांडेकर लिखित शितू (१९६१), आयनेस्को लिखित आणि वृंदावन दंडवते अनुवादित खुर्च्या (१९६२), विजय तेंडुलकर लिखित मादी (१९६२) आणि मी जिंकलो, मी हरलो  (१९६३), श्री. ना. पेंडसे लिखित यशोदा (१९६३), चिं. त्र्यं. खानोलकर लिखित एक शून्य बाजीराव (१९६६), बट्रोल्ट ब्रेख्त लिखित आणि व्यंकटेश माडगूळकर अनुवादित देवाजीने करुणा केली (१९७२) आदी विविध आशय-विषयांची आणि शैलींची नाटके केली. त्यामुळे ‘रंगायन’ केवळ संस्था न राहता अर्थपूर्ण नाटके सादर करणारी प्रयोगशील चळवळ झाली. या नाट्यप्रयोगांमधील विषय, आशय व प्रयोगतंत्रे भिन्नभन्न कारणाने लक्षवेधी ठरले. नाट्यविष्कार करताना प्रेक्षकांची अभिरूची घडवावी, यासाठी अनेक उपक्रम संस्थेने यशस्वीपणे राबविले. १९६०-१९७२ अशी  एकूण १२ वर्षे रंगायन कार्यरत होती. पुढे सदस्यांत मतभेद निर्माण झाल्याने १९७०मध्ये रंगायनचे काम थांबले आणि १९७२ साली औपचारिकरित्या संस्था बंद करण्यात आली.

विजया मेहता यांचा विवाह अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी झाला होता. त्यांना रवी व देवेन ही दोन मुले. हरीन खोटे यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी फारोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह केला. त्यांना अनाहिता ही मुलगी आहे.

१९७३ साली साहित्य संघातर्फे त्यांनी फ्रिट्झ बेनेव्हिट्झ यांच्यासमवेत ब्रेख्तच्या कॉकेशियन चॉक सर्कल या नाटकाचा अनुवाद अजब न्याय वर्तुळाचा (अनुवादक-चिं. त्र्यं. खानोलकर) हे दिग्दर्शित केले आणि मराठी रंगभूमीवर ब्रेख्तियन शैलीचा आविष्कार घडविला. साठहून अधिक नाटकांत त्यांनी आपले अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून योगदान दिले आहे.

विविध शैलींची, आकृतिबंधाची, आशय-विषयांची नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. एकांकिकांपासून ते अनेक अंकी नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. १९६९-७० च्या काळात रंगायनतर्फे आयोजित नाट्यकार्यशाळेसाठी शीघ्राभिनय/उत्स्फूर्त नाट्याविष्कार  (Improvisation) तंत्राचा अवलंब करून त्यांनी  एकांकिका दिग्दर्शित केल्या. या तंत्राचा वापर करून नाटक घडविण्याचा हा पहिलाच प्रयत्न मराठी रंगभूमीवर झाला. विजयाबाई स्वत:च्या नाट्यकारकीर्दीकडे वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहतात. १९७३-१९९६ हा काळ त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर व्यतीत केला. विविध निर्मात्यांसाठी त्यांनी नाटके दिग्दर्शित केली आणि काही नाटकांतून अभिनय केला. मला उत्तर हवंय (१९७२), एका घरात होती (१९७२), संध्याछाया (१९७३), जास्वंदी (१९७४), अखेरचा सवाल (१९७४), हमीदाबाईची कोठी (१९६७), पंखांना ओढ पावलाची (१९७७), बॅरिस्टर (१९७७), सावित्री (१९७८), पुरुष (१९८०), वाडा चिरेबंदी (१९८६) ही नाटके केली. त्यांनी एतद्देशीय रंगभूमीबरोबरच आंतरराष्ट्रीय रंगभूमीवरही काम केले आहे. त्यांनी  इंडो-जर्मन थिएटर प्रोजेक्टसाठी मुद्राराक्षस (१९७६), शाकुंतल (१९८०), हयवदन (१९८४), नागमंडल (१९९२-९३) आदी नाटके जर्मन रंगभूमीवर फ्रिट्झ बेनेव्हिट्झ यांच्यासोबत आणि स्वतंत्रपणेही दिग्दर्शित केली. त्यातून दोन भिन्न देशांच्या संस्कृतींचा मिलाफ घडला.

विजयाबाईंनी चित्रपट, टेलिफिल्म आणि दूरदर्शन मालिकांसाठीही काम केले आहे. हयवदन, शांकुतल (हिंदी-१९८६), हवेली बुलंद थी (१९८७), हमीदाबाईकी कोठी (१९८७) या टेलिफिल्म्स, तर लाइफलाइन ही दूरदर्शन मालिका (१९९१) आणि स्मृतिचित्रे (१९८२), रावसाहेब (१९८६), पेस्तनजी (१९८८) हे चित्रपट दिग्दर्शित केले. तसेच कलयुग (१९८१), गोविंद निहलानी दिग्दर्शित पार्टी (१९८४), अमोल पालेकर दिग्दर्शित क्वेस्ट (२००६) या चित्रपटांतून अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केले. त्या राष्ट्रीय संगीत नृत्य-नाट्य केंद्र, मुंबई या संस्थेच्या संचालिका (१९९३ ते ३१ मार्च, २०१०) होत्या; तसेच राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली या संस्थेच्याही त्या अध्यक्षा होत्या. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र शासन आयोजित नाट्यकार्यशाळांसाठी प्रशिक्षक म्हणून काम केले. तसेच मुंबई येथे स्टॅनिस्लॅव्हस्कीच्या अभिनयपद्धतीवर व्याख्याने दिली. त्यांनी लिहिलेले झिम्मा आठवणींचा गोफ  हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्याला भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार आणि मसापचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार मिळाला आहे. विजयाबाईंनी लिहिलेल्या आणि त्यांच्याविषयी इतरांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन अंबरीश मिश्र यांनी बाई :  एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास  या शीर्षकार्थाने संपादित केले आहे.

त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले. त्यांमध्ये नाट्यदर्पण (१९७३), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७५), पद्मश्री (१९७५), गो. ब. देवल पुरस्कार (१९७६), पार्टी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार (१९८३), स्मृतिचित्रेला उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार (१९८४), रावसाहेब चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार (१९८६), पेस्तनजी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार (१९८८), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०), कालिदास सन्मान (१९९१), श्री. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाकडून सन्मान्य डॉक्टरेट (१९९१), विष्णुदास भावे सुवर्णपदक (१९९३), मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (२००६), गोदावरी गौरव पुरस्कार (२००६), महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार (२००७), मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कार (२००८), पु. ल. देशपांडे पुरस्कार (२००९), संगीत नाटक अकादमीची टागोर रत्न फेलोशिप (२०१२), मेटाचा जीवनगौरव पुरस्कार (२०१८) आदींचा समावेश होतो.

https://www.youtube.com/watch?v=IOHYvN5nWG0

समीक्षक – सु. र. देशपांडे