ही संकल्पनात्मक संज्ञा भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र  या ग्रंथात मांडलेली आहे. या ग्रंथात भरतमुनींनी स्त्री-पुरुष पात्रांच्या निवडीसंदर्भात अनुरूपा, विरूपा व रुपानुसारिणी या तीन पद्धतींबद्दल सांगितले आहे. त्यातील एक पद्धत म्हणजे विरूपा होय.

नाटकाच्या भूमिकारूप नट निवडण्याचे मोठे आव्हानच दिग्दर्शकासमोर असते, नटाच्या निवडीसाठी काय परिमाण असावे?  त्यांच्या दिसण्याला महत्त्व द्यावे की अंतस्थ गुणांना महत्त्व द्यावे, नटाला महत्त्व द्यावे की नाटकातील पात्राचा विचार करावा. असा प्रश्न समोर उभा राहतो. ही अडचण लक्षात घेऊन भरतमुनींनी या पद्धतीचे विवेचन केलेले आहे. नाटकातील आवश्यकतेनुसार तरुणाने वृद्धाची किंवा वृद्धाने तरुणाची भूमिका वठविणे अथवा स्त्रीने पुरुषाची किंवा पुरुषाने स्त्रीची भूमिका वठविणे म्हणजेच विरूपा पद्धतीचा अवलंब करणे होय. त्यावेळी ते पात्र आपल्या नैसर्गिक भूमिकेच्या विरुद्ध वागते. म्हणून या अनैसर्गिक भूमिकेस भरत विरूपा ही संज्ञा देतात.  त्याचे विवेचन नाट्यशास्त्र  या ग्रंथातील पुढील श्लोकात आहे.

यो बाल: स्थाविरीं भूमिं वृद्धो वा बालभूमिकाम् ।

तद्भावै: कुरुते नाट्ये सा विरूपेति कीर्तिता ।। अध्याय ३५, श्लोक ३०.

अनेकदा दिग्दर्शकाला ज्याप्रकारे नाटकातील पात्र अपेक्षित असते तसा नट मिळत नाही, अशा परिस्थितीत विरूपा पद्धतीचा अवलंब करावा असे भरतमुनींनी म्हटले आहे. म्हणजे एखादा नट जर शरीररूपाने नाटकातील पात्रास शोभत नसेल तर त्याच्यातील अशा गोष्टींचा शोध घेतला पाहिजे ज्या त्या पात्राचा स्वभाव, चरित्र, अनुभव, चिंतन यांच्याशी मिळत्याजुळत्या असतील. उदा.  जर एखाद्या राक्षशीचे पात्र असेल तर ती भूमिका एखाद्या स्त्री अभिनेत्रीने करण्यापेक्षा एखाद्या धिप्पाड पुरुषाने साकारली तर त्या भूमिकेला अधिक न्याय मिळेल असे भरतमुनींनी सुचविले आहे. लोकनाट्यांमध्ये अशी पात्रे दिसून येतात. आज आपण ज्याला मानसशास्त्रीय निवडपद्धती (psychological casting – Talent Based ) म्हणतो ती हीच विरूपा पद्धती होय.

संदर्भ :

  • त्रिपाठी, राधावल्लभ, संक्षिप्तनाट्यशास्त्रम्,  वाणी प्रकाशन, नवी दिल्ली,  द्वितीयावृत्ती – २००९.
  • शुक्ल, बाबूलाल शास्त्री, हिंदी नाट्यशास्त्र, चौखंबा संस्कृत संस्थान, वाराणसी, प्रथमावृत्ती – १९८५ .

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा