एक आसनप्रकार. ‘पद्म’ म्हणजे कमळ. हे आसन करणार्‍या व्यक्तीच्या शरीराचा आकार कमळासारखा भासतो म्हणून या आसनाला पद्मासन किंवा कमलासन हे नाव  दिले आहे. शिवाय ज्याप्रमाणे कमळ चिखल व पाणी यातून वर येऊन उमलते आणि तरीही त्यापासून अलिप्त राहते त्याप्रमाणे साधक या आसनात स्थिर, शांत, अविचल, तटस्थ व स्थितप्रज्ञ राहू शकतो. बहुसंख्य आसने ही पद्मासनावर आधारित असल्यामुळे योगामध्ये पद्मासनाला अतिशय महत्त्व आहे. प्राणायाम, कपालभाती, ओंकार-जप, ध्यान आणि समाधी यासाठी पद्मासन आवश्यक आहे. हठप्रदीपिका  या ग्रंथातून बद्धपद्मासन आणि उत्थित पद्मासनाचा बोध होतो (१.४४); तर घेरण्डसंहितेत बद्धपद्मासनाचे वर्णन आले आहे (२.८).

कृती : जमिनीवरील मऊ किंवा जाड अंथरुणावर पाय सरळ समोर ठेवून ताठ बसावे. या स्थितीस दंडासन म्हणतात. उजवा पाय जवळ घेऊन त्याचे पाऊल पकडून ते किंचित वर उचलावे व डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. डावा पाय वाकवून त्याचे पाऊल थोडे वर उचलून, उजव्या पायावरून ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. तळहात गुडघ्यांवर पालथे किंवा ज्ञानमुद्रेत ठेवावेत. पाठीचा कणा ताठ ठेवून दृष्टी नासाग्री (नाकाच्या शेंड्याकडे) ठेवावी किंवा डोळे मिटावेत. श्वसन नैसर्गिकरित्या चालू असावे. पोटाची हालचाल होऊ देऊ नये. या आसनात १ ते ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त काळ आपली क्षमता, उद्देश व वेळ यानुसार बसता येते. आसन सोडताना एकेक पाय सोडवून दंडासनात बसावे.

पद्मासनाचाच दुसरा प्रकार म्हणजे बद्धपद्मासन. यात पद्मासनाप्रमाणे बसून दोन्ही हात मागे नेऊन विरुध्द बाजूचे पायाचे अंगठे पकडावेत. हनुवटी हृदयावर ठेवून दृष्टी नासाग्री स्थिर करावी. रोगांचा नाश करणारे हे आसन आहे. आसन सोडताना एकेक पाय सोडवून दंडासनात बसावे.

लाभ : पद्मासन नियमितपणे केल्यास गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास होत नाही. पायातील अशुद्ध रक्तवाहिन्या मोठ्या होणे ( Varicose veins ) हा विकार होत नाही. पायांच्या विशिष्ट रचनेमुळे या आसनात बराच वेळ शांत बसता येते. त्यामुळे शरीर व मनाला स्थिरता व शांतता मिळते. या आसनात श्वसनगती, हृदयगती कमीत कमी राहते. उड्डीयान बंध व मूलबंध चांगले साधतात. त्यामुळे पायाकडे अधिक रक्तपुरवठा होतो. डोळे मिटल्यामुळे साधक अंतर्मुख होतो. पद्मासनात प्राणायाम, ओंकारजप, ध्यान इत्यादींचा अभ्यास करता येतो. धैर्य व आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक शक्तीचा विकास होतो.

विधिनिषेध : पद्मासनामध्ये पाठीचा कणा ताठ ठेवावा. समोर वाकू नये. ज्यांना जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही त्यांनी प्रयत्नपूर्वक हे आसन करू नये. अन्यथा गुडघ्यास कायमस्वरूपी दुखापत होऊ शकते. आधी दंडासन, वीरासन अशी आसने केल्यावर पद्मासनासाठी हळूहळू प्रयत्न करावा. हे आसन योग्य रीतीने साधण्यासाठी एक ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

पहा : ज्ञानमुद्रा.

समीक्षक : साबीर शेख

This Post Has One Comment

  1. Prem

    Khup chan

Comments are closed.