एक आसनप्रकार. कुक्कुट म्हणजे कोंबडा. या आसनामध्ये शरीराची अंतिम स्थिती कोंबड्याप्रमाणे दिसते, म्हणून या आसनाला कुक्कुटासन असे म्हणतात.

कृती : आसनपूर्व स्थितीसाठी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून हात शरीराच्या मागील बाजूस ठेवून डोके कोणत्याही एका बाजूला किंवा मधोमध ठेवून शिथिल स्थितीत जमिनीवरील आसनावर बसावे.

कुक्कुटासन

शिथिल स्थितीमधून प्रथम दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून हात शरीराच्या बाजूला कोपरामध्ये सरळ ठेवावे. आता प्रथम पद्मासन स्थितीत येण्यासाठी उजवा पाय गुडघ्यात दुमडून दोन्ही हाताने उजव्या पायाचे पाऊल पकडून डाव्या पायाच्या मांडीवर अशाप्रकारे ठेवावे की उजव्या पायाची टाच पोटाच्या खालील बाजूस स्पर्श करेल. अशाप्रकारे डाव्या पायाचे पाऊलही उजव्या पायाच्या मांडीवर ठेवावे आणि पद्मासन स्थितीत बसावे. आता प्रथम उजवा हात उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मधून जमिनीवर ठेवावा. अशाचप्रकारे डावा हात डाव्या पायाच्या मांडी आणि पोटरीमधून जमिनीवर ठेवावा. दोन्ही हात जमिनीवर अशाप्रकारे ठेवावे की दोन्ही हातांची बोटे व्यवस्थित ताणून एकमेकांपासून लांब असावीत आणि दोन्ही तळहातांमधील अंतर दोन्ही खांद्यांच्या अंतराइतकी असावीत. आता सावकाश थोडेसे पुढे झुकून आपले शरीर हातांच्या जोरावर वर उचलावे. शरीर वर उचलताना हातासोबत पोटांच्या स्नायूंवरही भार देऊन शरीर वर उचलले जाते. दृष्टी समोर स्थिर ठेवावी किंवा डोळे बंद करावेत. चांगला सराव झाल्यावर शरीर जवळ जवळ हातांच्या कोपरापर्यंत वर उचलून तोलणे शक्य होते. अंतिम स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार आसनाचा अभ्यास करावा. श्वास नैसर्गिक ठेवून प्राणधारणेचा (प्राण म्हणजे श्वास आणि धारणा म्हणजे लक्ष केंद्रित करणे) अभ्यास करावा. श्वासावर लक्ष केंद्रित करावे.

आसनामधून बाहेर येण्यासाठी सर्वप्रथम वर उचललेले शरीर जमिनीवर आणावे. दोन्ही हात, मांडी आणि पोटरीमधून बाहेर काढावेत. हातांच्या मदतीने पद्मासनातून बाहेर यावे. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून दोन्ही हात शरीराच्या मागील बाजूस ठेवून शिथिल स्थितीत यावे.

लाभ : संपूर्ण शरीर हातावर उचलल्यामुळे खांदे, मनगटे, बाहू मजबूत होतात. पाय, मांड्या, घोटे, गुडघे यांचा व्यायाम होऊन स्नायूंना बळकटी मिळते. शरीर वर उचलताना ओटीपोटातील स्नायू मजबूत होतात. श्वसनसंस्था, पचनसंस्था यांचे कार्य सुधारते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात. शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य व्यवस्थित राहते. शरीर आणि मनाची एकाग्रता वाढते. मानसिक शांतता लाभते.

पूर्वाभ्यास : चतुरंग दंडासन, अधोमुख श्वानासन, तोलासन या आसनांचा नियमित अभ्यास कुक्कुटासनाच्या आधी करावा.

विविध प्रकार : हातांमध्ये अंतर न ठेवताही कुक्कुटासन केले जाऊ शकते. तसेच पद्मासन वरच्या बाजूला घेणे म्हणजेच ऊर्ध्व कुक्कुटासन हाही एक वेग़ळा प्रकार म्हणून केला जातो. तसेच एका हातावर शरीर वर उचलून दुसऱ्य़ा हाताने मनगट पकडावे.

विधिनिषेध : खांदेदुखी, मानदुखी, कमकुवत मनगटे, गुडघेदुखी, संधीवात असणाऱ्यांनी या आसनाचा अभ्यास टाळावा. तसेच उच्च रक्तदाब, हृदयरोग, गरोदरपणात हे आसन करू नये. शक्यतो योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच कुक्कुटासनाचा अभ्यास करावा.

संदर्भ :

  • Dr. M.L. Gharote, Dr. Parimal Devnath, Dr. Vijay Kant Jha, The Lonavala Yoga Institute, Lonavala, 2014.
  • Haṭhapradīpikā of Svatmarama, edited by Swami Digambarji & Pt. Raghunathashastri Kokaji, Kaivalyadham, S. M. Y. M Samiti, Lonavala, 2018.
  • Haṭharatnāvalī (A Treatise on Haṭhayoga of Śrīnivāsayogī), critically edited byGheranda Samhita , (English translation) – translated by Rai Bahadur Sris Chandra Vasu, Sri Satguru Publication, Delhi, p.17.

                                                                                                                                                                                                 समीक्षक : नितीन तावडे