अटलांटिक महासागरचा एक फाटा. नैर्ऋत्य – ईशान्य दिशेत विस्तारलेल्या या उपसागरच्या उत्तरेस आणि पश्चिमेस कॅनडाचा न्यू ब्रन्सविक प्रांत, तर दक्षिणेस आणि पूर्वेस नोव्हास्कोशा प्रांत आहे. उपसागराची लांबी १५१ किमी., प्रवेशमार्गाजवळील रुंदी ५२ किमी. आणि क्षेत्रफळ ९,३०० चौ किमी. आहे. या उपसागरला उत्तरेकडून सेंट जॉन आणि सेंट क्रॉई या नद्या येऊन मिळतात. जगातील सगळ्यात उंच आणि वेगवान भरतीच्या लाटांसाठी हा उपसागर प्रसिद्ध असून सुमारे १०० अब्ज टन पाणी दररोज किन्याऱ्यावर यते आणि जाते. मुखाकडून भरतीच्या लाटा जसजशा अंतर्गत भागात येतात तसतशी त्यांची उंची वाढत जाते. या उपसागरातील भरतीच्या लाटा जवळजवळ १५ मी. उंच उसळतात. उधानाच्या भरतीच्या वेळी तर ही उंची २१ मी. पर्यंत पोहोचते. सेंट जॉन नदी (Saint John River) च्या मुखापाशी या उंच उसळणार्‍या लाटा, उलटा पडणारा धबधबा तयार करतात.

ईशान्य टोकाशी या उपसागराचे दोन अरुंद फाटे होतात. त्यांपैकी उत्तरेकडील फाटा शिगनेक्टो उपसागर या नावाने, तर दक्षिणेकडील फाटा मायनस बेसिन या नावाने ओळखला जातो. हे दोन्ही फाटे अंतर्गत भागाकडे अरुंद आणि निमुळते होत गेल्याने तेथे लाटांची ऊंची अधिकच वाढते. लाटांची ऊंची सामान्यपणे शिगनेक्टो उपसागरात १४ मी., तर मायनस बेसिन मध्ये १६ मी. असते. भरतीच्या लाटा जेव्हा परत फिरतात, तेव्हा त्यातील पाणी लाल चिखलयुक्त रंगाचे बनते. यावरून किनार्‍यावरील लाल वालुकाश्म आणि शेल खडकांच्या धूपीचे प्रमाण लक्षात येते. पेटीकोडीॲक नदीच्या मुखापर्यंत लाटांचा प्रभाव आढळतो. या लाटांची संभाव्य वीजनिर्मिती क्षमता खूप आहे. अजून तसे प्रकल्प कार्यान्वित झाले नसले, तरी भविष्यात तेथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प होण्याची शक्यता आहे.

फंडी उपसागर ६० मी. उंचीच्या तीव्र उताराच्या खडकाळ कड्यांनी वेढलेला असून त्यांमधून अनेक प्रवाह वाहत येऊन उपसागराला मिळतात. उपसागराचा किनारा दंतूर असून त्यात अनेक लहानलहान खाड्या आणि खोल पाण्याची मोठी बंदरे आढळतात. त्यांपैकी सेंट जॉन, सेंट अँड्रूझ, मंक्टन (न्यू ब्रन्सविक) आणि अनॅपलस, रॉयल, डीग्बी, हँटस्पोर्ट (नोव्हास्कोशा) ही प्रमुख बंदरे आहेत. उंच लाटांमुळे हा उपसागर जलवाहतुकीसाठी धोकादायक मानला जातो. बरीचशी बंदरे-नगरे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात जहाजबांधणी, जहाज वाहतूक आणि परिसरातील लाकूडतोड व्यवसाया या व्यवसायांच्या विकासाबरोबर विकसित झाली आहेत. जुलै अखेर अनेक सँडपायपर व इतर पक्षी किनाऱ्यावर स्थलांतर करून येतात. किनार्‍यावर प्राणी, कमानी, कुलुपाचे छिद्र इत्यादी प्रकारच्या आकारांचे नयनरम्य खडक शिल्पे असून तेथे अदृष्य गुहा, जंगले व शेतजमिनी आहेत. या उपसागराचा निसर्गरम्य असून अनेक पर्यटक येथे भेटी देतात. १९४८ मध्ये या उपसागराच्या किनारी भागातील, न्यू ब्रन्सविक प्रांतातील ८० चौ. किमी.क्षेत्र ‘फंडी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

यूरोपीयनांनी इ. स. १६०४ मध्ये सेंट जॉन नदीच्या मुखाचा शोध लावला. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीस या उपसागराच्या परिसरात यूरोपियनांच्या वसाहती स्थापन झाल्या होत्या. फ्रेंच समन्वेषकांनी येथे पोर्ट रॉयल हा किल्ला बांधला. तेच फ्रेंच वसाहतींचे प्रमुख केंद्र बनले होते. त्यानंतर ब्रिटीशांनी या प्रदेशाचा ताबा घेतला.

समीक्षक – वसंत चौधरी

प्रतिक्रिया व्यक्त करा