उत्तर अटलांटिक महासागराचा एक फाटा. आर्क्टिक महासागरापासून दक्षिणेस सु. १,४५० किमी. अंतरावर हा उपसागर आहे. पश्चिमेकडील कॅनडाचे बॅफिन बेट आणि पूर्वेकडील ग्रीनलंड बेट यांदरम्यान असलेल्या या उपसागराचा दक्षिणेकडील विस्तार साधारणपणे ७०० उत्तर अक्षांशापर्यंत आहे. उपसागराच्या दक्षिण भागात असलेली डेव्हिस सामुद्रधुनी आणि त्यापुढील लॅब्रॅडॉर समुद्र यांद्वारे अटलांटिक महासागरात जाता येते; तर उत्तरेस नॅरेस सामुद्रधुनी आणि त्यापुढील स्मिथ, जॉन्स व लँकेस्टर सामुद्रधुनी (साउंड) यांद्वारे हा महासागर आर्क्टिक महासागराशी जोडला गेला आहे. या उपसागराची कमाल लांबी १,४५० किमी., रुंदी ११० ते ६५० किमी. आणि क्षेत्रफळ ६,८९,००० चौ. किमी. आहे. उपसागराची खोली उत्तर भागात २४० मी., तर दक्षिण भागात ती ७०० मी. आहे. उपसागराच्या मध्यवर्ती  भागात ‘बॅफिन हॉलो’ हा खळगा असून तेथील कमाल खोली २,४०० मीटर आहे.

ब्रिटिश कप्तान रॉबर्ट बायलॉट यांनी इ. स. १६१६ मध्ये या उपसागराचा शोध लावला; परंतु सफरीचा मार्गदर्शी लेफ्टनंट विल्यम बॅफिन यांचे नाव यास देण्यात आले. त्यानंतर १८१८ मध्ये कॅप्टन जॉन रॉस येथे समन्वेषणास आले होते. दरम्यानच्या काळातील या उपसागराच्या समन्वेषणाबद्दल विशेष माहिती नाही. बायलॉट यांनी येथील किनाऱ्याचे नकाशे तयार केल्यानंतर या प्रदेशाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाचे प्रथम आयोजन डॅनिश तसेच अमेरिकन सफरींनी १९२८ मध्ये केले होते. त्यानंतरचे अधिक सखोल सर्वेक्षण १९३०च्या दशकात करण्यात आले. पेट्रोलवरील जहाजे आणि त्यानंतर विमानांच्या साहाय्याने या प्रदेशातील हिमाच्छादन वितरणाचा सखोल अभ्यास करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर कॅनडियन सफरींनी येथील समन्वेषणाचे काम हाती घेतले. प्रतिकूल वातावरणामुळे मानवाने या उपसागराचा आर्थिक वापर कमी केला असला, तरी उत्तर अमेरिका खंडाच्या उत्क्रांतीचा शोध घेण्याच्या दृष्टीने या उपसागराच्या अभ्यासात विशेष रस घेतला जातो. १९५१ मध्ये डेन्मार्कशी केलेल्या करारानुसार संयुक्त संस्थानांनी काही लष्करी तळ या उपसागरात स्थापन केले आहेत.

बॅफिन या अर्धवर्तुळाकार उपसागराचे किनारी भाग ग्रीनलंड आणि कॅनडाच्या सागरमग्न भूमीने वेढलेले असून सामुद्रधुनीच्या मुखाशी खडकाळ भाग आहेत. सागरतळाशी असलेला गाळ भूजन्य स्वरूपाचा असून त्यात करड्या-तपकिरी रंगाचा एकजिनसी गाळ, दगड-गोटे आढळतात. रेती मात्र सर्वत्रच आढळते.

हिवाळ्यात जेव्हा ईशान्य वारे बॅफिन बेटाकडे वाहत येतात, तेव्हा या उपसागरी भागातील हवामान तीव्र स्वरूपाचे बनते. उन्हाळ्यात या परिसरात वायव्य तसेच नैर्ऋत्येकडून वाहत येणारे वारे प्रभावी असतात. पूर्वीय वारे ग्रीनलंडच्या अपतट भागातून वाहतात. विशेषत: हिवाळ्यात वारंवार वादळे येतात. दक्षिण भागात जानेवारीचे सरासरी तापमान –२०० सेल्सि., तर उत्तर भागात ते –२८० सेल्सि. असते. ग्रीनलंडकडून हिमनद्यांवरून वाहत येणारे उबदार आणि कोरडे  फोएन वारे कित्येकदा बर्फ वितळण्याइतपत उबदार असतात. जुलैचे सरासरी तापमान किनारी भागात ७० सेल्सि. असते. या काळात काही वेळा हिमवृष्टीही होते.

बॅफिन उपसागरातील हिमनग

बॅफिन उपसागरात ऑगस्टमध्येही हिमनग आढळतात. उत्तरेकडील सामुद्रधुनीतून हे हिमनग बॅफिनमध्ये येतात. तेथे हिमनद्यांना धडकून ते फुटतात. ऑक्टोबरमध्ये हिमक्षेत्राचा विस्तार बॅफिन बेट व क्वीबेकची मुख्य भूमी यांदरम्यान असलेल्या हडसन सामुद्रधुनीपर्यंत झालेला असतो. उपसागराच्या मध्य भागातही हिमाच्छादन असते. उत्तर भाग मात्र पश्चिमी ग्रीनलंड या उबदार सागरी प्रवाहामुळे कायमच हिमाच्छादनविरहित असतो.

सागरी लाटा हा येथील महत्त्वाचा आणि मनोरंजक घटक आहे. बॅफिन बेटाजवळ आणि ग्रीनलंडच्या किनाऱ्याजवळ सामुद्रधुनीसारख्या भागातून पाणी पुढे सरकत असताना लाटांची उंची ४ ते ९ मीटरपर्यंत आढळते. उपसागरातील पाण्याची लवणता दर हजारी ३० ते ३२.७ असते. पाण्यातील क्षारांचे प्रमाण आणि उबदार प्रवाह यांच्या परिणामामुळे येथे विविध प्रकारचे जलचर विपुल प्रमाणात आढळतात. येथे कॉड, हॅडॉक, हेरिंग, हॅलिबट इत्यादी प्रमुख जातींचे मासे आढळतात.

या उपसागरातील प्रवाहांची दिशा सामान्यपणे घड्याळकाट्यांविरुद्ध असते. येथील प्रवाहामुळे ग्रीनलंडच्या अपतट भागातील उबदार व क्षारयुक्त पाणी उत्तरेकडे जाते, तर बॅफिन बेटाच्या किनाऱ्याजवळ आर्क्टिक महासागराकडून आलेले थंड व गोडे पाणी दक्षिणेकडे वाहते. ग्रीनलंडकडून येणारे हिमनग वर्षभर या भागात आढळतात. ऑगस्टमध्ये त्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. नोव्हेंबर ते जुलै यांदरम्यान विस्तृत प्रदेशावर हिमाच्छादन असते.

उपसागराच्या उत्तर टोकाशी असलेला ‘पलन्या’ (सागरी हिमाने वेढलेला खुला पाण्याचा भाग) हा कॅनडातील सर्वांत मोठा पलन्या असून तेथे बेलूगास व नारव्हेल जातीचे व्हेल (देव) मासे आणि वॉलरस यांच्या प्रजोत्पादनाच्या दृष्टीने संपूर्ण हिवाळा महत्त्वपूर्ण ठरतो. या उपसागरातील मासेमारी इ. स. १६५० पासून सुरू झाली. इ. स. १९०० पर्यंत यूरोपीयन व अमेरिकनांनी या भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी केल्यामुळे येथील व्हेल माशांची संख्या खूप घटली. तसेच सील, वॉलरस, कॉड, हॅलिबट, हॅडॉक, हेरिंग या माशांची पकडही बरीच कमी झाली आहे. सु. ८०,००० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या विस्तृत पलन्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर जलचर आढळतात.

वर्षातील बहुतांश कालावधीत हिमाच्छादन, जास्त घनतेचे तरंगते हिम आणि हिमनग यांमुळे उपसागरातून जलवाहतूक होऊ शकत नाही. लॅब्रॅडॉर या थंड प्रवाहाबरोबर अनेक हिमनग या उपसागरात वाहत येतात. त्यामुळे यातून जलवाहतूक करणे धोकादायक ठरते.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम