अब्जांश पदार्थांचा शिरकाव मानव व इतर सजीवांमध्ये श्वसन, अन्न पदार्थ, त्वचा अशा विविध मार्गांनी होतो. वातावरणातील अब्जांश पदार्थ ओढे, नाले, नद्या, तलाव यातील पाणी तसेच टाकाऊ पदार्थ इत्यादींमधून मातीत मिसळतात. त्यामुळेच जमीन व पाणी यातील सूक्ष्मजीवांमध्ये त्यांचा शिरकाव होतो. अब्जांश पदार्थांच्या प्रवेशाबाबतीत अब्जांशी पदार्थाचा आकार, वस्तुमान, त्यांच्या पृष्ठभागावरील विद्युतभार, त्याच्यावरील कवचाचे रासायनिक स्वरूप इत्यादी घटक महत्त्वपूर्ण असतात. अब्जांश पदार्थांचा सूक्ष्मजीवांच्या पेशीतील प्रवेशाचा मार्गदेखील या घटकांवर ठरतो. अतिसूक्ष्म आकाराचे अब्जांश पदार्थ पेशीपटलातून अगदी सहजपणे आत शिरकाव करतात. अब्जांश पदार्थांचा सजीवामध्ये एकदा शिरकाव झाला की त्यांचा रक्त, लसिका (Lymph), पेशीद्रव्य, पेशीद्रव्यात विरघळलेली प्रथिने, मेदाम्ल इत्यादी पदार्थांशी संयोग होतो व अब्जांश पदार्थावर पेशीघटकाचे आवरण तयार होते. त्याला कोरोना (Corona) म्हणतात. अब्जांश पदार्थ कोरोनाच्या स्वरूपात पेशीय भक्षण (Endocytosis) मार्गाने पेशीमध्ये प्रवेश करतात. तेथे पेशीद्रव्यातील घटकांशी होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे पेशींच्या रचनेवर तसेच कार्यावर परिणाम होतो.

दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक उत्पादनांमध्ये सोने, चांदी, तांबे, लोखंड, जस्त इत्यादी धातू व त्यांच्या ऑक्साईडचे अब्जांश कण, अब्जांशनलिका असतात. अब्जांशी पदार्थांमुळे जैविक पेशींमध्ये प्रतिक्रियाशील ऑक्सिजन प्रजातींची (Reactive oxygen species) मोठ्या प्रमाणात वाढ होते. परिणामी हे पदार्थ पेशींची रचना व कार्य यांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतात. उदा., हे कण पेशीकेंद्रात जाऊन तेथील डीनएचे (DNA) धागे खंडित करतात. तसेच ते पुनरुत्पादन प्रक्रियेवर देखील परिणाम करतात.

अब्जांश कणाच्या सूक्ष्मजीव नाशक गुणधर्माचा उपयोग प्रमाणावर होत आहे. विविध अब्जांश पदार्थांचे आकार मानव पेशीतील जैवक घटकांसारखेच असल्याने त्यांचा उपयोग पेशीतील आतील विविध क्रिया समजून घेण्यासाठी निश्चित होतो. परंतु, धातूच्या अब्जांश कणांच्या विषारी परिणामामुळे पेशीवर होणाऱ्या परिणामाबाबत अधिक व्यापक संशोधन होणे जरूरीचे आहे.

संदर्भ :

  • Jackson, T., Patani, B. and Israel, M. (2017) Nanomaterials and Cell Interactions: A Review. Journal of Biomaterials and Nanobiotechnology, 8, Page 220-228. doi: 10.4236/jbnb.2017.84015.

समीक्षक : वसंत वाघ