धर्म-तत्त्वज्ञानातील एक उपपत्ती. चराचरसृष्टीमध्ये ईश्वर भरून राहिला असून सर्व विश्वच त्याचा आविष्कार किंवा शरीर होय. देवाहून चराचर भिन्न नाही, असे मानणारा चराचरेश्वरवाद वा विश्वात्मक देववाद. या उपपत्तीला इंग्रजीत ‘पॅनथिइझम’ अशी संज्ञा प्रथम १७०५ मध्ये जॉन टोलंड (१६७०–१७२२) या आयरिश धार्मिक-तात्त्विक विचारवंताने वापरली असली, तरी ती फार प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे दिसते. भौतिक विश्व व ईश्वर हे एकरूपच होत, असे ही उपपत्ती मानते. सर्वसाधारणपणे पारंपरिक ईश्वरवाद व निरीश्वरवाद ह्या दोन परस्परविरोधी उपपत्तींच्या मध्ये ह्या उपपत्तीचे स्थान मानता येईल. ईश्वरवाद्यांच्या आणि चराचरेश्वरवाद्यांच्या दृष्टीने ईश्वरी कल्पनेचे मूळ स्वरूप सारखेच होय; कारण आपल्या स्वतःच्या अस्तित्वावरून आणि आपणास सभोवतालच्या विश्वातील वस्तूंचा जो बोध होतो त्यावरून आपण एखाद्या श्रेष्ठ अस्तित्वाचे अनुमान करतो. ह्या श्रेष्ठ अस्तित्वावरच, म्हणजे ईश्वरी अस्तित्वावरच, सर्व वस्तूंचे अस्तित्व अवलंबून असते. ईश्वरातूनच सर्व वस्तू निर्माण झालेल्या असतात व ईश्वरातच त्या विलीन होत असतात. चराचरेश्वरवादानुसार कार्य व कारण (विश्व व ईश्वर) यांत अभेद मानला जातो; तसेच प्रत्येक कार्य किंवा परिणाम हा त्याचे कारण निर्देशित करण्यास समर्थ असतो, असेही त्यात मानले जाते. चेतनवस्तू किंवा जडवस्तू ईश्वरातून आवश्यकपणे निष्पन्न झालेली असते, असे चराचरेश्वरवादाचे प्रतिपादन आहे.

भारतीय विचारधारेत काटेकोरपणे ज्याला चराचरेश्वरवादी विचारसरणी म्हणता येईल, अशी विचारसरणी आढळत नाही. वेदोपनिषदांत चराचरेश्वरवादसदृश विचार आढळत असले, तरी एकूण वेदोपनिषदांत आढळणारे ब्रह्मतत्त्व किंवा काश्मीरी शैव तत्त्वज्ञानातील शिवतत्त्व हे विश्वात्मक तर आहेच; पण त्याचबरोबर ते विश्वातीत किंवा विश्वोत्तीर्णही आहे. म्हणूनच त्याला काही पाश्चात्त्य विचारवंतांनी ‘विश्वश्रेष्ठ-ईश्वरवाद’ (Panentheism) असे म्हटले आहे. चराचर विश्व ईश्वरात आहे; परंतु विश्वापेक्षा तो श्रेष्ठ आहे, असे मानणारी ही उपपत्ती आहे. रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैती विचारसरणीतही चराचरेश्वरवादासारखे विचार आढळत असले, तरी काटेकोरपणे ते चराचरेश्वरवादी विचार नाहीत, असे म्हणणेच अधिक सयुक्तिक ठरेल; कारण त्यातील चित्‌, अचित्‌ आणि ईश्वर ह्या तीन तत्त्वांतील ईश्वर हे तत्त्व श्रेष्ठ दर्जाचे व स्वतंत्र आहे. पहिली दोन तत्त्वे ईश्वराहून कनिष्ठ प्रतीची व ईश्वर परतंत्र तत्त्वे होत. स्थूलमानाने धार्मिक स्वरूपाचा चराचरेश्वरवाद किंवा विश्वश्रेष्ठ-ईश्वरवाद भारतीय विचारात आढळतो असे म्हटले, तर चालण्यासारखे आहे.

प्राचीन ईजिप्तमधील समन्वयवादी (Syncretism) प्रवृत्ती चराचरेश्वरवादी असल्याचे दिसते; कारण त्यातील रा (री ) ही सूर्यदेवता इतर सर्वच देवतांना स्वतःत सामावून घेते. ही देवता सनातन स्वरूपाची असून तीच विविध असे पाउणशे आकार धारण करते. हे आकार म्हणजेच विश्वातील प्रमुख अशी पाउणशे मूलद्रव्ये व विभाग होत. रा प्रमाणेच इसिस ही आणखी एक देवता त्यांनी विश्वाशी एकरूप मानल्याचे आढळते. बॅबिलोनियातही इतर सर्व देवता मार्डुक ह्या एकाच देवतेची विविध नावे असल्याचे मानले जाई. चीनमधील जू श्यी (११३०–१२००) ह्या तत्त्वज्ञाने स्टोइकांच्या चराचरेश्वरवादासारखे विचार मांडले आहेत.

ग्रीसमधील चराचरेश्वरवाद मूलतः धार्मिक स्वरूपाचा असला, तरी त्याची परिणती तात्त्विक स्वरूपाच्या विचारात झालेली दिसते. आरंभीच्या ग्रीक तत्त्वज्ञांनी विश्वाचे स्पष्टीकरण भौतिक तत्त्वांद्वारे दिलेले आहे; परंतु नंतरच्या विचारवंतांनी अधिक सूक्ष्म विचार करून चेतन तत्त्वे प्रतिपादिली. एलिॲटिक प्रणालीने पुरस्कारिलेले केवल सत्ता किंवा अस्तित्व हे तत्त्व चराचरेश्वरवादाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होय. या प्रणालीचा थोर पुरस्कर्ता झीनॉफनीझ (इ.स.पू. सहावे शतक) याच्या मते केवळ एकच ईश्वर अस्तित्वात असू शकतो आणि हा ईश्वर विश्वाशी एकरूप किंवा त्याहून अभिन्न असतो. त्याने त्या काळी प्रचलित असलेल्या मानवारोपवादावर खडसून टीका केली व अनेक देवतावादाऐवजी चराचरेश्वरवादी एकदेवतावादाचा हिरिरीने पुरस्कार केला. त्या काळी ग्रीसमधील चराचरेश्वरवादात आणि अनेकदेवतावादात फारसा संबंध नव्हता. हेराक्लायटसने (इ.स.पू.सु. ५३६–४७०) विश्वाला मूलभूत व ईश्वरी असे अग्नितत्त्व मानले. म्हणूनच त्याच्या विचारात चराचरेश्वरवाद आणि निसर्गवाद हे जवळ जवळ आलेले दिसतात. पुढे स्टोइक मतात ह्याच कल्पनेचा विकास होऊन विश्व हेच ईश्वर आहे व ईश्वरच विश्व आहे, असे प्रतिपादिले गेले. ईश्वर व विश्व यांत तादात्म्य असले, तरी त्यांत फरक करणे आवश्यक आहे, असे स्टोइक मानतात; कारण विश्व हे नानाविध किंवा बहुत्वयुक्त किंवा शरीरासारखे असले, तरी ईश्वर हा एकात्मक किंवा चैतन्यस्वरूपी आहे. ईश्वर हा विश्वात्मक असूनही विश्वातीत आहे, असे मानणारा धार्मिक चराचरेश्वरवाद आणि विश्व व ईश्वर यांत संपूर्ण किंवा केवल तादात्म्य मानणारा तात्त्विक चराचरेश्वरवादाचे स्थान मानावे लागेल. सर्व विश्वामागे एक ईश्वरी गूढ आहे; तसेच विश्वातील सर्व गोष्टींच्या आविष्कारातही ईश्वरी गूढच अनुस्यूत आहे, असे प्रतिपादन करणारा गूढात्मक चराचरेश्वरवाद हा आणखी एक प्रकार मानला जातो. या प्रकारात ईश्वर व विश्व यांत जो भेद केला जातो, तेवढ्यापुरताच हा प्रकार धार्मिक चराचरेश्वरवाद होय आणि ईश्वर व विश्व यांत जेवढ्यापुरते तादात्म्य मानले जाते, तेवढ्यापुरता तो तात्त्विक चराचरेश्वरवाद होय.

डायोनिशिअस (इ.स. पहिले शतक) याच्या विचाराने प्रभावित झालेला जोहॅनीझ स्कॉटस एरियूजेना (सु. ८१०–७७?) या स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञाच्या विचारात चराचरेश्वरवादी विचार आढळतात. इस्लाम धर्मातील ईश्वरवाद मान्य केला, तरीही इब्न रुश्द (११२६–९८) यांच्या विचारसरणीलाही चराचरेश्वरवादाची किनार आढळते. सूफी पंथाचा गूढवादही चराचरेश्वरवादाकडेच झुकलेला दिसतो. मध्ययुगीन यूरोपीय गूढवादातही काटेकोर अर्थाने नसला, तरी स्थूलमानाने चराचरेश्वरवादी विचाराचा आढळ होतो. जोर्दानो ब्रूनो (सु. १५४८–१६००) हा चराचरेश्वरवादी विचारवंत संपूर्णपणे ख्रिस्ती धर्मविरोधी होता. त्याच्या मते ईश्वर हाच विश्वाचे अंतर्शायी कारण अथवा साध्य आहे व तो विश्वातील सान्त विशेषांहून वेगळा आहे; कारण त्याच्या अस्तित्वात हे सगळे सान्त विशेष अंतर्भूत होतात. मानवी आत्मा हा अमर आहे; कारण तो ईश्वराचा अंश आहे.

याकोप बम (१५७५–१६२४) हा गूढवादी व प्रॉटेस्टंट मताचा होता. त्याने असे प्रतिपादन केले की, सर्वच गोष्टींचे अधिष्ठान ईश्वर असून त्यात शिव व अशिव यांचे द्वैत असते. ह्या द्वैताच्या संघर्षातूनच चर व अचर विश्व निर्माण झालेले असते. विश्व व मानवी आत्मा हे ईश्वराशिवाय असू शकत नाहीत.

योहान गोटलीप फिक्टे (१७६२–१८१४), फ्रीड्रिख शेलिंग (१७७५–१८५४) व हेगेल (१७७०–१८३१) ह्या कांटनंतरच्या जर्मन चिद्‌वादी तत्त्वज्ञांच्या विचारांतही चराचरेश्वरवाद आढळतो; कारण त्यांनी अस्तित्वात असलेल्या सर्वच वस्तूंना ईश्वराचा किंवा चेतनाचा स्वभावधर्म म्हटले आहे. स्पिनोझाप्रणीत स्थिर ईश्वराऐवजी किंवा द्रव्याऐवजी हेगेलने विकसनशील चेतन तत्त्व प्रतिपादन केले. ह्या चेतन तत्त्वास तार्किक प्रक्रियेने विश्वरूपात स्वयंपरिणत होणारे चेतन तत्त्व, असे तो मानतो आणि म्हणूनच त्याचा चराचरेश्वरवाद ‘पॅनलॉजिझम’ म्हणून संबोधिला जातो. बारूख स्पिनोझाचे (१६३२–७७) आधुनिक अनुयायी मात्र ईश्वराच्या चलनवलनहीन किंवा स्थिर स्वरूपासच उचलून धरतात. हेगेलचे तत्त्वज्ञान चराचरेश्वरवादी आहे, असे काटेकोरपणे म्हणणे मात्र कठीण आहे.

जर्मन तत्त्वज्ञ कार्ल क्राउझे (१७८१–१८३२) याने स्वतःच्या विचारप्रणालीस विश्वश्रेष्ठ-ईश्वरवाद असे नाव दिले. त्याच्या मते ईश्वर हा विश्वात आढळणारी एकरूपता जरी असली, तरी तो त्या विश्वाहून तत्त्वतः श्रेष्ठही आहे. ईश्वरात एक भाग म्हणून विश्वाचा अंतर्भाव होतो. विश्व म्हणजे ईश्वराच्या सत्तेचा संपूर्ण नव्हे, तर केवळ एक भाग. प्लोटायनसनेही (सु. २०५–७०) एके ठिकाणी विश्वश्रेष्ठ-ईश्वरवादाचा उल्लेख केला आहे. मालब्रांश (१६३८–१७१५) याच्या तत्त्वज्ञानासही ही संज्ञा लावता येईल. रूडॉल्फ हेर्मान लोत्से (१८१७–८१) याने ईश्वराला व्यक्तिमत्त्व असते असे प्रतिपादन केले व चराचरेश्वरवादात मोलाची भर घातली. त्याने त्याच्या कार्यकारणसिद्धांतात चराचरेश्वरवादाची व ईश्वरस्वरूपाची विस्ताराने चर्चा केलेली आहे. केवल चिद्‌वादाचे प्रतिपादन करणाऱ्या तत्त्ववेत्त्यांची दर्शने चराचरेश्वरवादाच्या बरीच जवळ येतात. हेगेल, शेलिंग, जे. रॉइस, ब्रॅड्‌ली यांची दर्शने या दृष्टीने उल्लेखनीय ठरतील. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत कमीअधिक प्रमाणात चराचरेश्वरवादाशी साम्य असलेले विचार गुस्टाफ फेक्नर, डब्ल्यू. पी. माँटेग्यू, आंरी बेर्गसाँ, ई. एस. ब्राइटमन, निकोलाई ब्यरद्यायेव्ह, ॲल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड, इक्‌बाल प्रभृतींनी मांडले. यांतील बहुतेकजण चराचरेश्वरवादाचा व्यापक अर्थाने (सर्व काही ईश्वरच आहे) स्वीकार करतात. ईश्वराचे व निसर्गाचे तादात्म्य वर्ड्‌स्वर्थ, टेनिसन यांसारख्या अनेक कवींनी वर्णिलेले आढळते. या प्रकारास काव्यात्म चराचरेश्वरवाद म्हणता येईल.

जे. ए. पिक्टन ह्याने आधुनिक काळात चराचरेश्वरवादास उचलून धरले आहे. त्याच्या मते चराचरेश्वरवादानुसार ईश्वर प्रत्येक वस्तूत अनुस्यूत आहे. याचा अर्थ असा नव्हे की, दगड, टेबल, मनुष्य, वृक्ष किंवा कुत्रा हा ईश्वरच आहे. ईश्वर हा परिपूर्ण आहे. कुठलाही अंश किंवा भाग संपूर्णपणे ईश्वर मानता येत नाही. असे असले तरी परिपूर्ण ईश्वराचा भाग म्हणून कुठलाही भाग ईश्वराहून वेगळा मात्र असू शकत नाही. चराचरेश्वरवादी मतानुसार ईश्वराच्या अस्तित्वाविषयी संशय व्यक्त करणे, म्हणजे सर्व वस्तूंचे अस्तित्वच नाकारणे होय. ईश्वर म्हणजे विश्वातील सर्व वस्तूंची गोळाबेरीज नव्हे. तसेच विश्वातील एकात्मकता म्हणजे काही केवळ विश्वातील सान्त वस्तूंच्या गोळाबेरजेची एकात्मकता नाही. ही एकात्मकता एक जिवंत व परिपूर्ण अशी एकात्मकता होय. ईश्वरापासून सर्व विश्व विकास पावले आहे, असे प्रतिपादन करणाऱ्या सर्व चराचरेश्वरवादी विचारप्रणाली पिक्टन त्याज्य समजतो. त्याच्या मते विकास किंवा परिवर्तन केवळ अंशांच्या किंवा भागांच्या बाबतीतच सत्य व शक्य आहे; संपूर्णाबाबत विकास शक्यच नाही. त्याच्या चराचरेश्वरवादानुसार कुठलेही परिवर्तन, विकास, पापपुण्य किंवा इतर कुठल्याही प्रकारचे बरे-वाईट हे केवळ सान्त, आंशिक किंवा स्थानिक स्वरूपाचेच असते. पिक्टन स्पिनोझाला आपला गुरू मानून त्याची प्रशंसा करतो. त्याने स्पिनोझाच्या चराचरेश्वरवादात काही सुधारणाही सूचविल्या आहेत.

चराचरेश्वरवादामुळे धर्माला चटकन अर्थपूर्णता प्राप्त होते; तसेच विश्व व ईश्वर यांत आध्यात्मिक एकरूपता शोधण्याची व्यक्तीत जी स्वाभाविक तीव्र इच्छा असते, तिचेही समाधान होते. चराचरेश्वरवादाचे हे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल. विविध धर्मांतून व विचारप्रणालींतून आढळून येणारी चराचरेश्वरवादी विचारसरणी विश्वाच्या विशालतेने इतकी प्रभावित झालेली आहे की, विश्वाच्या उत्पत्तिसंबंधीचे कुठलेही स्पष्टीकरण चराचरेश्वरवादाचे पुरस्कर्ते मान्य करीत नाहीत. ईश्वरातून निःसरणाने हे विश्व आवश्यकपणे उत्पन्न झाले आहे, हे म्हणणे किंवा ईश्वराने ते स्वतंत्रपणे निर्माण केले आहे, हे म्हणणे त्यांना मान्य नाही. केवळ ईश्वर व विश्व यांत तादात्म्य मानून कुठलेही स्पष्टीकरण न देता, ते हा प्रश्न कसा तरी निकालात काढतात. तसेच ईश्वराच्या केवलत्वामुळे व अनंतत्वामुळे ते एवढे भारावून जातात की, सर्वसामान्यपणे अनेक धर्मांतून आढळणारी व अतिशय लोकप्रिय असलेली ऐकांतिक स्वरूपाची मानवारोपवादी विचारसरणीही ते नाकारतात. इतकेच नव्हे, तर लोत्सेने मांडलेल्या युक्तिवादाचाही ते विचार करीत नाहीत. ईश्वराला व्यक्तिमत्त्व असल्याचे व ते व्यक्तिमत्त्व त्याच्या अनंतत्व आणि केवलत्व ह्या धर्मांशी सुसंगत असल्याचे लोत्से म्हणतो. ईश्वराचे केवलत्व व अनंतत्व ह्या दोन धर्मांचे समाधानकारक स्पष्टीकरण देणे, चराचरेश्वरवादाला शक्य होत नाही; कारण जर ईश्वर विश्वात अंतर्लीन (Absorbed) होत नसेल (विश्वसत्यवाद) किंवा सर्व विश्व ईश्वरात अंतर्लीन होत नसेल (जगन्मिथ्यावाद), तर ईश्वर आणि विश्व यांतील भेद मान्य करणे क्रमप्राप्तच ठरते. हा भेद मान्य केल्यानंतर ईश्वर व विश्व यांत नेमके कोणते संबंध आहेत, याचे स्पष्टीकरण देणेही क्रमप्राप्तच ठरते. ह्या संबंधांचे जे स्पष्टीकरण ईश्वरवादानुसार दिले गेले, ते समाधानकारक असो वा नसो; परंतु ईश्वरवादाला ही समस्या जाणवली व ती सोडविण्याचा त्याने प्रामाणिक प्रयत्न केला. चराचरेश्वरवाद मात्र ह्या समस्येस तोंड न देता बगल देऊन मोकळा होतो. सर्वसामान्य माणूसही ईश्वर व विश्व यांतील भेद गृहीत धरूनच चालतो; परंतु चराचरेश्वरवादाने मात्र त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. ईश्वराचे व्यक्तिमत्त्व नाकारून चराचरेश्वरवाद खालच्या पातळीवरील व्यक्तिमत्त्वहीन अशी एकता किंवा पूर्णता पुरस्कारितो आणि तिलाच पूजनीय मानतो. चराचरेश्वरवादात आणि मानवारोपवादात म्हणूनच विरोध येतो.

व्यवहारात व्यक्तीचा ईश्वराशी असलेला धार्मिक व नैतिक संबंधही चराचरेश्वरवाद नाकारतो आणि त्याऐवजी अंशाचा किंवा भागाचा पूर्णाशी असलेला संबंध पुरस्कारितो. म्हणूनच चराचरेश्वरवादात आत्मसाक्षात्कार किंवा जिवाचा ईश्वराशी संबंध, ह्या उद्दिष्टांना स्थान उरत नाही. त्याचे उद्दिष्ट अंशरूप आत्म्याचे संपूर्णरूप ईश्वरात विलीनीकरण हेच असू शकते. आत्मसाक्षात्कार आणि ईश्वरापाशी शरणागती, ह्या आध्यात्मिक व भक्तिमार्गी धार्मिक बाबींना चराचरेश्वरवाद पारखा आहे. त्यात व्यक्तीला व्यक्ती म्हणून स्थान नाही, तर केवळ पूर्णाचा एक अंश किंवा भाग म्हणूनच व्यक्तीची संभावना होते आणि ओघानेच व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि आत्म्याचे अमरत्व यांनाही त्यात स्थान उरत नाही.

संदर्भ :