बोंडासहित काजू

काजू हा सदाहरित वृक्ष अ‍ॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी हे फळ भारतात दक्षिण अमेरिकेतून आणले. पोर्तुगीज भाषेत त्याला काजू म्हणतात. मराठीतही तेच नाव रूढ झाले आहे.

काजूचे झाड फार काटक असते. त्याची उंची सु. १२ मी. असते. कधीकधी तो विस्तारलेला असतो. बुंधा आखूड, जाड व वाकडातिकडा असतो. पाने मोठी व अंडाकृती, टोकाला गोल व चिवट असून त्यांची वरची बाजू चकचकीत असते. फुले लहान व पिवळी असून त्यांवर गुलाबी छटा असतात. फांद्यांच्या टोकास ती स्तबकात जानेवारी-मार्चमध्ये येतात. काजूच्या फळाचे आभासी फळ आणि खरे फळ असे दोन भाग असतात. आभासी फळ लहान सफरचंदाच्या आकाराचे, पिवळ्या रंगाचे, फुगीर व रसाळ असते. यालाच बोंडू म्हणतात. बोंडू खाल्ले जाते. बोंडूपासून सरबत आणि मद्यही तयार करतात. या मद्याला फेणी म्हणतात. काजूचे खरे फळ (काजूगर) मूत्रपिंडाकृती हिरवट व पिवळ्या नारिंगी रंगाचे असून त्यावर कठिण कवच असते. या कवचात कॉस्टिक ऑइल असते. काजूगरांना उष्णता देऊन हे तेल वेगळे करतात. तसे न केल्यास या तेलामुळे त्वचेवर फोड येतात. कवच वेगळे केले की काजूचे बी मिळते. काजूचे बी भाजून सालपट वेगळे केले की काजू मिळतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासरी ६८ किग्रॅ. फळे व ९ किग्रॅ बिया मिळतात.

काजूची लागवड सर्वसाधारणपणे बियांपासून रोपे तयार करून केली जाते. भारतात विशेषत: केरळ राज्यातील महाराष्ट्र; कोकण व कोल्हापूर जिल्ह्याचा भाग; गोवा; तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली, तंजावर व दक्षिण अर्काट हे जिल्हे; आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा, नेल्लोर, गोदावरी व विशाखापटनम हे जिल्हे आणि कर्नाटक राज्यातील दक्षिण व उत्तर कानडा जिल्हे या प्रदेशांत काजूची प्रामुख्याने लागवड केली जाते.

काजूत पुढीलप्रमाणे घटक असतात. पाणी (५.९ %), प्रथिने (२१.२ %), स्निग्ध पदार्थ (४६.९ %), कर्बोदके (२२.३ %), खनिजे (२.४ %), कॅल्शियम (०.०५ %) आणि फॉस्फरस (०.४५ %), काजूचे पोषणमूल्य प्रति १०० ग्रॅमला ५९० कॅलरी आहे. काजू पौष्टिक, शामक, वेदनाहारक व अतिसाररोधी आहे. मूळ रेचक असते. काजूपासून काजू-तेल मिळते.

केसाचे गळणे थांबविण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी तसेच सौंदर्यप्रसाधनांत हे तेल उपयुक्त आहे. काजू आणि काजूतेल भारतातून निर्यात केले जाते. परदेशी चलन मिळवून देणारा हा एक मोठा उद्योग आहे.

सुक्या मेव्यातील काजू हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. काजू बी भाजल्यास त्याच्या वासात आणि स्वादात वाढ होते. याखेरीज ते खारवून किंवा तळून खातात. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई तयार करण्यासाठी, अन्नपदार्थ सजविण्यासाठी काजूचा उपयोग केला जातो. काजूच्या झाडाची साल स्तंभक असून तीपासून टॅनीन (९ %) आणि एक प्रकारचा डिंक मिळतो. हा डिंक जंतुनाशक असून कुष्ठरोग, नायटा व जखमा बर्‍या होण्यासाठी याचा उपयोग करतात. सालीपासून कपड्यावर खुणा करण्यासाठी न पुसली जाणारी शाई मिळवितात. काजूगराचे तेल बदामाच्या तेलासारखे असून पेंडीचा उपयोग पौष्टिक खाद्य म्हणून होतो. टरफलापासून मिळणारे तेल होड्या, मचवे व मासे पकडण्याची जाळी समुद्राच्या पाण्यामुळे खराब होऊ नये म्हणून त्यावर आवरण देण्यासाठी वापरतात. जलाभेद्य रंग, व्हार्निश, रंगद्रव्ये, मोटारींचे गतिरोधक अस्तर वगैरेंच्या निर्मितीमध्ये तेलाचा उपयोग होतो. काजूचे लाकूड तांबूस वा तपकिरी रंगाचे व कठिण असते. त्याचा उपयोग होड्या, मालाची खोकी व कोळसा तयार करण्यासाठी करतात.