कापूस : उघडलेली बोंडे

कापूस हा एक वस्त्रनिर्मितीकरिता लागणारा वनस्पतिजन्य मऊ, पांढरा व तंतुमय पदार्थ आहे. कपाशीच्या बोंडापासून कापूस मिळतो. कपाशी ही उष्ण प्रदेशीय वनस्पती माल्व्हेसी कुलातील आहे. कपाशीच्या लागवड केल्या जाणार्‍या गॉसिपियम आर्बोरियम(देवकापूस), गॉ.हर्बेशियम, गॉ.हिरसुटम आणि गॉ. बार्बाडेन्स या चार जाती मुख्य आहेत. यांपैकी देवकापूस ही जात मूळची भारतातील आहे. आफ्रिकेचा उत्तरेकडील भाग व आशियाचा प्रदेश हे कापसाचे मूळ स्थान आहेत. मूळची ही उष्ण प्रदेशीय वनस्पती असून सध्या सर्वाधिक कापूस उत्पादनक्षेत्र समशीतोष्ण प्रदेशात आहे.

कपाशीचे झुडूप ०.६ ते १ मी.पर्यंत उंच वाढते. ही वर्षायू किंवा बहुवर्षायू प्रकारची वनस्पती आहे. हिच्या खोडावर भरपूर फांद्या असतात. पाने साधी, हस्ताकृती व ३-९ खंडांत विभागलेली असतात. फुले पांढरी पिवळट असतात. फळ (बोंड) स्फुटनशील असते. बोंडातील पांढ-या कमीजास्त लांबीच्या तंतूंनी वेढलेल्या बियांना सरकी म्हणतात. बिया आकाराने गोलसर असून साधारणपणे काळ्या रंगाच्या असतात. सरकीपासून कापूस वेगळा करण्यासाठी लाटण यंत्र व चक्री करवत यंत्र यांचा प्रामुख्याने उपयोग होतो. तंतुविरहित सरकीचा उपयोग जनावरांसाठी खाद्य व तेलबियांसाठी होतो.

कापूस व कापसाचा सुती वस्त्रांसाठी होणारा उपयोग यांविषयीचे ज्ञान भारतीयांना प्राचीन काळापासून होते. मोहें-जो-दडो येथील उत्खननात सर्वांत जुने व कातलेले सूत सापडले आहे. इ.स. सातव्या शतकात कापूस भारतातून चीनमध्ये गेला. भारतातून कापसाचा प्रसार केवळ पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांमध्ये झाला. कापड विणण्याची कला भारतापासून इतर देशांना माहीत झालेली आहे. इ.स.पू. पंधराव्या शतकापासून ते इ.स.एकोणिसाव्या शतकापर्यंत (सु. ३४०० वर्षे) भारत कापूस उद्योगात आघाडीवर होता.

कापसापासून मिळविलेल्या धाग्यांपासून (सुतापासून) वस्त्रे विणली जातात. शिवाय विविध प्रकारचे दोरे व दोरा बनविण्यासाठी, गाद्या-उश्या भरण्याकरिता तसेच टायरमधील धाग्यांसाठी कापसाचा उपयोग करतात.

निर्जंतुक केलेला कापूस वैद्यकीय क्षेत्रात वापरला जातो. प्रक्रिया करून तयार करण्यात येणा-या गन कॉटन, रेयॉन इ. नायट्रोसेल्युलोजांसाठी आणि लिनोलियम, प्लॅस्टिक इत्यादींसाठीही कापसाचा उपयोग करतात. त्याच्या विविध उपयोगांमुळे कापसाला ‘पांढरे सोने’ असेही म्हटले जाते.