हे शोभेचे झुडूप कंपॉझिटी कुलातील टॅजेटस प्रजातीमधील आहे. सूर्यफूल, डेलिया वनस्पती याच कुलात समाविष्ट आहेत. टॅजेटस प्रजातीच्या काही जाती वर्षायू तर काही बहुवर्षायू असून त्या सर्व जातींना सामान्यपणे मेरीगोल्ड म्हणतात. ही वनस्पती मूळची मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील असून जगभर तिचा प्रसार झालेला आहे. भारतात या प्रजातीतील तीन जाती प्रामुख्याने आढळतात: टॅजेटस इरेक्टा, टॅ.पॅट्युला आणि टॅ.टेन्युफोलिया. भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत झेंडूची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात.
झेंडूचे झुडूप १ ते २.२ मी. उंच वाढते. खोड व फांद्या दंडगोल, सरळ, ग्रंथियुक्त असतात. पाने खंडित, एकांतरित, जाड व केसाळ असतात. पानांतील ग्रंथीमुळे त्यांना विशिष्ट प्रकारचा वास येतो. झेंडूचे फूल हे केवळ एकच फूल नसून तो एक फुलोरा आहे. फुले स्तबकात येत असून ते चेंडूसारखे गोल आणि ३-४ सेंमी. व्यासाचे असते. फुले कोणत्या तरी एकाच ठळक रंगाची असून ती भडक पिवळी, नारिंगी किंवा क्वचित पांढरी असतात.
झेंडूला रोगांपासून आणि कीटकांपासून फारसा उपद्रव होत नाही. तसेच ते कोणत्याही जमिनीत वाढत असल्याने त्याची सर्वत्र लागवड होते. झेंडूच्या फुलांपासून ल्युटिन हे कॅरोटिनयुक्त रंगद्रव्य मिळवितात. तसेच या फुलांमधून मिळणाऱ्या तेलात प्रतिऑक्सिडीकारके असतात. फुले कडू व तुरट असून ती वायुनाशी आणि दातांच्या विकारावर उपयोगी पडतात. त्वचेच्या विकारांवरही फुले उपयुक्त असून खरजेवर त्यांचा वापर होतो.
झेंडूमध्ये थायोफिन प्रकारची कार्बनी संयुगे असतात, ती गोलकृमींचा नाश करतात. झेंडूची लागवड टोमॅटो, वांगी, मिरची, तंबाखू, बटाटा अशा पिकांबरोबर करतात. भारतात झेंडूच्या फुलांच्या माळा वेगवेगळ्या समारंभामध्ये व दसरा-दिवाळीला शोभेसाठी आणि हार पूजेसाठी वापरतात.