कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफियाप्रजातीमध्ये असलेल्या वृक्षांच्या फळांतील बियांपासून कॉफीची भुकटी बनवितात. कॉफी वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉफिया अरॅबिकाअसे आहे. या जातींची लागवड जगाच्या विविध भागांत होते. कॉफी मूळची आफ्रिकेतील असून पंधराव्या शतकात ती इथिओपियातून अरबस्तानात आणली गेली. त्यानंतर मध्य आशियातील ठिकाणांहून तिचा प्रसार यूरोपात साधारणत: सोळाव्या आणि सतराव्या शतकांत झाला. याच सुमारास जावा व इतर बेटे आणि नंतर ब्राझील, जमेका, क्यूबा, मेक्सिको या उष्णकटिबंधातील प्रदेशांत तिचा प्रसार झाला.
भारतात कॉफी १६०० च्या सुमारास आणली गेली. कर्नाटक, केरळ, तमिळनाडू व आंध्र प्रदेश ही दक्षिणेकडील राज्ये कॉफीची लागवड प्रामुख्याने करतात. भारतात बहुतांशी कॉ. अरॅबिक आणि कॉ. रोबस्टाया दोन जातींची लागवड होते. कॉफीच्या उत्पादनात ब्राझील हा देश जगात प्रथम क्रमांकावर आहे.
या सदाहरित लहान वृक्षाची वा झुडपाची उंची ४-६ मी. पर्यंत असते; परंतु त्याची उंची मुद्दाम ४ मी. पेक्षा कमी ठेवतात. पाने गर्द हिरवी, समोरासमोर, साधी व चकचकीत असतात. पानांच्या मध्ये झुपक्याने पांढरी सुवासिक फुले येतात. कॉफीची मृदू फळे अंडाकृती, मध्यभागी खाच असलेली असून साधारण १-५ सेंमी. लांबीची असतात. फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. सुकल्यानंतर ती किरमिजी होऊन नंतर काळी पडतात. फळे पिकण्यास साधारण ७ ते ९ महिने लागतात. फळात प्रत्येकी दोन बिया असतात. बियांची एक बाजू सपाट तर दुसरी फुगीर असते. सु. ५-१० % फळांत दोनांऐवजी एकच बी असते. अशा फळांना पी बेरी म्हणतात.
बिया भाजतात व त्या दळून पूड बनवितात. कॉफीची पूड उघडी राहिल्यास बाष्प शोषून घेते वा तिचा वास व स्वाद कमी होऊन खराब होते. कायम टिकविण्याकरिता पूड हवाबंद डब्यांत, पिशव्यांत व काचेच्या बरण्यांमधून साठवितात आणि विक्रीकरिता पाठवितात. काही ठिकाणी चिकोरी वनस्पतीच्या मुळाची पूड कॉफीची चव व तिच्या स्वादात विविधता आणण्यासाठी मिसळतात. कॉफीचे पेय व्यक्तिगत आवडीनुसार कडवट, गोड, कडक व सौम्य अशा स्वरूपात तयार केले जाते. पेय तयार करण्याच्या काही विशिष्ट पद्धती प्रचारात आहेत. कॉफीपासून झटपट विरघळणारी वा ‘इंन्स्टंट कॉफी’ बनविण्याकरिता बिया भाजून दळलेल्या पुडीचा पाण्यातील अर्क वाळविलेला असतो. ही पूड तपकिरी रंगाची असून हिचे कण सुटेसुटे व एकसारख्या आकाराचे असतात. ‘एस्प्रेसो’ नावाने ओळखली जाणारी कडक कॉफी तयार करण्यासाठी कॉफीच्या बिया अधिक न करपविता भाजतात.
कॉफीमधील कॅफीन या अल्कलॉइडामुळे मज्जासंस्था उत्तेजित होते. या उत्तेजनामुळे श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, चयापचय व उत्सर्जन यांचा वेग वाढतो. म्हणून या पेयाच्या सेवनामुळे तरतरी आल्यासारखे वाटते. वाजवी प्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीरावर अनिष्ट परिणाम होत नसल्याचे दिसते; पण काहींच्या बाबतीत कॉफीमुळे बद्धकोष्ठतेसारखे विकार उद्भवतात. अफू, अल्कोहॉल आणि इतर मादक पदार्थांमुळे झालेल्या विषबाधेवर कडक कॉफी एक प्रभावी इलाज आहे.
कॅफीनविरहित कॉफीदेखील उपलब्ध असते. यासाठी क्लोरोफॉर्म किंवा बेंझीन यांसारख्या विद्रावकांच्या साहाय्याने ओल्या बियांपासून कॅफीन वेगळे करतात. नंतर नेहमीप्रमाणे वाळवून व भाजून दळल्यावर कॉफी तयार होते. वेगळे केलेले कॅफीन इतरत्र वापरले जाते.