टेटू हा पानझडी वृक्ष बिग्नोनिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ऑरोझायलम इंडिकम आहे. हा वृक्ष मूळचा भारत आणि चीनमधील असून भूतान, श्रीलंका आणि फिलिपीन्समध्येही दिसून येतो. पाडळ, निळा मोहोर या वनस्पती बिग्नोनिएसी कुलातील आहेत. या कुलातील वनस्पतींची फुले आकाराने मोठी आणि रंगीत असल्याने यातील वृक्ष शोभेसाठी बागांमध्ये लावतात. भारतात हा सर्वत्र दाट वनांत आढळतो.

टेटूची फळे

टेटू टेटू हा वृक्ष सु. १२ मी.पर्यंत उंच वाढतो. बुंध्याचा व्यास १०–२५ सेंमी. असून साल गुळगुळीत, फिकट तपकिरी दिसते. पाने संयुक्त, समोरासमोर, मोठी व १–३ मी. लांब असतात. पर्णिका लंबगोलाकृती अगर अंडाकृती परंतु टोकदार असतात. फुले उन्हाळ्याच्या अखेरीस पावसाळ्याच्या मध्यापर्यंत येतात. ती रात्री उमलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. ती फांद्यांच्या टोकाला सरळ ३०–६० सेंमी. लांब उभ्या झुपकेदार फुलोऱ्यात १० ते २० संख्येने येतात. फुल ६–१० सेंमी. लांब व गडद लाल असून त्याचा आकार तुतारीसारखा असतो. पाकळ्या मांसल व दुर्गंधी असून त्यांच्या कडा नागमोडी व झालरीसारख्या दुमडलेल्या असतात. फळे (शेंगा) ४०–९० सेंमी. लांब व ५–६ सेंमी. रुंद, चपटी व टोकदार असून तलवारीसारखी दिसतात. या शेंगा हस्तिदंताप्रमाणे दिसतात म्हणून त्यांना हस्तिदंतफल असे म्हणत असावेत. शेंग वाळल्यावर ती दोन भागांत उकलते आणि असंख्य पांढऱ्या व चपट्या बिया वाऱ्याबरोबर उडत जातात. वटवाघळांमार्फत परागण होण्यासाठी या वनस्पतीची फुले अनुकूलित झालेली असतात.

टेटूच्या मुळांची साल च्यवनप्राश तयार करण्यासाठी वापरतात. कोवळी फळे, बिया आणि पाने औषधात वापरतात. त्यात ओरोझायलीन नावाचे औषधिद्रव्य असते. सालीची पूड हळदीमध्ये मिसळून जनावरांच्या जखमेवर लावतात. कोवळे शेंडे आणि कच्च्या फळांची भाजी करतात.