(फॅल्कन). एक शिकारी पक्षी. ससाण्याचा समावेश फॅल्कॉनिडी कुलात केला जातो. या कुलाच्या फॅल्को प्रजातीत ससाण्याच्या सु. ४० जाती आहेत. अंटार्क्टिका वगळता हा पक्षी जगात सर्वत्र आढळतो. भारतात या पक्ष्याच्या सु. १५ जाती दिसून येतात आणि त्यांपैकी ३-४ जाती निवासी आहेत. महाराष्ट्रात त्याला बहिरी ससाणा असेही म्हणतात. बहिरी हा शब्द अरबी भाषेतील बाहिरी शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ ‘चलाख, हुशार’ असा होतो.  ससाणा आपली शिकार चोचीने करतो. इतर शिकारी पक्षी शिकारीसाठी पायांच्या नख्यांचा वापर करतात. ससाण्याच्या शरीराच्या लांबीत जातींनुसार विविधता आढळते. लहान जातीच्या ससाण्याची लांबी सु. २५ सेंमी. असून सर्वांत मोठ्या ससाण्याच्या शरीराची लांबी सु. ६५ सेंमी. आढळली आहे. शरीराच्या तुलनेने मोठे डोके, भेदक डोळे, डोळ्यांखाली असलेले उठून दिसणारे पट्टे, आखूड व बाकदार चोच आणि पायांच्या बोटांवर बाकदार नख्या ही त्यांच्या शरीराची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या रंगांमध्येही विविधता असते, एकाच जातीचे नर व मादी दिसायला सारखे असतात. मादी नरापेक्षा मोठी असते.

ससाण्याचे उड्डाण अतिशय वेगवान असते. त्यामुळे तो भक्ष्याची शिकार चपळतेने करतो. जसे फॅल्को पेरिग्रिनस जातीचा ससाणा हवेतून खाली येताना साधारणपणे प्रति तास ३२० किमी. वेगाने उतरतो. ससाणे अन्नासाठी उडणारे कीटक, लहान पक्षी, जमिनीवरील सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी यांची शिकार करतात. भक्ष्य पकडताना ते नख्यांचा वापर करतात आणि भक्ष्याच्या पाठीचा कणा चोचीने तोडून त्याला मारतात व खातात. डोंगरांच्या कपारी, वनांच्या कडांलगतची शेते, पाणथळ जागा, झाडांच्या ढोली, डोंगराळ समुद्रकिनारे अशा ठिकाणी त्यांचे वास्तव्य असते. ते स्वत:चे घरटे बांधत नाहीत. ते क्वचितच २० वर्षांपेक्षा जास्त जगतात.

लग्गड ससाणा (फॅल्को जुग्गर)

भारतात ‘लग्गड ससाणा’ या सामान्य नावाने ओळखली जाणारी जाती सर्वत्र आढळते. या जातीचे शास्त्रीय नाव फॅल्को जुग्गर आहे. तो इराण, अफगाणिस्तान, भूतान, म्यानमार, नेपाळ आणि बांगला देश या देशांतही आढळतो. लग्गड ससाण्याच्या शरीराची लांबी ४०–४५ सेंमी. असून वजन ५००–८५० ग्रॅ. असते. शरीराची वरची बाजू तपकिरी असून तिच्यात करड्या रंगाच्या छटा असतात. छातीवर तपकिरी रेषा व पोटावर तपकिरी ठिपके असतात. चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना मिशांसारखे तपकिरी पट्टे असतात; पंख लांब व टोकदार असतात. चोच बाकदार व किंचित फिकट निळसर रंगाची असते. पाय पिवळे असतात.

लग्गड ससाणा हा खुरटी झाडे किंवा झुडपे असणाऱ्या रानात, माळरानात, वनात किंवा शेताच्या आसपास राहतो. नर व मादी जोडीने वावरतात आणि शिकार मिळून करतात. एखाद्या उंच ठिकाणी बसून सतत टेहाळणी करीत राहाणे आणि भक्ष्य किंवा लहान पक्षी दिसल्यास पाठलाग करून पकडणे अशी यांची शिकार करायची पद्धत आहे. तो शेतातले उंदीर, सरडे, चतूर पकडून खातो. मात्र कावळे, कोतवाल यांसारखे पक्षी एकत्र येऊन त्यांना हाकलून देतात.

ससाण्याचा प्रजननकाळ जानेवारी–मे असा असतो. घरटे कावळ्यांसारखेच काटक्यांचे असून त्यावर पाने, गवत टाकलेले असते. ते वृक्षावर किंवा कड्यावर उंच जागी असते. मादी ३–५ अंडी घालते. ती करड्या रंगाची असून त्यांवर ठिपके असतात.

(१) ससाणा (मायक्रोहिरॅक्स सीरूलेसन्स), (२) ससाणा (फॅल्को चिकेरा).

भारतात कायम राहणाऱ्या ससाण्याच्या आणखी दोन जाती आढळतात. त्यांची शास्त्रीय नावे अनुक्रमे मायक्रोहिरॅक्स सीरूलेसन्स आणि फॅल्को चिकेरा अशी आहेत. त्यांपैकी मायक्रोहिरॅक्स सीरूलेसन्स जातीची लांबी सु.१८ सेंमी. असून वजन ३०–५० ग्रॅ. असते. भारताचा पूर्वोत्तर प्रदेश (उत्तराखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, सिक्कीम, आसाम) ते म्यानमार, कंबोडिया, लाओस, थायलंड, मलेशिया, व्हिएटनाम या देशांत तो आढळतो. डोके व पाठीचा भाग काळा असून छाती व पोटाकडील भाग नारिंगी रंगाचा असतो. फॅल्को चिकेरा या ससाण्याच्या शरीराची लांबी ३०–३५ सेंमी. असते. डोक्याचा भाग भडक लालसर-तपकिरी असतो. पाय आणि मेदूर (चोचीवरचा मऊ भाग) पिवळ्या रंगाचे असतात.

ससाणा (फॅल्को पेरिग्रिनस)

यूरोप खंडातील ससाण्याची एक जाती फॅल्को पेरिग्रिनस हिवाळ्यात भारतात येते व उन्हाळ्यात परत जाते. त्याच्या शरीराची लांबी ३४–५८ सेंमी. असून वजन ५५०–१,५०० ग्रॅ. असते. डोके काळे व शरीर काळपट असते. पोटाकडाचा भाग गुलाबी – पांढरा असतो. दिसायला तो आकर्षक असतो.

पाळीव व प्रशिक्षित ससाण्यांद्वारे शिकार करण्याच्या खेळाला फाल्कनरी म्हणतात. या खेळात सामान्यपणे ससाण्याच्या मादीचा वापर केला जातो.