रॅनन्क्युलेसी कुलातील ॲकोनिटम प्रजातीमधील दोन जाती भारतात बचनाग या नावाने ओळखल्या जातात. काळे तीळ, रानजाई व घाट लार्कस्पर या वनस्पतीही रॅनन्क्युलेसी कुलातील आहेत. ॲकोनिटम प्रजातीतील वनस्पती यूरोप आणि अमेरिकेतील थंड व डोंगराळ भागांत वाढत असून त्या सर्व कमीअधिक प्रमाणात विषारी असतात. बचनागाच्या काळा बचनाग (ॲकोनिटम फेरोक्स) आणि दुधिया बचनाग (ॲकोनिटम नॅपेलस) या दोन्ही जाती  भारतात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये फुलतात.

काळा बचनाग (ॲकोनिटम फेरोक्स) : पाने व फुलोरा

काळा बचनाग: (इंडियन ॲकोनाइट). भारतात ही वनस्पती मुख्यत: हिमालयात समुद्रसपाटीपासून सु. ३,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात (उदा., पुष्पघाटी किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स), पश्‍चिम बंगालमधील दार्जिलिंगच्या टेकड्या इ. ठिकाणी आढळते. ती साधारणपणे १-२ मी. उंच वाढते. ती पानझडी असून हिवाळ्यात हिमवृष्टीमुळे बर्फाखाली गाडली जाते;  परंतु जमिनीतील कंद बहुवर्षायू असल्यामुळे टिकून राहतो आणि पुढच्या उन्हाळ्यात त्याला धुमारे फुटतात. पाने साधी, एकाआड एक, मध्यम आकाराची व सु. १० सेंमी. लांब असून अनेक खंडांत विभागलेली असतात. फुलोरा मंजरी प्रकारचा असतो. फुले मोठी, आकर्षक, निळसर जांभळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. फुलातील एक पाकळी फडेप्रमाणे असते व तिने बाकीच्या पाकळ्या आच्छादलेल्या असतात. फुलांचे परागण मधमाश्यांमार्फत घडून येते. पुनरुत्पादन कंदामार्फत तसेच बियांपासूनही होते.

दुधिया बचनाग (ॲकोनिटम नॅपेलस) : पाने व फुलोरा

दुधिया बचनाग: (मंक्सहूड). भारतात ती हिमालयाच्या डोंगराळ भागात दिसून येते. शोभेसाठी तिची बागेत लागवड करतात. पाने साधी व हस्ताकृती असून अनेक खंडांमध्ये विभागलेली असतात. फुले भडक जांभळी असतात; कधीकधी फुले पांढरी आढळतात. या वनस्पतीचे खोड, पाने व फुले विषारी असतात.

दोन्ही बचनागांच्या मुळांपासून स्यूड-ॲकॉनिटीन नावाचे अल्कलॉइड काढतात. ते विषारी असून औषधी असते. ते मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्यास मळमळ, ओकाऱ्या, अतिसार, श्‍वासावरोध, स्नायुदुर्बलता, आचके इ. लक्षणे दिसून येतात व कधीकधी मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे तज्ज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच या वनस्पतीचा औषध म्हणून वापर केला जातो. समचिकित्सा (होमिओपॅथी) उपचार पद्धतीत बचनागाचा विविध प्रकारे वापर होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा