पॅरान्थ्रोपस बॉइसी ही प्रजात २३ लक्ष ते १२ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. या प्रजातीचे जीवाश्म १९५५ मध्ये आढळले. तथापि ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञा मेरी लिकी यांना १९५९ मध्ये टांझानियात ओल्डुवायी गॅार्ज येथे कवटीचा एक जीवाश्म (ओएच-५ / झिंझ / नटक्रॅकर मॅन) मिळाला. पुरामानवशास्त्रज्ञ लुई लिकी यांनी त्याचे झिंझान्थ्रोपस बॉइसी  असे नामकरण केले. आता ही प्रजात पॅरान्थ्रोपस बॉइसी या नावाने ओळखली जाते. लुई लिकींच्या पुरामानवशास्त्रीय मोहिमेला भरीव आर्थिक पाठबळ देणारे चार्ल्स बॉइस यांच्या सन्मानार्थ ‘बॉइसीʼ हे नाव आहे.

‘नटक्रॅकर मॅनʼ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेला ओएच-५ जीवाश्म हा या प्रजातीचा अधिकृत नमुना आहे. या नर प्राण्याच्या मेंदूचे आकारमान ५३० घ. सेंमी. होते. या प्रजातीचे जीवाश्म पूर्व आफ्रिकेत केनिया, इथिओपिया, टांझानिया आणि मालावी या विस्तृत भूभागात आढळले आहेत. ओल्डुवायी गॅार्जशिवाय केनियन पुरामानवशास्त्रज्ञ रिचर्ड लिकी यांना १९६९ मध्ये केनियात कूबी फोरा येथे मिळालेला केएनएम-इआर ४०६ (नराची कवटी) आणि  केएनएम-इआर ७३२ (मादीची कवटी) हे इतर महत्त्वाचे जीवाश्म आहेत. यातील केएनएम-इआर ४०६ हा जीवाश्म आणि केएनएम-इआर ३७३३ हा होमो इरेक्टस जीवाश्म एकाच स्तरात मिळाले आहेत. पॅरान्थ्रोपस आणि होमो पराजातींचे एकाच भागात सहअस्तित्व होते, याचा हा सर्वांत महत्त्वाचा पुरावा आहे. एकाच वेळी एका पर्यावरणीय सुस्थानात एकच प्रजाती राहू शकते, हा पुरामानवशास्त्रज्ञ मिलफोर्ड एच. वॉल्पॉफ (जन्म १९४२) यांचा १९६० ते १९७० दरम्यान प्रचलित असलेला सिद्धांत बरोबर नसल्याचे दिसून आले.

पॅरान्थ्रोपस बॉइसीचा सर्वांत जुना जीवाश्म (२६ लक्षपूर्व) इथिओपियात ओमो नदीच्या पात्रात मिळाला आहे, तर सर्वांत अलीकडचा जीवाश्म (१४ लक्षपूर्व) इथिओपियात कोन्सो येथे मिळाला आहे. कोन्सो येथील जीवाश्माचा (केजीए१०-५२५) शोध १९९३ मध्ये लागला. याखेरीज टांझानियात पेनिन्ज येथे १९६४ मध्ये मिळालेला १४ लक्ष वर्षांपूर्वीचा खालचा जबडा हा एक महत्त्वाचा पुरावा आहे.

पॅरान्थ्रोपस बॉइसी नरांची सरासरी उंची १३७ सेंमी. व सरासरी वजन ४९ किग्रॅ. होते. तर माद्यांची सरासरी उंची १२४ सेंमी. व सरासरी वजन ३४ किग्रॅ. होते. होमो या पराजातीला समांतर अशी सुमारे दहा लक्ष वर्षांच्या अवधीत झालेली मेंदूची वाढ (१०० घ. सेंमी.) हे या प्रजातीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यांचे खालचे जबडे दणकट असून दाढांचे दात पॅरान्थ्रोपस रोबस्टसपेक्षाही आकाराने मोठे होते. इतर पॅरान्थ्रोपस प्रजातींप्रमाणे चघळण्यासाठी बळकट स्नायूंना आधार पुरवणारा लांबलचक उंचवटा (सममितार्धी शिखा) कवटीच्या मध्यभागी होता. शरीराचा छोटा आकार आणि तुलनेने मोठे दणकट डोके हे इतर पॅरान्थ्रोपस प्रजातींप्रमाणे असून दातांवरील लुकनचे (इनॅमल) आवरण जाड होते. एवढे जाड लुकनचे आवरण इतर कोणत्याही होमिनिड प्रजातींत आढळत नाही. हे प्राणी कठीण आवरण असलेले आणि भरपूर वेळ चघळणे गरजेचे असणारे वनस्पतिजन्य अन्न खात असावेत हे स्पष्ट असले, तरी सर्वसाधारणपणे या प्रजातीच्या प्राण्यांचा आहार पॅरान्थ्रोपस रोबस्टसप्रमाणे असून ते सर्वभक्षी होते.

संदर्भ :

  • Constantino, P. J.; Wood, B. A. ‘The Evolution of Zinjanthropus boiseiʼ, Evolutionary Anthropology : 16, pp. 49-62, 2007.
  • Leakey, L. S. B. A New Fossil Skull from Olduvai, Nature: 184, pp. 491-494, 1959.
  • Ungar, P. S.; Grine, F. E. & Teaford, M. F. ‘Dental Microwear and Diet of the Plio-Pleistocene hominin Paranthropus boiseiʼ, PLOS ONE : 3, 2008.

                                                                                                                                                                                                                         समीक्षक : शौनक कुलकर्णी