अश्मीभूत लाकूड जीवाश्म (Petrified wood fossil) यामध्ये जीवाश्माचा आकार, आकारमान व रचना ही थेट मूळच्या सांगाड्यासारखी असतात. पण मूळच्या घटकाची जागा एखाद्या निराळ्याच रासायनिक संघटनाच्या खनिजाने (Mineral Composition) घेतलेली असते. मुरणाऱ्या पाण्यातील एखाद्या द्रव्याची आणि सांगाड्याच्या घटकांची कणाकणाने अदलाबदल होऊन असे जीवाश्म तयार होतात. उदा., वृक्षांच्या खोडांचे  काष्ठतंतूंच्या (Cellulose) जागी गारेची (Silica) स्थापना होते. जैव पदार्थाच्या (Organic) जागी खनिज पदार्थ (Mineral matter – Inorganic) आणणाऱ्या प्रक्रियेस अश्मीभवन (Petrification) म्हणतात.

तमिळनाडू राज्यातील सत्तानूर (पेराम्बलूर जिल्हा) येथील राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय अश्मीभूत लाकूड जीवाश्म उद्यान स्मारकामध्ये मध्यजीव महाकल्पातील (Mesozoic Era) क्रिटेशस कल्पातील शेवटच्या टप्प्याच्या काळातील (Upper Cretaceous Period; सु. १०० द.ल. वर्षांपूर्वीचे) अस्तित्वात असलेल्या वृक्ष – वनस्पतींच्या मोठ्या खोडांचे अश्मीभूत जीवाश्म आढळतात. ह्या वनस्पती शंकू -सूचिपर्णी वृक्ष/कॉनिफ़ेर (Conifer; फुले नसणारी) प्रजातीच्या असून त्यांनी त्या वेळची सर्व जमीन व्याप्त केलेली होती. येथील जीवाश्मीत झालेले झाडांचे ओंडके १८ मी. पेक्षा जास्त लांबीचे आहेत.

हे राष्ट्रीय स्मारक उद्यान सत्तानूर गावाच्या उत्तरेला अंदाजे ७०० मी. अंतरावर आहे. चेन्नई (तमिळनाडू) या राजधानीच्या शहरापासून तिरुचिरापल्ली (Tiruchirapalli) शहराला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४५ वरून शिरुवचचूर (Shiruvchchur) गावापर्यंत आल्यास तेथून १४ किमी. पूर्वेकडे सत्तानूर गावापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे.

संदर्भ :

  • संकेतस्थळ – Geological Survey of India, https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी