पानफुटी (ब्रायोफायलम पिनॅटम): पाने

पानफुटी ही क्रॅसुलेसी कुलातील बहुवर्षायू वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ब्रायोफायलम पिनॅटम आहे. ती कलांचो पिनॅटा या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. तसेच तिला कॅथेड्रल बेल्स, एअर प्लांट व कटकटक अशीही नावे आहेत. पानफुटी मूळची आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातील आहे. तिचे शाकीय पुनरुत्पादन सोप्या व सहज प्रकारे होत असल्यामुळे तिचा प्रसार जगात सर्वत्र झाला आहे. कमी पाणी असलेल्या जागी ती शोभेकरिता लावतात.

मुकुल फुटलेले पानफुटीचे पान

 

 

 

 

पानफुटी १-१·५ मी. उंच वाढते. खोड साधारण चौधारी, लालसर व पोकळ असते. तिला खूप पाने असतात. पाने साधी,  ७–१० सेंमी. लांब व लंबवर्तुळाकार असून गडद हिरवी व मांसल असतात. पानांच्या कडांवर बेचक्यांत असलेल्या मुकुलांपासून नवीन पाने फुटतात, म्हणून या वनस्पतीला पानफुटी म्हणतात.

पानफुटीची फुले

फुलोरा खोडाच्या टोकाला येत असून फुले घंटेप्रमाणे लोंबती असतात. ती लहान व फिकट गुलाबी असतात. पुटकफळ चार कप्प्यांचे असून त्यात अनेक, लहान व गुळगुळीत बिया असतात.

संधिवात, उच्च रक्तदाब आणि दाह यांसारख्या व्याधींवरील अनेक पारंपरिक औषधांमध्ये पानफुटी वनस्पती वापरतात. भारतात तिच्या पानांचा रस मूत्राशयाच्या व‍िकारांवर देतात. अर्बुदाची वाढ रोखण्यासाठी तसेच कीटकनाशक म्हणूनही पानफुटीचा वापर होतो.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा