बाष्पोत्सर्जन प्रक्रियेत जमा झालेले पाणी

वनस्पतींची पाने, खोड आणि फुले यांच्यामार्फत वनस्पतींमधील अतिरिक्त पाणी सूर्यप्रकाशात बाष्परूपाने बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला बाष्पोत्सर्जन म्हणतात. बाष्पोत्सर्जन आणि बाष्पीभवन या वेगवेगळ्या क्रिया आहेत. बाष्पोत्सर्जनाची क्रिया घडण्यासाठी ऊर्जेची गरज असते. वनस्पतींमध्ये बाष्पोत्सर्जन प्रामुख्याने वनस्पतींच्या पानांवर असलेल्या पर्णरंध्रांद्वारे होते. बहुतेक वनस्पतींमध्ये पर्णरंध्रे पानांच्या खालच्या बाजूला अधिक असतात. प्रत्येक पर्णरंध्राभोवती दोन संरक्षक पेशी आणि त्यांच्या पर्णरंध्र सहायक पेशी असून त्यांच्याद्वारे पर्णरंध्रे उघडतात किंवा बंद होतात. पर्णरंध्रे उघडल्यावर बाष्पोत्सर्जन तसेच प्रकाशसंश्लेषणासाठी वनस्पतींना हवा असलेला कार्बन डायऑक्साइड हवेपासून विसरीत होण्याची क्रिया घडून येते. बाष्पोत्सर्जनामुळे वनस्पतींचे तापमान कमी होते, पेशींचा परासरण दाब (अर्धपार्यपटलातून पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी द्रावणावर दिलेला किमान दाब) बदलतो तसेच खनिजयुक्त पोषकद्रव्ये आणि पाणी यांचा एकत्रित प्रवाह वनस्पतींच्या मुळांपासून शेंड्यापर्यंत पोहोचतो. पर्णरंध्रांची संख्या जेवढी अधिक तेवढे बाष्पोत्सर्जन अधिक घडून येते.

बाष्पोत्सर्जन प्रक्रिया

वनस्पतीच्या मुळांनी शोषलेले पाणी त्यांच्या पानांपर्यंत पोहोचण्यामागे काही प्रमाणात केशाकर्षण (कॅपिलरी ॲक्शन) ही क्रिया असली तरी प्रामुख्याने दाबाच्या फरकामुळे पाणी वर चढते. सामान्यपणे मुळांमध्ये पाणी परासरणाद्वारे शोषले जाते आणि पाण्याबरोबर विरघळलेले घटक काष्ठ ऊतींमधून वाहून नेले जातात. उंच वनस्पतींमध्ये, शेंड्याकडील पानांच्या पर्णरंध्रामधून मोठ्या प्रमाणात पाणी वातावरणात टाकले जाते. त्यामुळे तेथे पाण्याचा दाब कमी होतो आणि मुळांकडून शोषलेले पाणी (गुरुत्वाकर्षण बलाच्या विरूद्ध दिशेने) जोराने वर ढकलले जाते. वनस्पतींनी घेतलेल्या पाण्यापैकी केवळ १–२% पाणी वाढीसाठी आणि चयापचय क्रियांसाठी वापरले जाते, तर ९८% पाणी बाहेर टाकले जाते. उदाहरणार्थ, सूर्यफुलाचे रोप १४४ दिवसांच्या आयु:कालात सु. २७ लि. पाणी बाहेर टाकते. म्हणजेच दिवसाकाठी ते सु. १८७•५ मिली. पाणी बाहेर टाकते.

सामान्यपणे वनस्पतींमध्ये बाष्पोत्सर्जन कोणत्याही तापमानाला आणि सतत होत असते. पानांतील स्कंभ पेशी (पॅलिसेड सेल) पाण्याने गच्च भरलेल्या असतात. पेशीद्रवातील पाण्यामुळे पेशीभित्ती पाण्याने संपृक्त (संहत) असतात. त्यातून विसरण क्रियेने पर्णरंध्रातून पाणी बाहेर पडते. रात्री पर्णरंध्रे बंद होत असल्याने बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी होतो. हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, तापमान, सूर्यप्रकाश इत्यादींचा बाष्पोत्सर्जनावर परिणाम होतो. पर्णरंध्राची छिद्रे कमी-जास्त उघडून वनस्पती बाष्पोत्सर्जनाचा दर नियमित राखतात. जमिनीतील पाणी आणि जमिनीचे तापमान यांनुसार बाष्पोत्सर्जनाचा दर ठरतो. ज्या वनस्पतींचा पर्णसंभार मोठा असतो, त्या वनस्पतींमध्ये अधिक बाष्पोत्सर्जन घडून येते आणि पाणी जास्त बाहेर टाकले जाते. मोठ्या आकाराच्या पानांमध्ये लहान पानांच्या तुलनेने बाष्पोत्सर्जन वेगाने घडून येते. ज्या पानांवर मेणचट क्युटिनस्तर असतो अशा पानांमधून पाणी आणि बाष्प (पर्णरंध्रे वगळता) बाहेर पडण्याचे प्रमाण कमी असते. तसेच ज्या पानांवर लहान- केसांसारखी प्ररोम असतात अशाही पानांतून बाष्पोत्सर्जन कमी प्रमाणात होते. वाढलेल्या तापमानामुळे बाष्पोत्सर्जन वाढते आणि वनस्पतींमधील पाणी घटते. कोरड्या वातावरणात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढतो. काही मरू वनस्पतींमध्ये जेव्हा पाणी कमी होते तेव्हा त्यांची पाने कोमेजतात आणि पाण्याचे प्रमाण पूर्ववत झाले की पाने पुन्हा उमलतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा