स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील एक गण. चिचुंद्री, झाडावरील चिचुंद्री, छछुंदर (मोल) इ. प्राण्यांचा या गणात समावेश होतो. या गणाची जगभर १० कुले असून भारतात टुपाइडे, एरिनेसिइडे, सोरीसिडे आणि टालपिडे अशा चार कुलांतील प्राणी आढळतात. महाराष्ट्रात टालपिडे वगळता अन्य तीन कुलांमधील प्राणी दिसून येतात.
कीटकाहारी प्राण्यांच्या शरीराचे डोके, मान, धड आणि शेपूट असे चार भाग आहेत. त्यांच्या सर्वांगावर दाट केस असतात. बहुतांशी प्राण्यांच्या पाठीवरील केस राठ असतात. या सर्व प्राण्यांचे तोंड पुढे आलेले असते. दात दिसायला सारखे असून पटाशीचे दात, सुळे, उपदाढा व दाढा यांत बरेच साम्य असते. फरक करावायाचा झाला, तर जबड्यातील दातांच्या ठिकाणावरून करता येतो. हात आणि पाय आखूड असून त्यांना नखे असलेली पाच बोटे असतात. हे प्राणी तळव्यांवर चालतात. कान लहान व डोळे अगदी बारीक असतात. बहुतेक जातींमध्ये जननेंद्रिय आणि उत्सर्जन इंद्रिये एका सामाईक मार्गे बाहेर उघडतात. मेंदू लहान असून तुलनेने अविकसित असतो. नरामध्ये वृषणकोश नसतात. वृषण शरीर पोकळीत असतात. त्यांच्या शरीराला नेहमी उग्र वास येतो.
कीटकाहारी गणातील प्राण्यांचे मुख्य अन्न कीटक, त्यांची अंडी व अळ्या असते. काही वेळेला हे प्राणी गोगलगायी, पाली, पक्ष्यांची अंडी, साप, छोटे उंदीर, फळे, झाडांची मुळेही खातात. हे प्राणी झाडावर अथवा जमिनीखाली बिळे करून राहतात. ते आकाराने लहान असतात. यांच्या गणातील सर्वांत लहान प्राणी चिचुंद्री असून, त्याची लांबी ७-८ सेंमी. व वजन सु. १.५ किग्रॅ. असते, तर मोठा प्राणी टेनरेक असून त्याची लांबी सु. ५० सेंमी. असते. चिचुंद्री वगळता इतर सर्व प्राणी निशाचर आहेत.
सु. ९ कोटी वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेला कीटकाहारी गण हा सस्तन प्राण्यांमध्ये वयाने सर्वांत मोठा गण आहे. अपरास्तनी उपवर्गाच्या सर्व गणांचा उगम या प्राण्यांपासून झालेला दिसतो. हे प्राणी स्तनी वर्गाच्या विकासाच्या प्राथमिक अवस्थांमधील आहेत.