पिसे ही पक्ष्यांच्या बाह्यत्वचेवरील वाढ असून त्यांचे शरीरावर वैशिष्ट्यपूर्ण आवरण असते. पिसांमुळे पक्ष्यांचे शरीर झाकले जाते आणि शरीराला विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्यांच्या साहाय्याने पक्षी उडतात, उडत असताना झेप, दिशा आणि वेग यांवर नियंत्रण करतात, शरीराचा तोल सांभाळतात व वातावरणानुसार शरीराचे तापमान नियमित करतात. प्रणयाराधन आणि विणीच्या हंगामात नर व मादी एकमेकांना आकर्षित करण्यासाठी पिसांचा वापर करतात. डायनोसॉरांच्या थेरोपोडा या उपगणातील प्राण्यांपासून पक्षिवर्गाची उत्क्रांती झाली आहे. डायनोसॉर हे चतुष्पाद सरडे होते. म्हणजे उत्क्रांतीमध्ये या सरड्यांच्या खवल्यांपासून पिसे तयार झाली असे म्हणता येईल. प‍िसे हलकी, लवचिक परंतु मजबूत असून बीटा-केराटिनापासून बनतात, तर सस्तन प्राण्यांचे केस, शिंगे व खूर ही अल्फा-केराटिनापासून बनतात. पक्ष्यांची पिसे दोन मुख्य प्रकारची असतात : (१) उड्डाण पिसे व (२) कोमल पिसे.

उड्डाण पिसे : उड्डाण पिसे मोठ्या आकाराची असून ती पक्ष्यांचे पूर्ण शरीर झाकून टाकतात. या पिसांचे पाते सपाट व रुंद असून त्याच्या मध्यभागी तळाकडून टोकाकडे निमुळता होत गेलेला काडीसारखा पिच्छ-दंड असतो. पिच्छ-दंडाचा तळाकडील भाग पोकळ असून तो पक्ष्यांच्या त्वचेमध्ये घुसलेला असतो. त्वचेच्या ज्या जागांपासून पिसे उत्पन्न होतात, त्या जागांना पिच्छ-नेत्र म्हणतात. पिच्छ-दंडाचा दुसऱ्या टोकाकडील भाग भरीव असून त्याला प्राक्ष म्हणतात. प्राक्षापासून अनेक पिच्छके निघालेली असतात. या पिच्छकांपासून पाते बनलेले असते. प्रत्येक पिच्छकावर अनेक पिच्छिका असून त्यांवर लहानलहान अंकुश असतात. या अंकुशांद्वारे पिसांमधील पिच्छके एकमेकांमध्ये अडकलेली असतात. या संरचनेमुळे पक्षी उडत असताना त्यांच्या पिसांना मजबुती आणि लवचिकता प्राप्त होते. पात्यांवर अचानक हवेचा जोरदार झोत आल्यास काही वेळा हे अंकुश बाजूच्या पिच्छकांपासून अलग होतात. मात्र, त्यामुळे पाते फाटत किंवा तुटत नाही. पिच्छके विसकळित झाल्यास पक्षी त्यांच्या चोचीने ती पूर्ववत करतात.

कोमल पिसे : पक्ष्यांच्या त्वचेवर सर्वत्र कोमल पिसे वाढतात. या पिसांचा प्राक्ष आखूड असतो. त्यामुळे सर्व पिच्छके त्याच्यावरील एकाच बिंदूपासून निघाल्यासारखी दिसतात. कोमल पिसांवर अंकुश नसल्यामुळे त्यांचे पाते सैल व मऊ भासते. लहान पक्ष्यांच्या शरीरावर उड्डाण पिसे वाढण्याआधी कोमल पिसे वाढतात.

पक्ष्यांच्या शरीरावर आणखी एका प्रकारची पिसे आढळतात. ती म्हणजे रोमल पिसे (रोम-पिच्छे). त्यांना एक लांब तंतुसारखा अक्ष असून त्याच्या टोकाला कमजोर पिच्छकांचा झुबका असतो. त्यांची संख्या कमी असते.

पिसाची संरचना

बहुतेक पक्ष्यांची पिसे शरीरावर रांगेत वाढतात. पिसांच्या विशिष्ट मांडणीमुळे पक्ष्यांची त्वचा उघडी राहत नाही. पक्ष्यांच्या डोक्याचा वरचा भाग, पाठ, खांद्यापासून पंखापर्यंतचा भाग आणि पाय या अवयवांवर पिसे वाढतात. पिसांची वाढ पूर्ण झाली की ती कोरडी होतात व त्यांची झीज होते. मात्र पिसांची झीज भरून निघत नाही. झिजलेली पिसे गळून पडतात आणि त्या जागी नवीन पिसे येतात. याला निर्मोचन म्हणतात. पक्ष्यांच्या जातीनुसार वर्षातून एकदा किंवा अधिक वेळा त्यांची पिसे गळतात. जसे, प्रौढ कोंबड्याचा पिसारा वाढण्यापूर्वी त्याची पिसे अनेक वेळा गळतात. वेगाने उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये शरीराच्या दोन्ही बाजूच्या पंखांमधील पिसे सारख्याच संख्येने गळतात. त्यामुळे उडताना त्यांचे शरीर समतोल राहते. अनेक पाणपक्ष्यांची पिसे एकाच वेळी गळतात. म्हणून पिसांची वाढ पूर्ण होईपर्यंत ते उडू शकत नाहीत.

पिसांमधील रंगद्रव्ये आणि पिसांच्या संरचनेतील अन‍ियम‍ितपणामुळे प्रकाशाच्या अपवर्तनाने पिसांना वेगवेगळे रंग प्राप्त होतात. पिसांमधील रंगद्रव्यांमुळे ती पिवळी व लाल दिसतात; प्रकाशाच्या अपवर्तनामुळे ती निळी व सप्तरंगी दिसतात. रंगद्रव्याच्या अभावी ती पांढरी दिसतात. पिसांच्या रंगांमुळे मायावरण साधले जात असल्याने पक्ष्यांना अन्न मिळविणे सोपे जाते. तसेच अनेकदा त्यांचे शत्रूपासून संरक्षण होते. पिसांचा आकृतिबंध आणि रंग यांनुसार अनेक पक्ष्यांतील नर व मादी ओळखणे सोपे जाते.

पक्ष्यांची शेपटी लांब पिसांची बनलेली असते आणि बहुतेक पक्ष्यांमध्ये शेपटीतील पिसांची संख्या निश्चित असते. अनेक पक्ष्यांच्या शेपटीमध्ये पिसांच्या सहा जोड्या असतात. पक्ष्यांच्या शरीरावरील पिसांची संख्या देखील ठराविक असते. गाणाऱ्या पक्ष्यांच्या अंगावर ९४० ते २५,००० पिसे असतात. उत्तर ध्रुवाकडील पक्ष्यांच्या अंगावर खूप पिसे असतात आणि ती थंडीपासून संरक्षण होण्यासाठी असतात.

पिसे उष्णतारोधक असल्यामुळे थंड हवामान आणि पाणी यांपासून पक्ष्यांचे संरक्षण होऊन त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखले जाते. शरीराला चिकटलेल्या कोमल पिसांमध्ये गरम हवा कोंडली गेल्याने पक्ष्यांचे शरीर उबदार राहते. काही पक्षी त्यांची अंडी तसेच पिले सुरक्षित राहण्यासाठी घरट्यात पिसे पसरवून ठेवतात. मानवी प्रदूषणामुळे जी पायसकारके पाण्यात सोडली जातात, त्यांच्यामुळे पिसांची जलरोधकता कमी होते. तेलगळतीमुळे पिसे तेलकट होतात. अशा पक्ष्यांना पिसे साफ करणे किंवा उड्डाण करणेही अशक्य होते. परिणामी पिसांमध्ये पाणी साचले जाऊन पक्षी बुडून मरतात.

मनुष्याने वेगवेगळ्या कारणांसाठी पिसांचा वापर केलेला आहे. अमेरिकेतील रेड इंडियन आदिम जमाती शेकडो वर्षे बाण आणि शिरोभूषण तयार करण्यासाठी पिसांचा वापर करीत असत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लेखणी म्हणून पिसांचा वापर झाल्याचे दिसून येते. काही ठिकाणी बिछाने आणि उश्या भरण्यासाठी पिसांचा वापर केला जातो. केवळ पिसांकरिता कित्येक पक्ष्यांचा नाश झाल्याने काही पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून अनेक देशांनी शोभेच्या वस्तूंमध्ये पिसांचा वापर करण्यावर बंदी घातली आहे.

https://www.youtube.com/watch?v=2FNfM0AD4xk

प्रतिक्रिया व्यक्त करा