कुचला वनस्पती

लोगॅनिएसी कुलातील या वृक्षाचे शास्त्रीय नाव स्ट्रिक्नॉस नक्स-व्होमिका असून, तो सु. १२-१५ मी. उंच वाढतो. दमट मान्सून वनात वाढणारा हा पानझडी वृक्ष कोकणात, तसेच समुद्रकिना-यावरच्या जांभ्याच्या जमिनीत विपुल आहे. भारतातील उष्ण प्रदेशाशिवाय श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया इ. प्रदेशांत याचा प्रसार आहे.

या वृक्षाची साल पातळ, करडी व गुळगुळीत असून त्यावर वल्करंध्रे असतात. तीवर आखूड, तीक्ष्ण बळकट व कक्षास्थ काटे असतात. पाने साधी, अंडाकृती, समोरासमोर, लघुकोनी, चिवट व चकचकीत असतात. ती उन्हाळ्यात गळून पडतात. फुले हिरवट पांढरी लवदार व शेड्यांकडे त्रिशाखी गुलुच्छीय वल्लरीत असून मार्च महिन्यामध्ये फुलतात. पुष्पमुकुट अरुंद नळीसारखा असतो. फळ लहान संत्र्यासारखे रंगीत असते. त्याच्या गरामध्ये ३-५ करड्या वाटोळ्या, लवदार व बशीच्या आकाराच्या बिया असतात. बियांमध्ये २.६-३% अल्कलॉइडे, त्यापैकी स्ट्रिक्निन १.२५-१.५०% व ब्रूसिन १.७% असते. याशिवाय तेल व रंगद्रव्ये असतात.

कुचल्याच्या बिया

लाकूड कठिण, टिकाऊ व वाळवीपासून सुरक्षित असते. ते शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, सजावटी सामान यांसाठी उपयुक्त असते. बिया कडू, उग्र, उष्ण, भूक वाढविणा-या असून अधिक प्रमाणात विषारी असतात. त्यातील स्ट्रिक्निन या अल्कलॉइडाची क्रिया मज्जासंस्थेवर आणि स्नायूतंत्रावर होऊन झटके येतात, रक्तदाब वाढतो व नाडी मंदावते. मुळांच्या सालीची पूड पटकीवर देतात. अळ्या पडलेल्या जखमांवर पानांचे पोटीस बांधतात. आयुर्वेदीय उपचारांमध्ये बियांपासून केलेले चूर्ण बद्धकोष्ठ आणि अपचनावर वापरण्यात येते. इतर आयुर्वेदिक चूर्णाबरोबर दिल्यास आतड्याच्या हालचालीस मदत होते. घोड्यांना होणा-या काही आजारांवर कुचल्याच्या बियांचे चूर्ण प्रभावी आहे. होमिओपॅथी उपचारपद्धतीमध्ये सूक्ष्म प्रमाणात नक्स-व्होमिका अनेक तक्रारीवर वापरण्यात येते.

कुचल्याच्या बिया अनवधानाने पोटात गेल्यास झालेल्या विषबाधेवर वांती करण्यासाठी सौम्य द्रावण पिण्यात देतात. २० ते ३० मिग्रॅ. स्ट्रिक्निन पोटात गेल्यास प्राणघातक ठऱते.