अस्थिमत्स्य वर्गाच्या पर्सिफॉर्मीस गणाच्या सिचलिडी कुलातील एक मासा. याचे शास्त्रीय नाव ओरिओक्रोमिस मोझाम्बिका असून पूर्वी तो तिलापी मोझाम्बिका असा ओळखला जात असे. तो मूळचा दक्षिण आफ्रिकेतील असून १९५२ मध्ये तमिळनाडू राज्यातील सेंट्रल मरीन फिशरी रिसर्च स्टेशन, मंडपम् या संस्थेत मत्स्यशेतीसाठी आणण्यात आला. त्यानंतर त्याचा अन्य राज्यांत मत्स्यशेतीसाठी प्रसार करण्यात आला. तो मूळचा खाऱ्या पाण्यातील मासा आहे; परंतु तो मचूळ आणि गोड्या पाण्यातही वाढू शकतो. जलद होणारी वाढ आणि कोणत्याही अधिवासात टिकून राहण्याची अत्युच्य क्षमता हे तिलापी माशाचे विशेष गुणधर्म आहेत. तिलापी माशाचे शरीर किंचित चपटे असून रंग फिकट हिरवा किंवा काळसर असतो. पृष्ठपर लांब असून त्याच्या पुढच्या भागावर काटे असतात. पृष्ठपर आणि पुच्छपरांच्या कडा पिवळसर असतात. प्रौढ तिलापी मासा सु. ३६ सेंमी. पर्यंत लांब असून वजन सु. १.१ किग्रॅ. असते. शरीरावर कंकनाभ (टेनॉइड) खवले असतात; परंतु पृष्ठपर आणि गुदपर यांच्या बुडाशी खवले नसतात. शैवाल, वनस्पतींचे छोटे तुकडे, डायाटम, कीटक आणि कवचधारी संधिपादांचे डिंभ हे या माशाचे अन्न आहे.

तिलापी मासा पर्यावरणातील सामान्य बदल सहन करू शकतो. तो गढूळ पाण्यात, कमी ऑॅक्सिजन असलेल्या, मचूळ किंवा खाऱ्या पाण्यातही राहू शकतो आणि वाढू शकतो. त्याच्या या वैशिष्ट्यामुळे जलाशयातील किंवा पाझर तलावातील मत्स्यशेतीसाठी वापरला जातो.
तिलापी मासा दुसऱ्या महिन्यात प्रजननक्षम होतो. त्यांचे प्रजनन वेगाने घडते. मादी एका वर्षात ४–६ वेळा अंडी घालते आणि अंडी लाखांच्या संख्येत घातली जातात. नर मासा जलाशयाच्या तळाशी लहानसा खड्डा करतो आणि मादी त्यात अंडी घालते. या अंड्यांचे फलन नर मासा घडवून आणतो. त्यानंतर मादी अंड्यांतून पिले बाहेर येईपर्यंत तिच्या मुखपोकळीत अंडी धरून ठेवते आणि काही काळ ती पिलांनाही मुखपोकळीत सांभाळते.
रोहू, कटला, मृगळ यांच्याबरोबर गोड्या पाण्यात तिलापी मासे वाढविण्यात येतात. प्रजननाचा दर जास्त असल्यामुळे यांची गर्दी होते व त्यामुळे ते अतिरिक्त ठरतात. असे अतिरिक्त मासे काढून ते मरळीसारख्या इतर माशांना अन्न म्हणून देतात. तिलापी माशांमध्ये संपृक्त मेद, ऊष्मांक, कर्बोदके आणि सोडियम यांचे प्रमाण कमी असले तरी प्रथिनांचे ते उत्तम स्रोत आहेत. त्यांच्यात ओमेगा-३ चे प्रमाण कमी तर ओमेगा-६ चे प्रमाण जास्त असते. ओमेगा-३ हे हृदयविकारावर गुणकारी असते.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.