अमरकान्त : (१ जुलै १९२५-१७ फेब्रुवारी २०१४). हिंदीतील श्रेष्ठ आणि यशस्वी कथालेखक. ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. प्रेमचंद यांच्यानंतर यथार्थ,वास्तववादी कथालेखन करणारे कथालेखक म्हणून त्यांची ओळख आहे. हिंदी साहित्यातील नवकथा आंदोलनात राकेश मोहन, कमलेश्वर, निर्मल वर्मा इ. अनेक साहित्यिकांसमवेत त्यांचा सहभाग होता. कथेइतकेच त्यांचे कादंबरीलेखनही लक्षणीय आहे. उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यातील नगाराजवळील भयमलपूर गावी त्यांचा जन्म झाला. अलाहाबाद विश्वविद्यालयात बी.ए. झाल्यानंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली.१९४२ च्या स्वातंत्र्यचळवळीतील नेत्यांच्या संपर्कात आल्यावर ते त्यात सहभागी झाले. जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
सुरुवातीला अमरकान्त गझल आणि लोकगीते गात असत. त्यांच्या साहित्यजीवनाची सुरुवात पत्रकारितेने झाली. अनेक पत्रिकांचे त्यांनी संपादन केले.१९५५ मध्ये लिहिलेल्या ‘डिप्टी कलेक्टर’ या कथेने त्यांना प्रसिद्धी मिळाली. कथा, कादंबरी,आत्मकथन आणि बालसाहित्य या प्रकारात त्यांचे साहित्य प्रकाशित झाले असून एक यथार्थ कथाकार म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. जिन्दगी और जोक, एक धनी व्यक्तीका बयान, देश के लोग, मौत का नगर, मित्र मिलन तथा अन्य कहानियाँ , कुहासा, तूफान, कला प्रेमी, प्रतिनिधि कहानियाँ, सुख और दुःख के साथ, जांच और बच्चे आणि औरत का क्रोध हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित आहेत. याशिवाय सूखा पत्ता(१९५९) काले उजले दिन,कँटीली रात के फूल,ग्रामसेविका,सुख-जीवी,बीच की दीवार,आकाशपक्षी,लहरे, बिदा की रात आणि इन्ही हथियारोंसे या त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळातील कनिष्ठ मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गीय जीवन त्यांच्या जगण्यासाठीचा मोठा संघर्ष,धडपड,तरीही जीवनाप्रती असलेला आशावाद त्यांच्या कथांमध्ये दिसून येतो.स्वातंत्र्योत्तर काळात देशात औद्योगिक संस्कृतीचा विकास पुरेसा झालेला नव्हता आणि सामाजिक कौटुंबिक संबंधातही थोडे बदल होऊ घातले होते. अशा वातावरणाचं चित्रण अमरकान्त यांच्या कथांतून अधिकतर दिसतं.त्यांच्या एकूणच लेखनावर गांधीवादी विचारसरणीचा,अहिंसक मार्गाचा प्रभाव दिसून येतो.त्यांच्या कथातील अनेक व्यक्तिरेखा सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त असल्या तरी त्या धूर्त,बेईमान अशा आहेत.नेते,अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराचे उपहासात्मक चित्रण त्यांनी केले आहे. त्यांच्या लेखनाला गावच्या मातीचा स्पर्श आणि गंध असल्याने वाचक भारावून जातात. अमरकांत यांच्या कथांमध्ये असणारी मूलभूत तत्वे म्हणजे तीव्र करुणा, सामाजिक वास्तवाची समज आणि ऐतिहासिक आणि पुरोगामी जीवनदृष्टी. अमरकान्त यांच्या ‘डीप्टी कलेक्टर,‘दोपहरका भोजन,‘जिंदगी और जोक,‘हत्यारे’ या स्वातंत्र्योत्तर कथालेखनातील वैशिष्ट्यपूर्ण कथा आहेत.
अमरकान्त यांच्या एकूण अकरा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पण कथालेखनापुढे त्या थोड्या मागे पडलेल्या वाटतात.इन्ही हथियारोंसे ही कादंबरी बलिया जिल्ह्यातील भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. पण त्यात स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रीय नेत्यांच्या चित्रणापेक्षा,स्वातंत्र्याचं स्वप्न साकार करण्यासाठी जीवावर उदार होऊन लढणाऱ्या गावातील जीवनाशी एकरुप असलेल्या सामान्य स्त्री-पुरुषाचं ठळक चित्रण आहे. त्यांची सुखा पत्ता ही कादंबरी ही त्याकाळातील श्रेष्ठ कादंबरी मानली जाते. मित्राने लिहिलेली डायरी वाचून,त्यांना कादंबरी लिहावीशी वाटली.मित्राची परवानगी घेऊन घटना,प्रसंग तसेच ठेवून फक्त व्यक्तिरेखांची नावे बदलून,काही महिन्यातच त्यांनी या कादंबरीचे लेखन केले. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तरप्रदेशातील गावांचा चेहरा,रूप आणि कथानायक कृष्णची ही कथा आहे. किशोरवयातून तारुण्यात प्रवेश केल्यावर विद्यार्थी मनातील तरंग, अनुभव याचं चित्रणं करीत त्यांनी कृष्ण-उर्मिला प्रेमकथा लिहिली असली तरी, त्या निमित्ताने त्यांनी कृष्णाचा मित्र मनमोहनच्या व्यक्तिरेखेतून,या वयातील मानसिक विकृती,कृष्णाच्या क्रांतिकारी चित्रणातून युवावस्थेतील अपरिपक्वतता चित्रित केली आहे. कृष्ण-उर्मिला प्रेमकथेच्या संदर्भात समाजातील रूढी-परंपरांवर तीक्ष्ण प्रहार केले आहेत.अत्यंत सूक्ष्मपणे,पण तरीही अत्यंत सहजशैलीतील असे हे चित्रण अमरकांत यांनी केले आहे.
कथा असो वा कादंबरीलेखन असो, जीवन जसे आहे तसचं ते चित्रित करतात.समर्थ लेखकाचं वैशिष्ट्य आहे की, लेखक आपल्या नायक, खलनायकाची तरफदारी किंवा निंदा करीत नाहीत. ते वास्तववादी निवेदनातून वस्तुस्थिती प्रकट करतात. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार (२००७) व्यास सन्मान (२०१०) सोविएट लँड नेहरू पुरस्कार, मैथिलीशरण गुप्त पुरस्कार, उत्तरप्रदेश हिंदी संस्थानचा पुरस्कार, यशपाल पुरस्कार, मध्यप्रदेशाचा अमरकान्त कीर्ति पुरस्कार आणि जन-संस्कृती पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या कथांवर आधारित नाट्यरूपांतर आणि चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. अमरकान्त अतिशय संकोची स्वभावाचे होते.आपल्या हक्कांबाबतही ते संकोची होते. बिकट परिस्थितीतही प्रकाशकांकडे पैसे मागण्याचा त्यांना संकोच वाटत असे.
अलाहाबाद येथे त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
संदर्भ :
https://onlinehindijournal.blogspot.com/2010/04/blog-post_6468.html