मास्ती वेंकटेश अय्यंगार : (जन्म – ६ जून १८९१ – मृत्यू – ६ जून १९८६). प्रख्यात कन्नड कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार व समीक्षक. ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. श्रीनिवास या टोपणनावाने त्यांनी काव्य व कथालेखन केले. आधुनिक कन्नड लघुकथेचे ते जनक मानले जातात. लघुकथेच्या क्षेत्रात सर्वस्वी नवीन तंत्राचा अवलंब करून ती लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.कन्नड प्रांतात अत्यंत कौतुकाने त्यांना ‘मास्ती कन्नडद आस्ती’ (मास्ती कन्नडची संपत्ती) असे संबोधतात. म्हैसूर राज्यातील मास्ती गावाजवळील होंगेन हळळी येथे त्यांचा जन्म झाला.त्यांची मातृभाषा तमिळ,पण सर्व लेखन कन्नडमध्ये आहे.बालपणी त्यांना गरीब परिस्थितीशी सामना करावा लागला.शिवरामपट्टण,म्हैसूर,बंगलोर आणि मद्रास येथे त्यांचे शिक्षण झाले.त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या.अतिशय खडतर परिस्थितीत (वार लावून) त्यांनी एम. ए.(इंग्रजी)ही पदवी मद्रास विद्यापीठातून प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक मिळवून प्राप्त केली.एम. ए. झाल्यावर म्हैसूर राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यावेळ्च्या म्हैसूर संस्थानात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. ते उत्तम प्रशासक म्हणून गणले जात.१९४२ मध्ये ते अबकारी आयुक्ताच्या पदावरून सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून १९६२ पर्यंत त्यांनी जीवन मासिकाचे उत्कृष्ट संपादन करून त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. इंग्रजीवर तसेच संस्कृतवरही त्यांचे चांगले प्रभुत्व होते, नाणावलेले वक्ते म्हणूनही त्यांचा लौकिक होता. ब्रिटिशांच्या इंग्रजीचा मोठा प्रभाव निर्माण झालेल्या काळात त्यांनी मातृभाषेतून बोलणे,लिहिणे कसे प्रतिष्ठेचे आहे त्याचा प्रसार करण्याचे कार्य केले. शिक्षणाचे माध्यम कन्नड असावे व शासकीय कारभाराची भाषाही कन्नडच असावी यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.

बी.ए. ला असतानाच १९१०–११ मध्ये त्यांची पहिली लघुकथा ‘रंगपन्न मदुवे’ (म. शी. रंगाचे लग्न) प्रसिद्ध झाली आणि त्यांनी कन्नड साहित्यक्षेत्रात पदार्पण केले.त्यांच्या प्रकाशित ग्रंथांची संख्या सु. ११८ भरते. त्यांनी भावगीते, कथाकाव्ये. नाटके (गद्य व पद्य), चरित्र, कथा, कादंबरी व कादंबरिका, ललित निबंध, समीक्षा, अनुवाद, आत्मचरित्र इ. प्रकारांत विपुल लेखन केले.चन्नबसव नायक (१९४८), चिक्कवीर राजेंद्र (१९५६) आणि सुब्बण्णा (१९२८) ह्या कादंबऱ्या; सण्ण कथेगळु (१५ खंड-१९२० ते १९७९),मातुगार रामण्णा (१९८५) हे कथासंग्रह; बिन्नह (१९२२),मनवि (१९२२), अरूण (१९२४),तावरे (१९३०), चेलुवु (१९३१),मलार (१९३३),गौडर मल्ली (१९४०),रामनवमी (१९४१),मूकन मक्कळु (१९४३),सुनीत (१९४६),नवरात्री (पाच खंड-१९४४-४८), संक्रांति (१९६९), श्रीरामपट्टाभिषेक (१९७२) हे काव्यसंग्रह; शांता (१९२३),सावित्री (१९२३),उषा (१९२७),तालीकोटे (१९२९),मंजुळा (१९३०),शिव छत्रपती (१९३२),यशोधरा (१९३३),तिरूपाणि (१९३७),काकनकोटे (१९३८),मास्ती (१९५३),अनारकली (१९५५),पुरन्दरदास (१९६४),कनकण्णा (१९६५),भट्टर मगळु (१९६९),बानुलि दृश्यगळु,कालिदास ही नाटके ; साहित्य (१९२४),कन्नड सेवा (१९३०),कर्नाटकद जनतेय संस्कृती (१९३१),आदिकवी वाल्मिकी (१९३८),ताय्नुडीय तम्मडि (१९४४),भारत तीर्थ (१९५२),कर्नाटक जनपद साहित्य (१९३७),कन्नड लोक (१९५७),साहित्यदि आगुव केलस (१९७१),विचार (१९७१), विमर्शे (४ खंड –१९२६, २९, ३३, ३९),उत्तरकांड विचार (पाच खंड-१९४६-८२) इत्यादी विपुल असे त्यांचे साहित्य प्रकाशित आहे.यांव्यतिरिक्त त्यांनी कन्नड भाषा व साहित्य, संस्कृती, साहित्यसमीक्षा, चरित्र, आत्मचरित्र इ. प्रकारचेही  दर्जेदार लेखन केले आहे.शेक्सपिअरच्या काही नाटकांचा संपूर्ण, तर काही नाटकांतील निवडक भागांचा त्यांनी कन्नडमध्ये ‘सरळ रगळे’ म्हणजे निर्यमक पद्यात अनुवाद केला आहे. भाव (३ खंड) मध्ये त्यांचे आत्मचरित्र आले आहे. पॉप्युलर कल्चर इन कर्नाटक (कर्नाटकातील लोकसंस्कृतिविषयक ग्रंथ),पोएट्री ऑफ वाल्मीकि (१९४३), शॉर्ट स्टोरीज (४ खंडांत), सुब्बण्णा, रवींद्रनाथ टागोर (१९४६) इ. त्यांचे इंग्रजी ग्रंथ होत.

आधुनिक भारत निर्मितीच्या महत्त्वपूर्ण काळात ते लिहित होते.त्या संमिश्र काळाची वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातून उमटली. माणसावर मास्तींची नितांत श्रद्धा असून ती त्यांच्या सर्वच लेखनात प्रतिबिंबित झालेली आहे. त्यांनी आपल्या विविध कृतींतून माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याची सुखदुःखे आशा-आकांक्षा, यशापयश, त्याचे बरेवाईट अनुभव यांचे चित्रण केले. नैतिक मूल्यांचा आणि भारतीय परंपरेतील चांगल्या मूल्यांचा त्यांनी हिरिरीने व सतत पुरस्कार केला आहे.त्यांच्या साहित्याची पाळंमुळं भारतीय व कर्नाटकाच्या मातीत घट्ट रूजलेली आहेत.त्यांच्या साहित्यातील निर्मिती केंद्र ‘परिपक्वतेचे काव्य’ असल्याचे सांगितले जाते. त्या काव्याचा संबंध शांतीशी पोहचतो, आवेशाशी नाही. त्यांच्या प्रमुख चित्रित व्याक्तिरेखांतून हेच अधोरेखित होते.मानवी मूल्यांचा प्राप्त परिस्थितीशी होणारा झगडा प्रकाशात आणून ते नेहमी मानवता जपण्याचे धोरण आपल्या सर्व कथावकाशातून राबवितात. ऐतिहासिक साहित्यकृतींची निर्मितीही याच दृष्टीतून ते करतात. चन्नबसव नायक चिक्कवीर राजेंद्र या कादंबऱ्या या दृष्टीतून महत्त्वाच्या आहेत. चन्नबसव नायक मध्ये बिदनूर(शिवमोगा) येथील नायकवंशाच्या पतनाची कथा निदर्शित होते. हैदर अलीची राज्य विस्ताराची दुर्दम्य इच्छा आणि राणी विरम्मा व तिचा पुत्र चन्नबसव यांच्यातील द्वंद्व यांच्या परस्पर संबंधांचे चिंतन येथे प्रस्तुत केले आहे. तर चिक्कवीर राजेंद्र मध्ये कोडगु प्रांतातील कुर्ग संस्थान आणि ब्रिटिश यांच्या सामन्याचा लेखाजोखा चित्रित होतो. या साम्राज्याच्या अवतीभोवती अनेक ताकदी स्थिर होत्या पण डोंगराळ प्रदेश व दऱ्याखोऱ्यांच्या आधाराने आणि राजाच्या सतर्कतेने आजवर स्थिर असणारे राज्य अंतर्गत कलहाचा माग काढणाऱ्या ब्रिटिशांनी संपविले. आपल्या पराभवात बाहेरच्या ताकदीपेक्षाही आत्मस्थितीच कशी कारणीभूत असते त्याची येथे चिकित्सा प्रस्तुत आहे. यामधून मास्ती राजा आणि समाज यांच्या संबंधांचे चिंतनही प्रस्तुत करतात. एकूण त्यांच्या लेखणीने माणसातील थोरपण शोधण्याचा प्रयत्न केला.जीवन म्हणजे माणसाला परिपक्व बनण्यासाठीची संधी असे त्यांचे म्हणणे असे. संघर्षात्मक जगणे असतेच पण माणसाच्या आत जो प्रकाश असतो त्याचा शोध घेण्यासाठी आपल्या लेखणीला त्यांनी झटविले. स्फटिकासारखी स्वच्छ, निर्मळ व सरळ भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले.त्यांच्या कादंबऱ्यातील सुब्बण्णा व त्याची पत्नी ललिता, यशोधरा, चिक्कवीर राजेंद्र आणि गौरम्मा, नेमय्या व त्याच्या मुली शांतव्वा, गौतमी या त्यांनी चित्रित केलेल्या सर्व व्यक्तिरेखांना व्यथांचा वेदनांचा खोल स्पर्श आहे; पण कितीही यातना वाट्यास आल्या तरी मनाची शांती ढळू देऊ नये हे तत्त्व मास्ती त्यांच्या माध्यमातून बिंबवू पाहतात. वेदनेच्या खळबळीत आत्म्याचे सौष्ठव विचलित होता कामा नये हा मास्ती यांचा आग्रह दिसून येतो.

मास्तींचे काव्यलेखन १९३० च्या सुमारास उदयास आलेल्या कन्नड कवींत वैशिष्ट्यपूर्ण आहे. बिन्नह आणि मनविमध्ये त्यांची सर्वस्वी नवीन प्रकारची हरिदासी भक्तीपरंपरेतील भक्तीगीते आहेत, तर मलारमध्ये ‘अष्टषट्पदी’ (सुनीते) आहेत. गौडर मल्ली, रामनवमी, मूकन मक्कळु, श्रीरामपट्टाभिषेक, नवरात्री (५ भागांत) ह्या त्यांच्या कथाकाव्यांत निर्यमक रचना व गद्यसदृश शैली असूनही त्यांत सहजता, प्रवाहीपणा, भावपूर्णता, कल्पनाविलास, जीवनदर्शन इ. गुणविशेष प्रकर्षाने प्रगट झाल्याचे दिसते. श्रीरामपट्टाभिषेकमध्ये त्यांनी राम हा अवतारी पुरुष नसून माणूस आहे व आपल्या सदाचरणाने व कर्तृत्वाने उच्‍चपदी पोहोचल्याचे प्रतिपादन केले आहे. त्यांच्या श्रीरामपट्टाभिषेक या आख्यानात्मक बृहतकाव्यामध्ये दहा हजार काव्यपंक्ती आहेत.मूळ रामायणाचा सखोल अभ्यास, कवीची संवेदनशीलता मौलिकता व चिंतन यांचा परिपाक या त्यांच्या काव्यात दिसून येतो.देवतांच्या, पौराणिक तसेच ऐतिहासिक व वर्तमान काळाचा संदर्भ असलेल्याही कथा त्यामध्ये आहेत. त्यातून मानवी संस्कृतीची गूढ गहनता ते अधोरेखित करतात.माणसाचे जगणे कष्ट मुक्त व्हावे, त्यांना सुखसमाधान प्राप्त व्हावे, हाच त्यांच्या पुढे आदर्श होता.

सरकारी नोकरीनिमित्त कर्नाटकाच्या विविध भागांत त्यांना जावे लागले आणि त्या निमित्ताने अनेक प्रकारची माणसे त्यांना जवळून न्याहाळता आली. मानवी स्वभावाच्या ह्या विविध पैलूंचे सखोल दर्शन त्यांच्या लेखनातून घडते.त्यांच्या स्वभावातच नम्रता व स्वाभिमान यांचे विलक्षण मिश्रण आहे. ते धार्मिक बंधनाच्या पलीकडे आहेत; म्हणूनच त्यांनी विविध धर्मातील थोर व्यक्तींच्या गौरवपर लिहिले आहे. आपण एक कन्नड लेखक व भारतीय असल्याचा त्यांना रास्त अभिमान होता.आपल्या पुरस्काराची रक्कम त्यांनी कन्नड साहित्य प्रकाशनार्थ ठेवल्याचे जाहीर केले आहे.  त्यांना के.एम. पणिक्कर यांनी ‘कन्नड साहित्याचे भीष्माचार्य’ म्हणून  गौरविले आहे.आपल्या प्रदीर्घ साहित्यसेवेत त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली व त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. १९४६ मध्ये मद्रास येथे भरलेल्या दक्षिण भारतीय भाषा परिषदेचे अध्यक्ष, १९६१ मध्ये मुंबईस भरलेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे अध्यक्ष, अखिल भारतीय ‘पेन’ चे उपाध्यक्ष (१९७४) व नंतर अध्यक्ष (१९७६), कन्नड साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष (१९४३) व नंतर अध्यक्ष (१९५३), साहित्य अकादेमीचे फेलो (१९७४) तसेच सदस्य बेळगाव येथे १९२९ मध्ये भरलेल्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इ. मानाची पदे त्यांनी भूषविली आहेत. म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना १९४२ मध्ये ‘राजसेवा प्रसक्त’ हा किताब देऊन तसेच कर्नाटक विद्यापीठाने (१९५६) त्यांना सन्मान्य डी. लिट. देऊन त्यांचा गौरव केला. १९६८ मध्ये सण्ण कथेगळु ह्या त्यांच्या कथासंग्रहास साहित्य अकादेमी पुरस्कार तर साहित्यातील सर्वोच्च असा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे (१९८३).

बेंगलुरू येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

https://www.karnataka.com/personalities/masti-venkatesha-iyengar/

प्रतिक्रिया व्यक्त करा