गीराड्डी गोविंदराज : (१९३९-१० मे २०१८). विसाव्या शतकातील महत्त्वाचे कन्नड लेखक. कथा, कविता, निबंध आणि समीक्षा या प्रांतात त्यांनी मोठया प्रमाणात लेखन केले आहे. समीक्षक म्हणून त्यांची प्रमुख ओळख आहे. त्यांचा जन्म गडग जिल्हयातील अब्बीगेरी या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण त्यांनी जन्मगावीच घेतले. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी शेती करावी. गीराड्डी यांनी वडिलांचा विरोध पत्करून उच्च शिक्षणासाठी धारवाडला प्रयाण केले. महाविद्यालयीन काळात व्ही. के. गोकाक, एस्.एस्. मालवड, व्ही.एम. इनामदार आणि एस्.आर.मालगी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना भाषा आणि साहित्य या विश्वाची ओळख झाली. त्यामुळे त्यांच्यावर भाषासाहित्यविषयक संस्कार झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी काव्यलेखनास सुरुवात केली. प्रारंभी शारदालहरी आणि रसवाणी या नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या.

गीराड्डी यांनी इंग्रजी विषयामध्ये बी.ए. ही पदवी (१९६१) आणि कर्नाटक विद्यापीठातून एम्.ए. ही पदवी (१९६३) संपादन केली. त्यांनी जेथे पदवी पातळीवरचे शिक्षण घेतले त्या कर्नाटक महाविद्यालयातच ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. सी.आय.आय.एल या हैदराबाद येथील संस्थेतून त्यांनी इंग्रजी विषयात पदविका  (१९७०) प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश कौन्सिल फेलोशिप मिळविली (१९७२), ज्याआधारे त्यांनी मॅन्चेस्टर विद्यापीठात भाषाशास्त्र हा विषय घेवून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. यामुळे जागतिक भाषाविश्वात त्यांचा नावलौकिक झाला. त्यांनी गुलबर्गा विद्याापीठामधून शैलीविज्ञान या विषयात पीएच्.डी.पदवी संपादन केली. १९८४ मध्ये ते कर्नाटक विद्यापीठात इंग्रजी विषयाचे रिडर म्हणून रूजू झाले आणि १९९९ साली तेथूनच निवृत्त झाले.

गीराड्डी यांनी विद्यार्थी दशेपासूनच  कविता आणि कथा लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या कथा प्रारंभापासूनच  कन्नड परंपरा आणि आधुनिकता या दोन अक्षावर प्रखर दृष्टीक्षेप टाकतात.त्यांच्या कथांवर चित्रपट आणि दूरदर्शन मालिका बनविण्यात आल्या आहेत. कन्नड साहित्यामध्ये ‘मन्नू’ ही त्यांची कथा आधुनिक कन्नड लघुकथेत मैलाचा दगड ठरलेली कथा आहे. गीराड्डी गोविंदराज यांची साहित्य संपदा विपूल आहे, ती पुढील प्रमाणे – शारदालहरी (१९५६), रसवंती (१९६१), मर्लिन मुनरो आणि इतर कवी (१९७४) हे कवितासंग्रह; आमुख-ईमुख (१९७०), ओंदु बेवीना मराडा कथे  (१९७८), मन्नू (१९७६) ह्या कादंबऱ्या; सना कतेया होसा ओलावुगालु  (लघुकथेतील नवे प्रवाह १९६५), नव्य विमर्श (१९७५), कादंबरी वस्तु मत्तु तंत्र (१९७६), साहित्य मत्तु परंपरे (१९८१), इंगलनदिना रंगभूमी (१९८३),नाटक साहित्य मत्तु रंगभुमी (१९८९),सातत्य (१९९२),वाचन विन्यास (१९९७),कन्नड काव्य परंपरे मत्तु बेंद्रे काव्य (२००४), प्रमाणू (२००७),कल्पित वास्तव (२००९),काव्यवानू कुरीतू (२०१०), हे समीक्षाग्रंथ आणि याशिवाय त्यांचे कन्नड डिग्लोसिया (इंग्रजी,१९९८) आणि सामान्य भाषाशास्त्राचा परिचय  (१९८३) हे भाषाशास्त्रविषयक ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.

कन्नड साहित्यातील विसाव्या शतकातील एक प्रमुख समीक्षक म्हणून गीराड्डी गोविंदराज यांची ख्याती आहे. अध्यापन, संशोधन आणि समीक्षा ही त्यांच्या आयुष्यातील त्रिसूत्री आहे. रूपविज्ञान आणि शैलीविज्ञान या दोन अंगाने त्यांनी त्यांच्या समीक्षेची मांडणी केली आहे. साहित्यकृतीला नजरेसमोर ठेवून एखाद्या समीक्षा सिद्धांताने त्या कृतीचे विवेचन करण्यापेक्षा प्रारंभी मूळ समीक्षा सिद्धांताचे विवेचन आणि नंतर साहित्यकृतीचे त्याआधारे विवेचन अशी त्यांच्या मांडणीची पद्धत आहे. अँग्लो-इंडियन समीक्षापद्धती प्रमाणे गोविंदराज यांनी त्यांच्या समीक्षाकार्यात संकल्पना, तत्त्वे आणि तंत्र या बाबी प्रामुख्याने स्पष्ट केल्या आहेत. त्यांचे कथन हे अत्यंत सूक्ष्म आणि वाचनीय असते. निवेदन आणि भाषा यासंदर्भात ते एखाद्या गुंतागुंतीच्या साहित्यकृतीचेही सूक्ष्म विवेचन करण्यात सिद्धहस्त आहेत. साधनात्मक प्रयत्नांनी  संस्कृतीचे जे अंतर्ज्ञान आणि आत्मभान प्राप्त होते त्याचा साहित्याशी समन्वय करण्याचा प्रयत्न गीराड्डी गोविंदराज यांनी त्यांच्या समीक्षेतून केला आहे.

गीराड्डी गोविंदराज यांना त्यांच्या साहित्यविषयक कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२), कर्नाटक नाटक अकादमी फेलोशिप (१९९३), कर्नाटक राज्य राजोत्सव प्रशस्ती (२००२), श्रीकृष्ण प्रशस्ती (२००२), बी. एच. श्रीधर प्रशस्ती(२००८), गौरीश कैकीनी प्रशस्ती(२०१०), एम्.पी. प्रकाश साहित्यासीरी प्रशस्ती (२०१०), सिरीगन्ननादा राष्ट्रीय रत्न पुरस्कार (२०११), कर्नाटक कल्पवृक्ष पुरस्कार (२०१४), यक्षम्बा कन्नड कुलतीलक पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश  होतो. कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे.

धारवाड येथे त्यांचा हृदय विकाराने मृत्यू  झाला.

संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/giraddi_govindaraj.pdf