उत्तर हिंदुस्थानी संगीतप्रकारातील एक शृंगार रसप्रधान गायन-प्रकार. याचा विषय प्रामुख्याने कृष्णाच्या रासलीला आणि राधा व गोपिकांच्या संगतीने रंगणारी होळी हा असतो. यातील वर्णन सहसा ब्रज भाषेतच असते. पूर्वी होरी धृपद गायक कलाकारच सादर करीत असत. धृपदाप्रमाणेच हा गायन प्रकार भारदस्त आणि बोजदार असे. हा गायनप्रकार धमार तालात गायला जाई, त्यामुळे धमार या प्रकाराला ‘पक्की होरी’ असेही म्हटले जाई. ख्याल गायनाप्रमाणे यात ताना घेतल्या जात नाहीत. बोलबनाव, दुगुण, तिगुन, गमक, बोलतान आदीने हा प्रकार खुलवत नेत असत. अलीकडे या गायनासाठी दीपचंदी तालदेखील उपयोगात आणला जाऊ लागला आहे. होळीच्या सणाच्या वेळी याचे गायन जास्त होते. हल्ली होरी हा गायनप्रकार उपशास्त्रीय संगीतप्रकारात ठुमरीप्रमाणे गणला जातो. गिरिजादेवी, सिद्धेश्वरीदेवी या गायिका होरी गायनासाठी प्रसिद्ध होत्या.

समीक्षक – सुधीर पोटे

#गिरिजादेवी#सिद्धेश्वरीदेवी