आशापूर्णादेवी : (जन्म – ८ जानेवारी १९०९- मृत्यू – १३ जुलै १९९५ ). प्रसिद्ध बंगाली लेखिका. ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानकरी. परंपरेच्या जोखडात बांधलेल्या स्त्रीच्या स्थितीचं, तिच्या प्रश्नाचं एकूणच समस्त बंगाली भावजीवनाचं दर्शन, अत्यंत सहज, सरळ पण प्रभावी शैलीत आपल्या साहित्यातूनत्यांनी घडवलं आहे. कोलकात्याला एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात आशापूर्णादेवींचा जन्म झाला. तत्कालीन सामाजिक स्थितीमुळे त्या शाळेत कधीच गेल्या नाहीत. पण घरात त्यांना अक्षर ओळख करून दिली होती. वडील हरेंद्रनाथ गुप्त चित्रकार होते.आई सरलासुंदरींना वाचनाची विलक्षण आवड होती. त्यामुळे सारं घरचं वाचनवेडाने झपाटलेलं होत.वसुमती साहित्यमंदिराद्वारा प्रसिद्ध झालेली सगळी पुस्तके तर आशापूर्णादेवींनी वाचली होतीच, पण कालीसिंह लिखित महाभारताची पारायणं केली होती. रवींद्रनाथांच्या अनेक कविता, गीते त्यांना पाठ होती. घरामध्ये भाऊ अभ्यास करायला लागला की, ऐकून, ऐकून, त्याच्या पुस्तकात डोकावून, ते धडे, त्या कविता त्यांच्या पाठ होऊन जात असत. रूढार्थाने शालेय शिक्षण झालेले नसले, तरी अशाप्रकारे अक्षर ओळख घरातच झाली होती. बंगाली व्यतिरिक्त कोणतीही भाषा त्यांना येत नव्हती. इंग्रजीचा तर त्यांना गंधही नव्हता. भगवद्गीतेवर त्यांनी नितांत श्रद्धा होती. अशाप्रकारे घरातील वाचन वेड आणि विवाहानंतर पती कालीदास बाबू नाग यांच्या प्रोत्साहनामुळे त्या अविरत लिहित राहिल्या. सारं घरकाम उरकून रात्रीच्या निवांतवेळी, घरातच असलेल्या पतीच्या टाईपराटरवर त्या साहित्यनिर्मिती करू लागल्या.
वयाच्या १३ व्यावर्षी त्यांची ‘बाइ देर डाक’ ही पहिली कतिवा शिशूसाथी मासिकात प्रसिद्ध झाली. त्यांची दोनशेहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १७८ कादंबऱ्या, ३० कथासंग्रह, ४७ बालवाङ्मय स्वरूपातील पुस्तके, शिवाय इतर २५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. प्रेम ओ प्रयोजन (१९४४), अग्नि-परिक्षा (१९५२), छाड़पत्र (१९५९), प्रथम प्रतिश्रुति (१९६४), सुवर्णलता (१९६६), मायादर्पण (१९६६),बकुल कथा (१९७४),उत्तरपुरूष (१९७६),जुगांतर यवनिका पारे (१९७८) या काही महत्त्वपूर्ण कादंबऱ्या तर जल और आगुन (१९४०) और एक दिन (१९५५),सोनाली संध्या (१९६२),आकाश माटी (१९७५),एक आकाश अनेक तारा (१९७७),सागर सुखाचे जाय, श्रेष्ठ गल्प, स्वनिर्वाचित गल्प, छायासूर्यग्रहणे, पूर्ण-पत्र, किर्चिया, आकाशमाटी, ये जीवन है हे काही महत्त्वाचे कथासंग्रह होत.
सुरुवातीची पंधरा वर्षे फक्त बालवाङ्मय लिहिणाऱ्या आशापूर्णादेवींनी १९४४ साली प्रेम ओ प्रयोजन ही कादंबरी लिहिली. या कादंबरीत त्यांनी हिंदू पती-पत्नीच्या दांपत्य जीवनाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. पतीविषयी पत्नीच्या मनात असणाऱ्या एकतर्फी भक्तिभावाचे त्यांनी कधी उदात्तीकरण केले नाही. त्यानंतर जल आर आगुन ही कादंबरी आणि बालिर नीचे ढेड (वाळूखालील लाटा) ही क्रमश: प्रसिद्ध झालेली त्यांची आणखी एक कादंबरी. त्यानंतरच्या १९४७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मित्तिरबाडी या कादंबरीत समाजातील जुनाट समजुतींमुळे तरुण मंडळीचे जीवन किती गुंतागुंतीचे होऊन जाते, हे चित्रित केले आहे. बंगाली एकत्र कुटुंबपद्धतीतील एकूण व्यवहारावर त्यांनी व्यवस्थित टीका केली आहे.याशिवाय त्यांच्या सागर, सुकाम जाय, कल्याणी (१९५४), वो बडे हो गए, काल का प्रहार, दोलना, तपस्या इ. अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रथम प्रतिश्रुति (१९६४) ही कादंबरी आणि सुवर्णलता (१९६६) व बकुलकथा (१९७३) या दोन कादंबऱ्या मिळून साधलेली त्रयी या कालखंडातील त्यांची एक महत्त्वाची सिद्धी ठरते. प्रथम प्रतिश्रुति ही एक विशाल महाकाव्यस्वरुप कादंबरी आहे. १०० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गीय परिवाराची रामकहाणी या कादंबरीत शब्दांकित केली आहे. माणसाने घडविलेल्या संस्कृतीत आज माणसाची दुर्दशा का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात त्यांचे मन गढून गेले. समाजाची जडणघडण ज्या माजघरात होत असते त्यातील अवहेलित, स्तिमितप्राय स्त्रीजीवनाची ही कहाणी वाचकांच्या अंतःकरणांना भिडली. नंतर त्यांनी पुढील दोन कादंबऱ्यांतून नंतरच्या दोन पिढ्यांतील स्त्रीजन्माची कहाणी चितारली. ‘प्रथम प्रतिश्रुति’ची नायिका सत्यवती. तिची कथा म्हणजे शंभर-दीडशे वर्षापूर्वीच्या बंगाली हिंदू बालविवाहितेची चित्रकथा आहे. ही नायिका बंडखोर आहे पण ही बंडखोरी आक्रस्ताळी नाही; उथळ नाही. या प्रमुख व्यक्तिरेखांद्वारे १९ व्या शतकातील स्त्रीशिक्षण, बालविवाह, विवाहसंस्था, बहुपत्नीकत्व, एकूणच स्त्रीचं घरातील, समाजातील स्थान, कुटुंबातील वडीलधाऱ्या स्त्रियांचे वर्चस्व अशा अनेक महत्त्वाच्या, स्त्रीविषयक ज्वलंत प्रश्नाकडे लेखिकेने आपलं लक्ष वेधलं आहे.१९ व्या शतकाच्या अखेरीस बंगाली कुटुंबात घडलेल्या घटनांचं चित्रण प्रथम प्रतिश्रुति या कादंबरीत येते ,तर १९ व्या शतकाच्या अखेरीपासून २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतचा दुसऱ्या महायुद्धापर्यंतचा कालखंड सुवर्णलता या कादंबरीत चित्रित झाला आहे. सुवर्णलता या काळातील अंधकारमय बंधनातून मुक्तीसाठी धडपडते आहे तर तिची मुलगी बकुळ ही रूढी, परंपराच्या बेड्या तोडून विरोधाला न जुमानता स्वतंत्र, स्वच्छंद आयुष्य जगणारी आहे. या कादंबरीत्रयीतून आशापूर्णादेवींनी गतकाल, मध्यकाल आणि वर्तमानकालातील तीन पिढ्यांचा सामाजिक इतिहास पकडण्याचा प्रयत्न केला आहे.बंगालच्या मध्यमवर्गीय अंतःपुराचे प्रांजळ आणि अंतर्भेदी चित्रण त्यांच्या या तीन कादंबरीकन्यांनी घडविले. शरत्चंद्रांनी घडविलेल्या स्त्रीजीवनाच्या चित्रणाहून आशापूर्णादेवीचे चित्रण वेगळ्या पोताचे आहे. कारण त्यात स्वानुभूतींचा पोटउमाळा अधिक आहे.
‘पाशापाणी’ ही पहिली बालकथा आशापूर्णादेवींनी लिहिली. त्यानंतर किशोर वाचकांसाठी लिहिलेल्या कथांचा छोटा ठाकुरदार काशी यात्रा (धाकट्या आजोबांची काशीयात्रा) हा त्यांचा कथासंग्रह १९३८ मध्ये प्रकाशित झाला. हा कथासंग्रह हे आशापूर्णादेवीचं प्रकाशित झालेल पहिलं पुस्तक. सुमारे पंधरा वर्षे त्या बालसाहित्य लिहीत होत्या. पण नंतर १९३७ मध्ये त्यांची ‘पत्नी ओ प्रेयसी’ ही प्रौढकथा आनंदबझार पत्रिकेच्या पूजा विशेषांकात प्रकाशित झाली. त्यानंतर साहित्यकथा या दर्जेदार मासिकात त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध होत होत्या. बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार उठणारे प्रश्न, स्त्रीजीवनातील व्यथा, वेदना, रूढिग्रस्त समाजात कोंडलेली तिची मनोवस्था या साऱ्याचं अत्यंत सहज चित्रण हा आशापूर्णादेवींच्या कथालेखनाचा प्राण आहे. त्यामुळे त्यांच्या कथा या घटनाधिष्ठित असण्यापेक्षा, जीवनातील छोट्या-छोट्या, दडलेल्या, घुसमटलेल्या भावनाचं चित्रण करणाऱ्या आहेत. संसारातील दु:खांना नवे संदर्भ देऊन, त्यांनी वाचकांच्या मनालाच नाही तर साऱ्या समाजाला हलवून सोडलं. ये जीवन है या कथासंग्रहात माणसातील सत्तासंघर्ष, पोकळ रीतीरिवाजाच आणि आधुनिक युगातील स्त्रीच्या अधिकारसंदर्भातील स्त्री-पुरुष द्वंद्वाचं चित्रण आहे. या संग्रहात स्त्रीच्या अस्मितेची ओळख ही सकारात्मक पद्धतीने केली आहे.
साहित्यकथा या दर्जेदार बंगाली मासिकाच्या आशापूर्णादेवी या एक प्रमुख लेखिका होत्या. कथांतील तत्कालीन बंडखोर विचार वाचून ‘आशापूर्णा’ या छुप्या नावाखाली, कुणी पुरुष लेखकच या कथा, कादंबऱ्या लिहित आहे, अशी अनेक साहित्यिकांची समजूत होती. या बंडखोर विचारांमुळे त्यांना कौतुकाने ‘चिरविद्रोहिनी आशापूर्णादेवी’ असं म्हटलं जात असे. या वाचकप्रिय लेखिकेचं साहित्य कधीही संपादकांकडून नाकारलं गेलं नाही, संपादकांकडून साहित्यासाठी वारंवार विचारणा करणारी पत्र येत असत. हीच त्या काळात त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. पुरोगामी विचारांच्या या लेखिकेला लीला पुरस्कार,कोलकाता विद्यापीठ (१९५४), भूटान मोहिनी दासी स्वर्ण पदक (१९६६), पद्मश्री (१९७६), ज्ञानपीठ पुरस्कार(प्रथम प्रतिश्रुति या कृतीसाठी – १९७६), हरनाथ घोष पदक, बंगीय साहित्य परिषद (१९८८), जगतरानी स्वर्ण पदक, कोलकाता विद्यापीठ (१९९३) इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
संदर्भ :
सुवर्णलता आणि बकुळकथा या पुस्तकांचे मराठी भाषांतर आहे का?