विष्णू डे : ( १८ जुलै १९०९ – ३ डिसेंबर १९८२ ). बंगाली भाषेचे महत्त्वपूर्ण कवी, गद्यलेखक, अनुवादक आणि कला समीक्षक. विष्णू डे यांची बंगाली भाषेत एक नव्या पद्धतीची संगीतमय काव्यरचना करणारे कवी म्हणून ओळख आहे. त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. कोलकात्याच्या मित्रा इन्स्टिट्यूट आणि संस्‍कृत कॉलेजिएट स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. १९२७ मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यानंतर इंग्रजी विषय घेऊन सेंट पॉल कॅथेड्रल मिशनच्या कॉलेजमधून ते बी. ए. झाले. कलकत्ता विद्यापीठातून इंग्रजी विषयात त्यांनी एम.ए. केलं आणि अनेक कॉलेजातून इंग्रजीचे अध्यापन केले.

वडिलांच्या प्रोत्साहनामुळे बंगाली व इंग्रजी साहित्याचे विपुल वाचन त्यांनी केले. त्यांचे वडील बंगाली व इंग्रजी साहित्याचे विलक्षण वाचक होते. पुस्तकांनी खच्चून भरलेली कपाटे म्हणजे घरातील मित्रमंडळीच. हवे तितके वाचावे असे घरातूनच उत्तेजन. यामुळे इंग्रजीच नव्हे तर जागतिक साहित्याचे दरवाजे उघडले गेले. मार्क्स व फ्रॉईडच्या विचारांची ओळख झाली. चित्रकला आणि पाश्चात्त्य संगीताचीही त्यांना आवड होती. शाळेत असतानाच त्यांनी  लिहायला सुरुवात केली होती. त्यांची एकूण ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची सुरुवातीची एक कथा होती. ‘पुरूणेर पुनर्जन्म या लक्ष्मण’ ही कथा प्रगती  या ढाक्यातून प्रकाशित होणाऱ्या साहित्यविषयक नियतकालिकात १९२८ मध्ये प्रसिद्ध झाली होती. १९३१ मध्ये परिचय  या नियतकालिकाच्या च्या पहिल्या अंकात त्यांच्या दोन कविता प्रसिद्ध झाल्या.

विष्णू डे यांचे निवडक साहित्य : काव्यसंग्रह – उर्वशी ओ आर्टेमिस (१९३३), चोराबाली (१९३६), अन्विष्ट (१९५०), कोमल गान्धार (१९५३), तुमी शुधु पंचिशे बैशाख (१९५४), आलेख्य (१९५८), स्मृती सत्ता भविष्यत् (१९६३), उत्तरे भाको मौन (१९७७), रूशती पंचशती, सातभाई चंपा, संद्वीपेर चर, पूर्वलेख ; समीक्षा आणि ललितलेखन : रूची ओ प्रगती, साहिलेर भविष्यत् (१९५३), एलो मेलो जीवन ओ शिल्पसाहित्य (१९५८) इत्यादी.

महाविद्यालयात असतानाच त्यांचा पहिला काव्यसंग्रह उर्वशी ओ आर्टेमिस  हा प्रसिद्ध झाला होता. या काव्य रूपकात त्यांनी रचनेचे नवीन प्रयोग केलेले आहेत. उर्वशी ही इंद्रलोकातील प्रसिद्ध अप्सरा होती. शाप मिळाल्याने ती पृथ्वीतलावर पुरुरवाची प्रेयसी आणि पत्नी बनून राहिली. तिला मध्यवर्ती ठेवून तिच्यावर अनेक साहित्यकृती लिहिल्या गेल्या. आर्टेमिस हे ग्रीक कथेतील एक प्रमुख पात्र आहे. ती आपला भाऊ अपोलो याच्याबरोबर ओलिम्पसमधील प्रमुख बारा देवीदेवतांबरोबर प्रतिष्ठापित होती आणि तिला अक्षतकुमारी बनून राहण्याचा वर मिळालेला होता. तिला देवी म्हणूनही मान्यता आहे. या अपूर्व सुंदरीला निवस्त्र रूपात तलावात अंघोळ करताना ऐक्टेमॉन याने पाहिले, त्यामुळे शाप मिळाल्याने ऐक्टेमॉन हरीण झाला. त्याच्यावर शिकारी कुत्र्याने हल्ला केला आणि त्याला फाडून खाल्ले. अशाप्रकारे समांतर मिथकांचा उपयोग करून समकालीनांपेक्षा एका वेगळ्याच प्रकारची कविता त्यांनी लिहिली. १९३३ मधील या संग्रहातील आणि चोराबाली  या सुरुवातीच्या काव्यसंग्रहातील कवितांतून व्यथित यौवनाची स्पंदने जाणवतात. तसेच उपरोधाचा सूरही जाणवतो. कदाचित विष्णू डे यांच्या काव्य जीवनाची सुरुवात व्यक्तिगत पीडा आणि एकाकीपणातून झाली असल्याने त्यांची कविताही समकालीन कवींपासून तशी दूरच राहिली. पण प्रस्थापित रचनेपेक्षा वेगळेपणही त्याच्या काव्यात जाणवू लागले होते. हळव्या, भावुक अभिव्यक्तीपासून ते अलिप्तच होते. यामुळेच त्यांच्या सुरुवातीच्या कवितात चिंतनशीलता जाणवते.

सुरुवातीच्या विष्णू डे यांच्या कवितांपेक्षा १९५० नंतरची त्यांची कविता वेगळी आहे. अधिक मुक्त तरीही संयत, पारदर्शी अशी आहे. कोमल गान्धार, आलेख्य, स्मृति सत्ता भविष्यत्, उत्तरे भाको मौन या संग्रहांतील कवितांतून त्यांचे द्रष्टेपण उठून दिसते. तसेच सभोवतालच्या समाजातील अनिष्ट रूढी, रीतीरिवाज यातील टोचणारा पोकळपणा, व्यंग, विडंबनाच्या रूपात व्यक्त झाला आहे. ऑफेलिया क्रेसिडा या कवितेत मानवी असहाय्यतेचे, दुभंगलेल्या मन:स्थितीचे चित्रण आहे. ‘घुडीस्वार’ ही त्यांची एक सुरेख प्रतिकात्मक कविता आहे. ‘घुडीस्वार’ ही त्यांची एक सुरेख प्रतिकात्मक कविता आहे. घोडीच्या धावत्या टापातून ध्वनित होणारी गती व ताण त्यांनी विलक्षण तन्मयतेने शब्दबद्ध केला आहे. पूर्वलेख  या संग्रहातील ‘जन्माष्टमी’ कवितेत कोलकाता महानगरीचे एक संवेदनशील पण विदारक रेखाचित्र आहे.

स्वातंत्र्य आंदोलन, फॅसिझमचा उदय व त्याला झालेला विरोध, महायुद्ध, बंगालचा भयानक दुष्काळ, जातीय दंगे, स्वातंत्र्योदय अशा घटनांचे पडसाद त्यांच्या पूर्वलेख, सातभाई चंपा आणि संद्वीपेर चरमधील कवितांतून दिसतात. या काळात फॅसिझमविरोधी लेखक संघटना आणि गणनाट्य संघ यासारख्या कार्यात ते सक्रिय होते. सामाजिक शोषण, अन्याय यावर त्यांनी प्रहार केलाच पण कवितेच्या मर्यादांचेही त्यांना भान होते. पण त्यांनी कवितेला घोषणाबाजीसाठी वापरले नाही. त्यांच्या कविता शोषण, गरिबी आणि वर्गभेदाविरुद्ध सामान्य माणसाला एकजूट करण्याचे आवाहन करतात. त्यांच्या संद्वीपेर चर संग्रहातील ‘लालतारा’ कवितेत साम्यवादी विचारधारेचे प्रातिनिधिक स्वरूप स्पष्ट झालेले दिसते. या कवितेत समुद्रमंथनातून निघालेल्या, सात तोंडाच्या, पांढऱ्या रंगाच्या, इंद्राच्या घोड्याचे खिंकाळणे आणि पक्षीराज गरूडाची आकाश झेप प्रतीके म्हणून वापरली आहेत. यात साम्यवादी विचारधारा असली तरीही आपल्या भारतीय मिथकांचा उपयोग केलेला दिसतो. नाम रेखेछि कोमल गंधार, आलेख्य तुमि शुधु पंचिशे बैशाख या संग्रहातील कविताही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

विष्णू डे यांना अन्विष्टआलेख्य  या काव्यसंग्रहांनी कवी म्हणून मान्यता मिळवून दिली. स्मृति सत्ता भविष्यत्  हा त्याचा ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त काव्यसंग्रह. यात भय, चिंता, शोषण या मानवाचा अभिशाप ठरलेल्या भावनांविरुद्ध मानवतेच्या प्रस्थापनेसाठी कवीची चाललेली धडपड जाणवते. भूतकाळातील स्मृती, वर्तमानातील सत्ता आणि भविष्याचा शोध या गोष्टी त्यात एकवटल्या आहेत. अशा समग्र मानवाच्या जाणिवेची अभिव्यक्ती यात आहे. यातील कविता आधुनिक विचारांनी समृद्ध आहेत. समाजाची कैफियत मांडताना कवीने यात परस्परविरोधी घटनांचे उपहासात्मक चित्रण केले आहे. त्यातून एक नवीनच आशय समोर आला आहे. यातून कवीने जो समाज आणि व्यक्ती आपली ओळख विसरल्या आहेत आणि ती परत मिळविण्यासाठी धडपडताहेत, अशा बधिरतेने, निंदेने आणि विकृत, विद्रुप मानसिकतेने ग्रासलेल्या समाजाचे चित्रण केले आहे. नवी पिढी केवळ दिशाहीनच नाही तर दिशाभ्रष्टदेखील आहे आणि या साऱ्यामुळे कवीचे मन खिन्न आहे. त्यांचे काव्य हे जीवनाभिमुख आहे. वास्तवापासून दूर जाऊन, कल्पनेच्या साम्राज्यात ते रमणारे नव्हते. मानव हाच त्यांच्या काव्याचा व चिंतनाचा केंद्रबिंदू आहे. आपल्या साहित्य रचनेला अनुकूल अशी नवीन शैली आणि शब्दसृष्टी त्यांनी निर्माण केली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कवितांवर क्वचित एलियट कवीच्या काव्याचा प्रभाव जाणवतो. त्यांनी एलियटच्या काही कवितांची भाषांतरे केली आहेत.

रूची ओ प्रगती, साहिलेर भविष्यत्, एलो मेलो जीवन ओ शिल्पसाहित्य हे त्यांचे निबंध आणि समीक्षालेखांचे सहा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. बंगालीप्रमाणेच इंग्रजीमध्येही त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. शेक्सपिअर, गटे, शेली, बाँदलेअर, एलियट, पास्तरनाक, गार्शिया, ब्रेख्त अशा साठहून अधिक देशोदेशीच्या कवींच्या कवितांचे त्यांनी बंगालीत अनुवाद केले आहेत. व्यापक व्यासंग, सतत चिंतन, मनन, जगभरच्या ज्ञानाची ओढ, चौफेर निरीक्षण, मानवतेवर असलेली दृढ श्रद्धा या साऱ्याचं दर्शन त्यांच्या कवितेत दिसते. संथाळी व छत्तीसगढी लोकगीते, बंगाली मंगल काव्यातील बारमासिया व नवकविता यांचा मिलाफ त्यांच्या कवितेत दिसतो.

मार्क्सवादी विचारसरणीच्या विष्णूजींनी सामाजिक जागृती करण्यासाठी पत्रिकाही प्रकाशित केली. कल्लोळ  या मासिकाच्या युवा कवींच्या ग्रुपचे ते १९२०-३० च्या दरम्यान सदस्य होते. त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अनेक सन्माननीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत- साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५), नेहरू स्मृती पुरस्कार (१९६७), सोव्हिएट लँड पुरस्कार (१९७१) ज्ञानपीठ पुरस्कार (१९७१) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

संदर्भ :

  • Datta, Amaresh,(Edi), Encyclopaedia of Indian Literature, New Dehli, 1988.