जर्मन ओबो
आधुनिक ओबो

एक पाश्चात्त्य सुषिर वाद्य व वाद्यकुल. पाश्चात्त्य वाद्यवर्गीकरणानुसार त्याचा अंतर्भाव लाकडी वायुवाद्यांत केला जातो. भारतीय शहनाईप्रमाणेच काहीशी त्याची रचना असते. त्याचा प्रामुख्याने ऑर्केस्ट्रात वापर करतात; तथापि त्याचे स्वतंत्रपणेही (सोलो) वादन प्रसिद्ध आहे. या वाद्याचा आकार निमुळत्या नळीसारखा (शंक्वाकार) असून ही नळी सु. ६० सेंमी. लांब असून तिचा व्यास ३ ते ५ सेंमी. असतो. त्या नळीच्या एका टोकाला साधारणत: ६.५ सेंमी. आकाराचे जिव्हाळे बसवलेले असते. हे वाद्य रोजवूड, कोक्सवूड, एबोनाईट किंवा धातू यापासून बनविलेले असते. या वाद्यावर वादकाची बोटे स्थिरावण्यासाठी थोडीशी खोलगट खाच किंवा छिद्रे असतात. वादक आपल्या ओठांनी नादपट्टी दाबून धरतो आणि त्याच वेळी हवेची फुंकर मारतो, जेणेकरून उच्चतम ध्वनी निर्माण होईल. दोन जिव्हाळ्या असलेल्या ओबोमध्ये बांबूच्या दोन पट्ट्यांमध्ये धातूची एका विवक्षित पट्टी पकडून ती एकत्रितपणे एका छोट्या गोलाकार बुचाच्या (कोर्कच्या) पट्ट्यामध्ये बांधून तयार केलेली असते. ओबो वाद्यकुलाची वेगवेगळे कर्णाकार, द्विदल जिव्हाळी व शंक्वाकार नलिका ही वैशिष्ट्ये होत. यात कळचाव्यांचीही व्यवस्था असते. या गटात कॉर आंग्ले, बॅरिटोन ओबो, हेक्केलफोन, कॉन्ट्राबास व प्रदेशपरत्वे इतर अनेक प्रकारही आहेत. वाद्यवृंदातील इतर वाद्ये मिळवून घेण्यासाठी ओबोवर वाजविलेला ‘ए’ हा स्वर प्रमाण मानण्यात येतो. व्होल्फगांग मोट्सार्ट (मोझार्ट) याने आपल्या वाद्यवृंदात एक महत्त्वाचे वाद्य म्हणून त्याचा बराच उपयोग करून घेतला.

हे वाद्य प्राचीन काळी ईजिप्त, ग्रीस, भारत, चीन, आफ्रिका, अरबस्तान, अमेरिका आदी देशांत प्रचलित होते; मात्र त्याचे आजचे स्वरूप सतराव्या शतकापासून दृग्गोचर होते. सतराव्या शतकाच्या मध्यास दरबारी संगीतकार झां ओत्तर आणि मायकेल फिलीदोर यांनी सद्य:स्थितीत वाद्यवृंदात वापरात असलेल्या ओबोचा शोध लावला. त्यामुळे कळचाव्यांची संख्या वाढून (सु. दहा) त्यातील छिद्रांवर छिद्रण पट्ट्या बसविण्यात आल्या. फ्रान्स्वा लोरी आणि जॉर्जिस गिलेट यांनी अमेरिकेची संयुक्त संस्थाने व फ्रान्स येथे ओबो अधिक लोकप्रिय केला.

भाषांतरकार – शुभेन्द्र मोर्डेकर

समीक्षक – सु. र. देशपांडे

#पाश्चात्त्यवाद्य #वाद्य #बसून

प्रतिक्रिया व्यक्त करा