कॉन्ट्रा बसून

पाश्चात्त्य संगीतपरंपरेतील ओबो वाद्यकुलातील, कंपित-वायुस्तंभ-वर्गातील एक वाद्य. त्यास जर्मन ‘फॅगॉट’ व इटालियन ‘फागोत्तो’ अशा संज्ञा आहेत. याशिवाय याचे स्टँडर्ड, डबल बसून, डिस्कॅट वगैरे अन्य प्रकारही आढळतात. वाद्यवृंद व सैनिकी वाद्यघोष यांत वाजवले जाणारे हे ढाल्या तारतेचे, काष्ठ-सुषिर (वुडविंड) वाद्य आहे. क्वचित प्रसंगी बसूनचे स्वतंत्र वादनही होते. ओबो या वाद्याशी संबंधित असल्यामुळे बसून हे द्विदल जिव्हाळीचे (डबल रीड) असणे स्वाभाविकच होय. नलिका अरुंद व लांब म्हणून वळवून दुहेरी केलेली असते आणि कर्णाकार गोल असतो. त्याचा पल्ला सुमारे साडेतीन सप्तके – मंद्र बी-फ्लॅट ते तार एफ असा – असतो. फ्रेंच वा सिम्पल बसून आणि जर्मन बसून अशा या वाद्याच्या दोन घडणी प्रचलित आहेत. इटलीमध्ये (सोळाव्या शतकातील) बसूनचा आद्य आविष्कार पाहावयास मिळतो. सतराव्या शतकात वाद्यवृंदातील पहिले काष्ठ-सुषिर वाद्य म्हणून त्याचा अंतर्भाव झाला. त्याला सध्याचे प्रचलित रूप फ्रान्समध्ये १७५०-१८५०च्या दरम्यान लाभले. एकोणिसाव्या शतकाआधी कमी प्रमाणात आढळणाऱ्या ‘डबल बसून’ चा पल्ला साध्या बसूनपेक्षा एक सप्तक कमी तारतेचा असतो. यास ‘कॉन्ट्रा बसून’ म्हणतात. अत्यंत द्रुत गतीने व सूर तुटकपणे (स्टकाटो) वाजवल्यास हे वाद्य हास्यकारक ध्वनी उत्पन्न करते, म्हणून त्यास कित्येकदा वाद्यवृंदातील विदूषक असेही संबोधले जाते. लूटव्हिख व्हान बेथोव्हन (१७७०–१८२७) याने आपल्या सहाव्या (पास्टोरल) सिंफनीमध्ये त्याचा अशा प्रकारे उपयोग केल्याचे आढळून येते. या वाद्यावर मुख्यत्वे बेस आणि टेनर व क्वचित ट्रेबल क्लेफमध्ये लिहिलेला संगीताशय वाजवला जातो.

हेकेल बसून
बफे बसून

मार्तिन ऑतर (१६४०–१७१२) यास बसून वाद्याच्या निर्मितीचे श्रेय दिले जाते. त्याने १६५०च्या सुमारास बेल, बेस, बूट व विंग जॉइंट अशा चार भागांनी बनविलेल्या बसूनचा तारता-पल्ला दोन चाव्यांची भर घातल्याने मंद्र बी-फ्लॅटपर्यंत वाढला आणि जुन्या डल्सिअन या वाद्यापेक्षा ते अधिक सक्षम ठरले. १७००च्या सुमारास जी-शार्प स्वन वाजू शकेल अशा चौथ्या चावीची भर पडली आणि त्यामुळे विवाल्डी, बाख इ. संगीतकारांच्या रचना वाजविणे शक्य झाले. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मंद्र इ-फ्लॅट स्वन वाजू शकेल अशी पाचवी चावी योजली गेली. सतरा चाव्यांच्या व चार सप्तकांचा तारता-पल्ला असलेल्या आधुनिक बसूनची रचना संगीतकार कार्ल अल्मेनरॉडर याने ध्वनिशास्त्रज्ञ गॉटफ्रीड वेबर याच्या सहकार्याने केली. १८२३ साली प्रसिद्ध झालेल्या त्याच्या ग्रंथात या प्रकारच्या वाद्यावर वाजविता येणारे सफाईदार वादनतंत्र विस्ताराने मांडले. या प्रकारच्या बसून वाद्यास ‘हेकेल (जर्मन) पद्धती बसून’ म्हणतात. ‘बफे पद्धती बसून’ हे वाद्य मात्र तुलनेने अधिक निमुळती ग्रीवा असणारे, अधिक वादनसुलभ व विविध स्वर वाजविण्यासाठी बोटांची निराळी योजना असणारे असे असते. त्याची बांधणी ही जोडलेल्या लाकडी भागांनी बनते, तसेच ज्यात पत्ती बसविलेली असते त्या बोकलनामक धातूच्या नळीच्या वर जाणारा चिमणी हा भाग या पद्धतीच्या वाद्यात अधिक उंच असतो. दोन्ही वादनपद्धती निराळ्या असल्याने खूप सराव केल्याखेरीज एका पद्धतीच्या वाद्याचे वादन दुसऱ्यास साधू शकत नाही.

बसूनवाद्याच्या ध्वनीशी तुल्य ध्वनी निर्माण करणाऱ्या ऑर्गनमधील चावीसही ‘बसून’ असे म्हणतात. याचे वादन पायपट्टी पायाने दाबून करतात. याची तारता सोळाफुटी नलिकेच्या ध्वनीइतकी खालची असते.

 

 

संदर्भ :

  • Baines, Anthony, European And American Musical Instruments, London, 1966.

भाषांतरकार – चैतन्य कुंटे

समीक्षक –  सु. र. देशपांडे

#ओबो #सिंफनी #मार्तिन ऑतर

प्रतिक्रिया व्यक्त करा