भारतात सर्वत्र आढळणारी एक सुगंधी वनस्पती. तुळस लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ऑसिमम सँक्टम आहे. ऑसिमम टेन्यूफ्लोरम या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. तुळस ही मूळची जगाच्या पूर्व भागाच्या उष्ण प्रदेशातील असून ती आता सर्वत्र लागवडीखाली आहे. उजाड जागी ती एखाद्या तणाप्रमाणे वाढते, तर अनेक बागांमध्ये तिची लागवड करतात. भारतात ती मंदिराशेजारी व घरी लावतात.

तुळस वनस्पती आणि मंजिरी

तुळशीचे झुडूप ५०-१५० सेंमी. उंच वाढते. तुळशीला अनेक फांद्या व उपफांद्या असतात. पाने साधी, लहान, केसाळ व समोरासमोर असून तेलग्रंथियुक्त असतात. पाने अंडाकार असून कडा किंचित दंतूर असतात. फुले किरमिजी किंवा जांभळट व लहान असून फांद्यांच्या व मुख्य खोडाच्या शेंडयांवर साध्या किंवा शाखायुक्त मंजिऱ्यांवर येतात. मंजिरी साधारणपणे १०-१२ सेंमी. लांब असते. फळ (दृढफलिका) लहान असून त्यात चार बिया असतात. बी गोलसर, गुळगुळीत व फिकट भुरे किंवा तांबूस असते. भारतात तुळशीचे दोन प्रकार लागवडीखाली आहेत : (१) हिरव्या पानांची तुळस (श्री तुळस किंवा लक्ष्मी तुळस) आणि (२) किरमिजी फांद्यापानांची तुळस (कृष्ण तुळस).

आयुर्वेदात तुळशीचे अनेक उपयोग सांगितले आहेत. तिच्यामध्ये जीवाणुरोधी, दाहशामक तसेच अधिहर्षतारोधी गुणधर्म आहेत. कफनाशक असल्यामुळे ठसका व खोकला यांवर ती उपयुक्त आहे. तुळशीचा काढा मुलांच्या पोटाच्या विकारांवर उपयुक्त असतो. तिच्या पानांपासून ऊर्ध्वपातन करून तेल मिळते. हे तेल पिवळे, किंचित लवंगाच्या वासाचे व बाष्पनशील असते. सौंदर्यप्रसाधनांत हे तेल वापरले जाते. डास प्रतिकर्षण करणाऱ्या मलमांमध्ये तुळशीचा वापर करतात. तिच्या पानांमध्ये ओलिअॅनिक आम्ल, उर्सोनिक आम्ल, रोझमॅरिनिक आम्ल, युगेनॉल, कार्वोकॉल, लिनॅलूल, कॅरियोफायलीन व एलिमीन हे घटक असतात. काही संशोधनांतून रक्तशर्करा कमी करण्यासाठी तसेच कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुळस उपयुक्त ठरू शकते, असे आढळले आहे.