पायपरेसी कुलातील एक सपुष्प वेल. पिंपळीचे शास्त्रीय नाव पायपर लाँगम आहे. काळी मिरीदेखील याच कुलातील आहे. पिंपळीची लागवड तिच्या फळांसाठी केली जाते. ती मूळची श्रीलंका व फिलिपीन्स बेटे येथील असून भारत, नेपाळ, श्रीलंका इत्यादी देशांतही आढळते. भारतात तमिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व मेघालय या राज्यांत तिची लागवड केली जाते.

पिंपळी ही बहुवर्षायू वेल मुळांच्या आधाराने वर चढते. पाने साधी व एकाआड एक असतात. जुनी पाने हिरवी, दंतुर आणि हृदयाकृती असतात. कोवळी पाने अंडाकार व लांब असून त्यांवर पाच शिरा असतात. फुले कणिश फुलोऱ्यात येतात; ती एकलिंगी असून नर-फुले आणि मादी-फुले वेगवेगळ्या फांद्यांवर येतात. नर-फुलांचे देठ मादी-फुलांहून लांब असतात. फळे काळपट हिरवी, चमकदार व मांसल फुलोऱ्यात असतात. ती पिकल्यावर लाल होतात आणि सुकल्यावर धुरकट काळी होतात. फळे सुगंधी व तिखटगोड असतात. फळांमध्ये पायपरलाँग्युमीन नावाचे मुख्य अल्कलॉइड असते. त्यामुळे या फळांना एक विशिष्ट सुगंध येतो.
पिंपळीचे मूळ, फळ व खोड उपयुक्त आहेत. कफ, दमा, वात, खोकला, ताप, मूळव्याध, कावीळ आणि कुष्ठरोग या विकारांवर हे भाग उपयुक्त आहेत. लहान मुलांना कफ, वात व खोकला होऊ नये म्हणून त्यांना दिल्या जाणाऱ्या गुटीत पिंपळीच्या फळांचा समावेश करतात. फळे सामान्यपणे सुकवितात आणि ती मसाल्यात तसेच पदार्थ टिकविण्यासाठी वापरतात.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.