अवटू ग्रंथी सुजल्यामुळे निर्माण झालेली एक अवस्था. या रोगाला ‘आवाळू’ असेही म्हणतात. गळ्याच्या पुढच्या भागात अवटू ग्रंथी असते. बहुतेक वेळा गलगंड होताना मानेच्या समोरील भागात श्वासनालाच्या दोन्ही बाजूंवर सूज येते व सूज आलेला भाग गुळगुळीत लागतो. निरोगी व्यक्तीत अवटू ग्रंथी रक्तातील आयोडीन शोषून घेऊन थायरॉक्सीन या हॉर्मोनाची (संप्रेरकाची) निर्मिती करते. हे हॉर्मोन चयापचय क्रियेचे आणि शरीराच्या वाढीचे नियमन करते. तसेच त्यामुळे अन्नाचे रूपांतर ऊर्जा आणि ऊतींमध्ये होते.

अवटू ग्रंथी आवश्यकतेपेक्षा जास्त सक्रिय झाल्यास किंवा पुरेशी सक्रिय नसल्यास गलगंड होतो. अवटू ग्रंथी पुरेशी सक्रिय नसते तेव्हा हायपोथायरॉयडिझम (थायरॉक्सीन-अल्प) अवस्था उद्‍भवते. थायरॉक्सीनच्या कमतरतेमुळे शारीरिक वाढ खुंटते आणि बुद्धिमांद्य येते. त्वचा शुष्क आणि राठ बनते. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त वजन वाढते. काही व्यक्तींमध्ये आयोडीन आणि पोषणमूल्यांची कमतरता असल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. आयोडिनयुक्त मीठ, नवलकोल, फुलकोबी तसेच पानकोबी खाल्लाने ही स्थिती काही प्रमाणात आटोक्यात आणता येते. अंतःस्राव तयार होताना काही विकरांमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे थायरॉक्सीन कमी प्रमाणात उपलब्ध होते. जीवाणू आणि विषाणूंपासून शरीराचे संरक्षण करणे हे मुख्य काम प्रतिपिंडांचे असते. परंतु कधीकधी रक्तातील प्रतिपिंडे अवटू ग्रंथीवर हल्ला करतात. त्यामुळेदेखील ही अवस्था उद्‍भवते.

काही व्यक्तींमध्ये अवटू ग्रंथीत आवश्यकतेपेक्षा जास्त थायरॉक्सीन निर्माण होते. या स्थितीला हायपरथायरॉयडिझम (थायरॉक्सीन-आधिक्य) म्हणतात. त्यामुळे अवटू ग्रंथीला सूज येऊन गलगंड होतो. या स्थितीमुळे त्या व्यक्तीला उदास वाटते, हृदयाचे ठोके जलद पडतात आणि वजन कमी होते. क्वचित प्रसंगी त्या व्यक्तीच्या डोळ्यांची बुबुळे खोबणीबाहेर आल्यासारखी दिसतात.

गलगंड बरा करण्यासाठी तज्ञ वैद्य कारणांनुसार विविध उपचार करतात. थायरॉक्सीन-अल्प असलेल्या रुग्णांना थायरॉक्सीन संप्रेरकाच्या गोळ्या देतात, तर थायरॉक्सीन-आधिक्य प्रकारात औषधे, शस्त्रक्रिया किंवा किरणोत्सारी आयोडीन समस्थानिके इत्यादींचा वापर करुन गलगंड आटोक्यात आणण्याचा प्रयत्‍न केला जातो.