(सिव्हेज मॅनेजमेंट). मानवाच्या वापरातून निर्माण झालेल्या टाकाऊ पाण्याचा (अपशिष्ट जलाचा) एक प्रकार म्हणजे सांडपाणी. सांडपाण्याचे गुणधर्म त्याचा वाहण्याचा दर किंवा आकारमान, भौतिक स्थिती, त्याच्यातील रासायनिक तसेच विषारी घटक आणि त्यांतील सूक्ष्मजीव व त्यांचे प्रकार यांनुसार ठरविले जाते.

घरातील स्वयंपाक करण्याच्या अनुषंगाने निर्माण होणारे निरुपयोगी पाणी, स्नान करणे, कपडे धुणे इत्यादी कृतींमधून उत्पन्न होणारे पाणी कमी अपायकारक आणि कमी दुर्गंधीयुक्त असते. अशा पाण्याला ‘करडे सांडपाणी’ म्हणतात. शौचालयावाटे बाहेर सोडलेले सांडपाणी मलमूत्रयुक्त व दुर्गंधीयुक्त असते. याला ‘काळे सांडपाणी’ म्हणतात. त्यात रोगकारक सूक्ष्मजीवदेखील असतात. सामान्यपणे असे दोन प्रकारचे सांडपाणी दोन वेगवेगळ्या जलवाहिन्यांमार्फत वाहून नेणे आवश्यक असते. पावसाचे किंवा पुराचे वाहते पाणी, तसेच रस्त्यांच्या कडेला असलेल्या नाल्यांमधून वाहणारे पाणी हेही ‘सांडपाणी’ सदरात येते. मात्र त्यात पर्यावरणातील वायू तसेच धुळीचे कण, मातीत मिसळलेली रसायने, रस्त्यावर पडलेले तेल, वंगणे इ. घटक मिसळलेले असतात. अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या पाण्यालादेखील सांडपाणी म्हणतात. औद्योगिक कारखान्यांच्या प्रकियांमधून निर्माण झालेल्या टाकाऊ पाण्याला सांडपाणी न समजता ‘औद्योगिक अपशिष्ट जल’ म्हणतात. वस्तुस्थिती अशी आहे की जगात सर्वत्र, विशेषकरून ज्या देशांचे उत्पन्न कमी आहे अशा देशांत, अपशिष्ट जलावर कोणतेही संस्करण केले जात नसल्याने गंभीर जलप्रदूषण उद्भवते. संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सु. ९०% घरगुती तसेच औद्योगिक अपशिष्ट जल कोणतेही संस्करण न करता पर्यावरणात सोडून दिले जाते.

घरे, कार्यालये, रुग्णालये इ. ठिकाणी असलेली स्वयंपाकघरे, स्नानगृहे व शौचालये, स्वच्छतागृहे यांतून बाहेर पडलेले सांडपाणी हानिकारक नसते. मात्र त्यात औद्योगिक तसेच पर्यावरणातील वाहते पाणी मिसळल्यास ते हानिकारक असू शकते. म्हणून सांडपाण्यावर शुद्धीकरणाच्या विविध प्रक्रिया करून त्यातील अशुद्ध घटक, मल इ. वेगळे केले जातात. नंतर असे पाणी पुन्हा बागांकरिता किंवा शेतीकरिता वापरले जाते अथवा पर्यावरणातील तलाव, नदी, समुद्र यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडले जाते. सांडपाणी साठवणे, त्यावर योग्य प्रक्रिया करणे आणि शेवटी त्याची विल्हेवाट लावणे, या संपूर्ण प्रक्रियेला ‘सांडपाणी व्यवस्थापन’ म्हणतात. पाणी शुद्ध, स्वच्छ व सुरक्षित करणे, हे सांडपाणी व्यवस्थापनाचे उद्दिष्ट असते.

पूर्वी मानवी वसाहतींमधून निर्माण होणाऱ्या मलाचे संकलन मनुष्यांमार्फत केले जात असे, तसेच ते अन्य ठिकाणी नेऊन त्यावर संस्करण केले जात असे. अन्य सांडपाणी घरापासून थोड्या अंतरावर साठवून जमिनीत जिरवले जात असे किंवा झाडांना दिले जात असे. परंतु लोकसंख्येत वाढ झाल्याने या पद्धतींमध्ये बदल करून मल, मूत्र व अन्य सांडपाणी भुयारी निस्सारण जलवाहिन्यांद्वारे दूरवर नेले जाऊ लागले व त्यावर एकत्रितपणे संस्करण करून विल्हेवाट लावण्याची कल्पना पुढे आली. या पद्धतीत मल, मूत्र व इतर सांडपाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर संस्करण करण्याच्या विशिष्ट जागी वाहून नेले जाते.

सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम त्याचे परीक्षण करण्याची गरज असते. सांडपाण्याचे भौतिक व रासायनिक परीक्षण, त्याच्यातील स्थायू पदार्थांचे प्रमाण, तसेच जैविक किंवा कार्बनी पदार्थांच्या अपघटनासाठी असणारी ऑक्सिजनची गरज निश्चित करणाऱ्या चाचण्या, सूक्ष्मजीवांसंबंधीच्या चाचण्या इ. परीक्षणांद्वारे सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे करावे लागेल, हे ठरवले जाते.

भौतिक विश्लेषण : सांडपाण्यामध्ये पाण्याचे वजनी प्रमाण ९५–९७% असते, तर उर्वरित २–५% स्थायू पदार्थ असतात. हे स्थायू पदार्थ पाण्यात विरघळलेल्या, तरंगणाऱ्या किंवा अर्धवट बुडलेल्या अवस्थेत असतात. सांडपाण्याच्या विविध चाचण्यांद्वारे वरील प्रकारच्या स्थायू पदार्थांचे परिमाण काढणे आवश्यक असते. तसेच सांडपाण्याचे तापमान, वास, रंग, गढूळपणा इ. गुणात्मक विश्लेषणाच्या चाचण्या करणे आवश्यक असते.

रासायनिक विश्लेषण : सांडपाण्यामध्ये असलेल्या स्थायू पदार्थांचे रासायनिक विश्लेषणाच्या दृष्टीने कार्बनी व अकार्बनी असे दोन भाग पडतात. सांडपाण्यातील नायट्रोजनचे प्रमाण व स्थिती जाणण्यासाठी मुक्त अमोनिया, जैविक नायट्रोजन, नायट्रेट, नायट्राइटे इ. चाचण्यांचा उपयोग केला जातो. सांडपाण्यातील अस्थिर अकार्बनी घटकांचे स्थिरीकरण करण्यासाठी विद्राव्य ऑक्सिजनची गरज असते. औद्योगिक सांडपाण्यामध्ये पारा, क्रोमियम, शिसे, तांबे किंवा इतर धातूंची विषारी संयुगे असल्यास, ती किती प्रमाणात आहेत, याचीही तपासणी केली जाते.

सूक्ष्मजीव विश्लेषण : सूक्ष्मजीवांमुळे झालेले सांडपाण्याचे प्रदूषणाचे प्रमाण काढण्यासाठी मुख्यत: एश्चरिकिया कोलाय या जीवाणूंच्या चाचण्या घेतात आणि त्यांद्वारे सूक्ष्मजीवांची सर्वांत जास्त येणारी संभवनीय संख्या देतात. औद्योगिक अपशिष्टांमध्ये रोगकारक सूक्ष्मजीव व इतर अनेक प्रकारांचे उपयोगी सूक्ष्मजीव असतात. सांडपाण्यावर संस्करण करण्यास उपयोगी पडणाऱ्या सूक्ष्मजीवांचे तीन प्रकार आहेत; ऑक्सिजीवी (हवेची किंवा मुक्त ऑक्सिजनची गरज असलेले), विनॉक्सिजीवी (हवेची किंवा मुक्त ऑक्सिजनची गरज नसलेले) आणि वैकल्पिकजीवी (हवा किंवा मुक्त ऑक्सिजन असताना अथवा नसतानाही जगू शकणारे).

सांडपाण्याचे संकलन : वेगवेगळ्या वसाहतींमध्ये अथवा उद्योगांमध्ये निर्माण होणारे सांडपाणी आणि औद्योगिक अपशिष्ट यांचा कुठल्याही प्रकारचा उपद्रव न होता भुयारी गटारांद्वारे संकलन करून एक किंवा अनेक ठिकाणी वाहून नेतात. सांडपाणी एकत्र आणण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी नळ, मलवाहिन्या, पंपिंग केंद्र, मलवाहिनीची उपांगे इत्यादींचा वापर करतात. या सर्वांना मिळून ‘सांडपाणी संकलन प्रणाली’ तयार होते.

सांडपाणी व्यवस्थापन केंद्र

सांडपाण्यावरील संस्करण : सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याआधी संकलित केलेल्या सांडपाण्यावर योग्य संस्करण करून ते निरुपद्रवी केले जाते. सर्वप्रथम सांडपाणी मोठ्या फटी असलेल्या जाळीतून जाऊ देतात. अशा जाळीत मोठ्या आकाराचे स्थायू पदार्थ वेगळे होतात. त्यानंतर सांडपाण्यावर तीन संस्करणे केली जातात : (१) प्राथमिक संस्करणात सांडपाणी एखाद्या मोठ्या खळग्यासारख्या क्षेत्रात निश्चलपणे साठवून ठेवतात. या प्रक्रियेत जड पदार्थ तळाशी बसतात, तर तेल, वंगणे किंवा तरंगणारे स्थायू यांसारखे पदार्थ काढून टाकतात. या टप्प्यावर जवळजवळ निम्मे स्थायू पदार्थ व सूक्ष्मजीव वेगळे होतात. (२) द्वितीयक संस्करणात सांडपाण्यात विरघळलेले आणि तरंगते जैविक घटक वेगळे होतात. सामान्यपणे हे संस्करण स्थानिक पातळीवर पाण्यातून फैलावणाऱ्या रोगकारकांच्या सूक्ष्मजीवांनुसार केले जाते. सहसा या पद्धतीत संस्करणे केलेल्या सांडपाण्यातून सूक्ष्मजीव वेगळे करण्यासाठी विलगीकरणाची तंत्रे वापरतात. (३) तृतीय संस्करण हे सांडपाणी जर एखाद्या परिसंस्थेवर परिणाम करणारे असेल तर प्राथमिक आणि द्वितीयक संस्करणापेक्षा अधिक वेगळे असू शकते. संस्कारित जल एखाद्या जलप्रवाहात, नदीत, तलावात, पाणथळ जागी सोडण्यापूर्वी त्यावर रासायनिकदृष्ट्या जंतुनाशकाची किंवा भौतिक दृष्ट्या सूक्ष्मगालनाची क्रिया केली जाते आणि नंतर बागांकरिता व शेतीकरिता वापरले जाते. जर ते पुरेसे स्वच्छ असेल तर पुन्हा भूगर्भातील स्रोतांमध्ये मिसळले जाते.

सांडपाण्याची विल्हेवाट : मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला अपायकारक किंवा धोकादायक ठरणार नाही, अशा रीतीने सांडपाणी पर्यावरणात जाऊ देणे म्हणजे त्याची विल्हेवाट लावणे होय. सांडपाण्यावर संस्करण केल्यानंतर ते महासागर, खाड्या, नद्या, सरोवरे किंवा इतर जलाशयांत सोडले जाते. सांडपाण्यातील स्थायू पदार्थांचे व्यवस्थापन करण्यासाठी जमिनीत पुरणे, जाळणे, कोरडे करून खत म्हणून वापरणे, जहाजात भरून भर समुद्रात नेऊन टाकणे इ. पद्धतींचा वापर केला जातो.