रायआवळा ही वनस्पती फायलँथेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव फायलँथस ॲसिडस असे आहे. सिक्का ॲसिडा  या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. ती मूळची मादागास्कर येथील असून आशिया, अमेरिका तसेच कॅरेबियन बेटांवरील अनेक ठिकाणी तिची लागवड केली जाते. गूजबेरी या नावाने अनेक वृक्ष ओळखले जातात. रायआवळा याला इंग्रजी भाषेत ‘स्टार गूजबेरी’ असे म्हणतात.

रायआवळा (फायलँथस ॲसिडस) : (१) पाने व फळांसह वनस्पती, (२) फळे

रायआवळा हा पानझडी वृक्ष ६–९ मी. उंच वाढतो. याच्या खोडाच्या फांद्यांच्या टोकाला पर्णसंभाराचा झुपकेदार गुच्छ असतो. साधारणपणे १ मी. लांबीच्या फांद्यांवर ५–८ सेंमी. लांबीच्या,  लहान व साध्या पानांच्या दोन रांगा असतात. कोवळी पाने लालसर असतात, परंतु जून झाल्यावर हिरवी होतात. याची पाने एकाआड एक, भालाकार व लांबट असून पानांचे देठ लहान असतात. फुले लांब फुलोऱ्यात येतात. असे फुलोरे पर्णहीन फांद्यांच्या टोकांना असतात. फुले नर फुले, मादी फुले किंवा द्विलिंगी असतात. ती अदलिकित असून नरफुलामध्ये १–३ पुंकेसर असतात. मादीफुलात एकच ऊर्ध्वस्थ जायांग असून ते तीन संयुक्त, अंडपीचे बनलेले असते. परागण कीटकांमार्फत होते. मृदुफुळे फिकट पिवळी, पांढरट व आठळीयुक्त असून आंबट असतात. फळावर सहा–आठ उभ्या रेषा असून त्यात एक आठळी असते. आठळीमध्ये ४–६ बिया असतात.

रायआवळ्याची मुख्यत: फळे उपयोगी आहेत. चवीला ती आवळ्यासारखीच आंबट असतात. फळांमध्ये पाणी ९०%, प्रथिन १%, कर्बोदके ७%, राख सु. १% आणि ॲसिटिक आम्ल सु. १·५% असते. फळांपासून चटणी व लोणचे तसेच मुरावळा केला जातो. त्यांचा रस शिर्का करण्यासाठी वापरतात. मूळ आणि बी सारक असते. संधिवात तसेच अंगदुखी यांवर त्याची पाने मिरीबरोबर वाटून लेप देतात. मळमळ, ओकारी, रक्तशुद्धी यांसाठी तसेच यकृताच्या विकारावर फळे गुणकारी आहेत. त्याचे लाकूड कठीण, टिकाऊ असले तरी इमारतीसाठी फारसे वापरले जात नाही. सालीत टॅनीन असल्यामुळे ती कातडी कमाविण्यासाठी वापरली जाते .

प्रतिक्रिया व्यक्त करा