तोफगोळा (कौरोपिटा गियानेन्सिस): फळे

तोफगोळा हा वृक्ष लेसिथिडेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कौरोपिटा गियानेन्सिस आहे. हा मूळचा त्रिनिदाद, दक्षिण-पूर्व अमेरिका, भारत आणि थायलंड या उष्ण प्रदेशांत आढळतो. भारतात २,०००–३,००० वर्षांपूर्वीपासून या वृक्षाचा आढळ असल्यामुळे त्याचे मूळ भारत असावे, अशी शक्यता आहे.

तोफगोळा (फूल)

तोफगोळा हा सदाहरित वृक्ष आहे. सु. १५ मी. पर्यंत उंच वाढणाऱ्या या वृक्षाला जमिनीपासून ३ मी. अंतरावर फांद्या फुटतात. पाने साधी, २०–२५ सेंमी. लांब, वरची बाजू गडद हिरवी तर खालची बाजू पांढरट हिरवी असते. फुले आणि फळे पानांच्या बगलेतून न येता मुख्य खोडावर व फांद्यावर येतात. फुले सु. १ मी. लांबीच्या मंजरीवर येतात. फुले पिवळी ते लाल रंगाची, मोठी, १०–१५ सेंमी. व्यासाची आणि भरपूर असतात. फुलात सहा पाकळ्या असून त्या आतून तांबट जांभळ्या रंगाच्या आणि सुवासिक असतात. पुमंग अनेक पुं-केसरांचा बनलेला असून त्याचा आकार नागाच्या फणीसारखा व जायांगाचा आकार पिंडीसारखा दिसतो. म्हणून या वृक्षाला ‘नागलिंगम’ असेही म्हणतात. फळ मोठे, गोल, २० सेंमी. व्यासाचे व तोफगोळ्यासारखे दिसते. यावरून या वृक्षाला तोफगोळा असेही नाव पडले आहे. त्यात अनेक बिया असतात. सुंदर व शोभिवंत फुलांमुळे तोफगोळा वृक्षाची लागवड बागांमध्ये अनेक ठिकाणी केली जाते. पानांचा रस त्वचारोगावर लावतात. पिकलेल्या फळाला कुजलेल्या मांसासारखा वास येतो. ती त्वचेला किंवा कपड्यांना चोपडल्यास कीटक दूर होतात.