पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीराचे सर्वांत मोठे इंद्रिय. शरीराचे अंतर्रचना आणि पर्यावरण यांतील आंतरपृष्ठ असून तो एक संरक्षक स्तर असतो. शरीराचे तापमान नियमित करणे, संवेदनांची जाणीव करणे आणि रोगांचा प्रतिकार करणे ही त्वचेची कार्ये आहेत. मनुष्याची त्वचा जलरोधी असते आणि शरीरातील द्रव पदार्थांना बाहेर पडण्यापासून रोखते. त्वचा शरीराचे वेगवेगळ्या प्रकारे संरक्षण करते. तिच्यामुळे जीवाणू आणि रसायनांना शरीरात शिरण्यास रोखले जातात आणि रोगांपासून बचाव होतो. शरीरातील ऊतींचे सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून संरक्षण होते आणि शरीराचे तापमान सामान्य राखले जाते. त्वचेमध्ये अनेक चेता असतात, त्यांच्याद्वारे थंड, उष्ण तसेच वेदना, दाब आणि स्पर्शाची जाणीव होते. शरीरातील तापमान वाढते तेव्हा त्वचेतील घर्म ग्रंथी घाम स्रवतात. घामाच्या बाष्पीभवनामुळे शरीराचे तापमान कमी होते. थंडी जाणवत असते तेव्हा त्वचेतील रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्यामुळे शरीराच्या पृष्ठभागाकडे होणारा रक्तपुरवठा कमी होतो, शरीरातून उष्णता कमी प्रमाणात बाहेर टाकली जाते आणि शरीरातील उष्णता टिकून राहते.

मानवी त्वचेची रचना

मनुष्याच्या त्वचेमध्ये ऊतींचे तीन थर असतात : (१) बाह्यत्वचा, (२) अंतस्त्वचा व (३) अधस्त्वचा. बाह्यत्वचा हा सर्वांत बाहेरील स्तर असून हा कागदाएवढा जाड असतो. मधल्या स्तराला अंतस्त्वचा म्हणतात. हा स्तर बाह्यत्वचेच्या १५ ते ४० पट जाड असतो. अधस्त्वचा हा सर्वांत आतील स्तर असून व्यक्तीनुसार याच्या जाडीमध्ये विविधता आढळते. मात्र, सर्व व्यक्तींमध्ये अधस्त्वचा ही बाह्यत्वचा आणि अंतस्त्वचा यांच्याहून अधिक जाड असते.

बाह्यत्वचेमध्ये पेशींचे बाहेरून आतमध्ये शृंगस्तर, कणमय स्तर, कंटकी स्तर आणि आधार स्तर असे चार थर असतात. शृंगस्तर साधारणपणे १५ ते ४० केंद्रकविरहीत पेशींच्या स्तराने बनलेला असतो. या पेशी मजबूत व जलरोधी प्रथिनांनी ‘केराटिनानी’ बनलेल्या असून त्यांचा नाश होत असतो. कणमय स्तरातील केंद्रक असलेल्या पेशींमध्ये केराटोहायलीन पदार्थांचे लहानलहान कण असतात. कणमय स्तराखाली मालपीघी स्तर असून यातील पेशी केंद्रक असलेल्या व एकमेकींशी पातळ तंतूंनी जोडलेल्या असतात. या पेशी जेथे एकमेकांना स्पर्श करतात त्या जागी काट्यांसारखी टोके असतात. म्हणून या स्तराला कंटकी स्तर असेही म्हणतात. आधार स्तर हासुद्धा जिवंत पेशींचा असतो. हा स्तर आकाराने लांबट व अरुंद एकेरी स्तराचा असतो. यात मेलॅनीनजनक पेशी असून या पेशी त्वचेला रंग प्राप्त करून देणाऱ्या मेलॅनीन रंगद्रव्याची निर्मिती करतात. आधार स्तरातील पेशींचे सूत्री विभाजन होत असते आणि नव्या पेशी तयार होत असतात. यांपैकी काही नव्या पेशी आधार स्तरात राहतात. उरलेल्या पेशी हळूहळू बाहेरच्या पृष्ठभागाकडे वळतात आणि शेवटी बाह्यत्वचेचा तयार करतात. बाहेरच्या बाजूला सरकणाऱ्या या पेशींना केराटीन पेशी म्हणतात. केराटीन केवळ बाह्यत्वचा, केस आणि नखांमध्ये असते. केराटिनामुळे त्वचा मजबूत बनते आणि शरीरातील द्रव आणि इतर पदार्थांना त्वचेवाटे बाहेर पडण्यापासून रोखते. केराटीन पेशी बाह्यत्वचेच्या दिशेने सरकत असल्यामुळे त्यांच्यातील केराटिनाचे प्रमाण वाढते. या पेशी बाह्यत्वचेच्या पृष्ठभागी पोहोचतात तेव्हा मृत होऊन गळून पडतात.

बाह्यत्वचेच्या आतील स्तर म्हणजे अंतस्त्वचा प्रामुख्याने रक्तवाहिन्या, चेतांची टोके आणि संयोजी ऊतींनी बनलेली असते. अंतस्त्वचा आणि अधस्त्वचा या दोन्ही स्तरांना रक्तवाहिन्यांमार्फत रक्तपुरवठा होतो. अंतस्त्वचेच्या पृष्ठभागावर अनेक लहान उंचवटे (अंकुरक) असतात आणि ते बाह्यत्वचेच्या खालच्या पृष्ठभागामध्ये रुतून बसलेले असतात. या अंकुरकांमुळे अंतस्त्वचा बाह्यत्वचेशी जोडलेली असते. या अंकुरकांमधील चेतांची टोके स्पर्शाला अतिशय संवेदनशील असतात. तळवा आणि बोटांच्या टोकांवर चेतांची अनेक टोके असतात.

अधस्त्वचा स्तरात प्रामुख्याने संयोजी ऊती, रक्तवाहिन्या आणि मेद साठविणाऱ्या पेशी असतात. याच स्तरामुळे शरीराचे धक्क्यापासून किंवा अन्य इजांपासून संरक्षण होते, शरीरातील उष्णता टिकून राहते. अतिसेवनामुळे शरीरातील मेदाचे प्रमाण वाढू शकते. जेव्हा शरीराला अधिक ऊर्जेची गरज भासते तेव्हा साठलेल्या मेदांपासून ऊर्जा मिळविली जाते.

केस, नखे आणि ग्रंथी ही बाह्यत्वचेची उपांगे आहेत. बाह्यत्वचेच्या आधार पेशींपासून ही उपांगे बनतात.

केस

त्वचेचा बराचसा भाग लहानमोठ्या केसांनी झाकलेला असतो. डोके आणि शरीराच्या इतर भागात केस असले तरी तळहात किंवा तळपायावर केस अजिबात नसतात. केसाचा काही भाग त्वचेच्या आत असून हा भाग ज्या पिशवीसारख्या संरचनेत असतो त्याला केशपुटक म्हणतात. केसाचे मूळ ज्याला रोमकंद म्हणतात, हाच फक्त केसाचा जिवंत भाग असतो. हा भाग अंतस्त्वचा किंवा अधिस्त्वचा यांमध्ये असतो. रोमकंदातील पेशींचे विभाजन सतत होत असल्यामुळे केसांची वाढ होते.

नखे

नखाचे आधारक, पट्टिका आणि बैठक असे तीन भाग असतात. नखाच्या तळाशी त्वचेच्या पृष्ठभागाखाली आधारक असतो. आधारकाचा बराचसा भाग त्वचेने झाकलेला असतो. परंतु आधारकाच्या भागामुळे एक अर्धचंद्रकार, पांढरा भाग बनतो जो नखाच्या मुळांशी दिसून येतो. नखाच्या बाहेरील कठीण भागाला पट्टिका म्हणतात. या भागात केराटिनयुक्त सपाट व मृत पेशींचे अनेक स्तर असतात. पट्टिकेच्या खाली बैठक असते. बैठक आणि पट्टिका यांच्यातील पेशी आधारकात तयार होतात. नव्याने तयार झालेल्या पेशी जुन्या पेशींना नखांच्या टोकाकडे ढकलतात. ढकलण्याच्या प्रक्रियेतून नखांची वाढ होते.

ग्रंथी

त्वचेमध्ये दोन प्रकारच्या ग्रंथी असतात; वसामय (तेल) ग्रंथी आणि घर्म ग्रंथी. वसामय ग्रंथी केशपुटकामध्ये उघडतात. या ग्रंथीपासून ‘सेबम’ हा तेलकट पदार्थ स्रवतो. त्यामुळे त्वचा आणि केस यांना वंगण मिळून त्याला चमक येते. घर्म ग्रंथीद्वारे स्रवणाऱ्या घामामुळे शरीर थंड राहते. या ग्रंथी शरीराच्या सर्व भागात असतात; परंतु कपाळ, तळहात आणि तळपाय इ. भागांत या ग्रंथी अधिक संख्येने असतात. यांपैकी काही ग्रंथी सतत स्रवतात तर काही फक्त शारीरिक किंवा भावनिक ताण पडल्यावर स्रवतात. घर्म ग्रंथी बहुतकरून काखेत आणि जांघेत असतात. या ग्रंथी त्यांचा स्राव केशपुटकात स्रवतात. नुकताच स्रवलेला घाम गंधहीन असतो. मात्र त्वचेच्या पृष्ठभागावरील जीवाणूंद्वारे या द्रवावर क्रिया होऊन घामाला विशिष्ट वास येतो.

त्वचेचा रंग लोकसमूह व वैयक्तिक रीत्या वेगवेगळा असतो. त्वचेचा रंग प्रामुख्याने त्वचेमध्ये तयार होणाऱ्या मेलॅनीन (कृष्णरंजक) या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. बाह्यत्वचेतील मेलॅनीन पेशींद्वारे मेलॅनीन तयार होते. सर्व लोकांमध्ये मेलॅनीन पेशींची संख्या जवळपास सारखी असते. मात्र, सावळ्या वर्णाच्या लोकांमध्ये, गोऱ्या वर्णाच्या लोकांच्या तुलनेत अधिक मेलॅनीन तयार होते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील मेलॅनिनाचे प्रमाण आनुवंशिकतेनुसार ठरते. मात्र सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिल्यास मेलॅनीन अधिक प्रमाणात तयार होऊन त्वचा काळवंडते. काही वेळा मेलॅनीन लहानलहान ठिपक्यांत साचले जाते. बहुधा असे ठिपके चेहऱ्यावर किंवा हातावर दिसतात. व्यक्तीचे वय जसे वाढते तसे मेलॅनीन पेशी असमान दराने मेलॅनिनाची निर्मिती करतात. त्यामुळे त्वचेचा काही भाग फिकट तर काही भाग गडद दिसतो. वयानुसार त्वचा जाड व शुष्क होते आणि सुरकुत्या पडून खपल्या पडू लागतात. मनुष्याच्या अंतस्त्वचेतील कोलॅजेनचे प्रमाण कमी झाल्यास त्वचा ढिली पडते व त्वचेला सुरकुत्या पडतात. वृद्धात त्वचेला पडणाऱ्या सुरकुत्या याच कारणास्तव पडतात. वृद्ध माणसाची त्वचा खरबरीत होते आणि तिला इजाही सहज होते. जखम भरून यायला वेळ लागतो.

वेगवेगळ्या कारणांमुळे त्वचेचे काही विकार होतात; उदा., त्वचादाह, संसर्ग, भाजणे, अर्बुद आणि अन्य विकार. इसब हा रोग त्वचादाहाचे सामान्य कारण असून त्यामुळे त्वचेला खाज सुटते आणि त्वचा लाल होते. काही वेळा त्वचेवर कवच तयार होते किंवा त्यातून द्रव बाहेर पडतो. लहान मुलांमध्ये बऱ्याचदा हा विकार दिसून येतो. चेहरा, मानेची मागील बाजू, गुडघे या भागात इसबाचे चट्टे दिसतात. जीवाणू, कवके, परजीवी किंवा विषाणू यांच्याद्वारे त्वचेला संसर्ग होतो. जर जखमेमुळे त्वचा उघडी पडलेली असेल तर यांपैकी काही सूक्ष्मजीव शरीरात शिरून त्वचेच्या पृष्ठभागावर राहतात. जीवाणूंमुळे गळू होते. कवकांमुळे नायटा आणि अ‍ॅथलेट फूटसारखा आजार होतो. उवा आणि खरजेच्या परजीवीमुळे त्वचेला खाज सुटते. तसेच या रोगांमुळे इतरांना संसर्ग होतो.

आग, रसायने, विजेचा धक्का किंवा तीव्र सूर्यप्रकाशात अधिक काळ राहिल्यास त्वचा भाजते. त्वचा भाजण्याचे मोजमाप टक्केवारीत केले जाते. हे समजण्यासाठी तळहाताची त्वचा एक टक्का असते हे परिमाण लक्षात घ्यावे. पाठ-पोट अठरा टक्के, दोन्ही हात नऊ टक्के, दोन्ही पाय दहा टक्के, चेहरा-डोके प्रत्येकी साडेचार टक्के वगैरे. त्वचा किती प्रमाणात भाजली आहे त्यानुसार उपचार केले जातात. काही रुग्णांमध्ये त्वचा खूप जळालेली असल्यास त्या भागातील ऊती काढून नवीन त्वचा लावली जाते. याला त्वचारोपण असे म्हणतात. सूर्यदाह सौम्य किंवा तीव्र असू शकतो. सूर्यदाह दीर्घकाळ होत राहिल्यास त्वचेच्या पेशींत अनियंत्रित वाढ होऊन त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. त्वचेवरील मुरुमे, कुरूप, कंडुरोग व कोड हे त्वचेचे विकार आहेत. पौंगडावस्थेतील काही मुलांमध्ये मुरुमे दिसून येतात, तर योग्य प्रकारची पादत्राणे न वापरल्यामुळे पायाच्या त्वचेला कुरूपे होतात. त्वचेतील मेलॅनीन पेशी नष्ट झाल्यामुळे शरीरावर कोड उठलेले दिसते.

इतर पृष्ठवंशीय प्राण्यांची त्वचा

सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या त्वचेचे बाह्यत्वचा आणि अंतस्त्वचा असे भाग पडतात. मात्र प्रत्येक जातीच्या प्राण्यांच्या त्वचेची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात आणि ती प्राण्यांच्या पर्यावरणाशी मिळतीजुळती असते. पक्ष्यांची त्वचा पातळ असून ती पिसांनी आच्छादलेली असते. मनुष्यात जशी केशपुटके असतात तशा प्रकारच्या पुटकांपासून पिसे वाढतात. ठराविक काळाने पक्ष्यांची पिसे गळून पडत असतात. नवीन पिसे सतत वाढत असतात आणि ही पिसे गळलेल्या पिसांची जागा घेतात. पक्ष्यांच्या शेपटीच्या खाली एक मोठी तेलग्रंथी असते. पक्षी त्यांच्या चोचीच्या मदतीने तेल जमा करतात आणि त्यांच्या पिसांवर पसरतात. त्यामुळे पक्ष्यांची पिसे जलरोधी बनतात. साप आणि सरड्यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांची त्वचा कोरडी व खवल्याखवल्यांची असते. सागरी कासवांच्या कवचाच्या खालचा स्तर हाडांचा तर वरचा स्तर त्वचेचा असतो. उभयचर आणि माशांच्या त्वचेवर श्लेष्मल पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. माशांच्या त्वचेवर खवले असतात.