पॅसिफ्लोरेसी कुलातील सदाहरित किंवा निमसदाहरित वनस्पती. या कुलात सु. ४०० जाती असून प्रामुख्याने शोभेसाठी त्याची लागवड करतात. पॅसिफ्लोरा प्रजातीत एकूण सु. २४ जाती असून त्या सर्व मूळच्या दक्षिण अमेरिकेतील आहेत. या वनस्पती अमेरिकेची संयुक्त संस्थाने, दक्षिण अमेरिका, न्यू गिनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इ. प्रदेशांत आढळतात. आता त्या उष्ण आणि उपोष्ण कटिबंधांतील इतर देशांत बागांतून लावलेल्या आढळतात. कृष्णकमळाच्या ५-७ जाती भारतात आढळतात.

पॅसिफ्लोरा प्रजातीत भारतात आढळणार्या सर्व जाती प्रतानांच्या साहाय्याने वर चढतात. झाडांचा आधार मिळाल्यास या वेली ६-७ मी. उंच वाढू शकतात. पाने साधी, एकाआड एक व हाताच्या आकाराची असून ५-७ खंडांत विभागलेली असतात. फुले आकाराने मोठी आणि आकर्षक असतात. तसेच फुले लाल, पिवळी, जांभळी वा हिरवी अशा विविध रंगांत येतात. काहींची फुले सुगंधी असतात. फळ साधे व पिवळ्या रंगाचे असून गरात अनेक बिया असतात. बिया चपट्या व अंडाकृती असतात. काही जातींची फळे खाद्य आहेत उदा., ग्रॅनाडिला, बार्बाडाईन, पॅशनॅरिया, मेराकुजा मेलावो, वॉटर लेमन, पोमेलिऑन इत्यादी.
निळ्या कृष्णकमळाची (पॅसिफ्लोरा सेरूलिया) फुले सुंगधी असतात. पॅशन फ्रूट (पॅसिफ्लोरा एड्यूलिस) या निळ्या सुंगधी फुलांची जाती भारतात आणून लावली असून,तिची पिवळी फळे खाद्य आहेत. त्यांच्यातील गर पौष्टिक असतो. या वेली बागेत मांडवावर, कमानीवर किंवा बंगल्याच्या काही भागांवर चढवितात. समारंभात सुगंधी फुलांच्या जातीचा वापर करतात. निद्रानाश व अस्वस्थता दूर करण्यासाठी कृष्णकमळाच्या काही जातींचा उपयोग होतो. पॅसिफ्लोरा फेटिडा ही लहान पांढर्या फुलांची जाती असून तिच्या पानांचा काढा, दमा व पित्तविकारावर उपयुक्त असतो; फळ वांतिकारक असून याची पाने डोकेदुखीवर व घेरीवर डोक्याला बांधतात.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.