दत्रंग हा पानझडी वृक्ष बोरॅजिनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव एहरेशिया लेविस आहे. भोकर ही वनस्पतीही याच कुलातील आहे. चीन, भारत, भूतान, पाकिस्तान, म्यानमार, व्हिएटनाम, ऑस्ट्रेलिया इ. देशांत हा वृक्ष आढळतो. भारतात तो सर्वत्र आढळत असून हिमालयाच्या पायथ्याला, सातपुडा व सह्याद्री परिसरात तो वनांमध्ये दिसून येतो. अजानवृक्ष म्हणूनही हा ओळखला जातो.

दत्रंग (एहरेशिया लेविस): फुले व फळांसहित वनस्पती

दत्रंग हा झुडूपवजा वृक्ष (सु. २ मी.) किंवा मध्यम आकाराचा (सु. १० मी.) असतो. खोडाची साल पिवळसर राखाडी रंगाची असते. पाने एकाआड एक, साधी, गडद हिरवी व विविध आकारांची असून वसंत ऋतूमध्ये ती येतात. फुले पांढरी, फांद्यांच्या टोकांना किंवा पानांच्या बगलेत, बिनदेठाची व लहान तुऱ्यात असतात. ती ५–१० मिमी., तारकाकृती आणि सुवासिक असतात. फुलांमध्ये पाकळ्या व पुं-केसर प्रत्येकी पाच असून फुले लवकर गळतात. त्यामुळे झाडाखाली पांढऱ्या रंगाचे जाजम अंथरल्यासारखे वाटते. फळे वाटाण्याएवढी, गोल, गुळगुळीत व हिरव्या घोसात असतात. ती पिकल्यावर भगव्या किंवा नारिंगी काळ्या रंगाची होतात. त्यांमध्ये १–४ लहान बिया असतात. फळातला गर खाण्यायोग्य असतो. मात्र तो फारच थोडा असतो. खारी व पक्षी ही फळे खातात. या झाडाची साल चघळल्यास दात लाल होतात.

दत्रंग वृक्षाचे लाकूड पिवळट किंवा करडे, चमकदार, मध्यम कठीण, सुबक व टिकाऊ असून कुंचल्यांच्या दांड्यांसाठी, आगपेट्या व आगकाड्या, बुटाचे साचे यांसाठी तसेच घरबांधणीसाठी व इतर किरकोळ कामासाठी वापरतात. पाने गुरांसाठी चारा म्हणून देतात.