अशोक, आपटा, गुलमोहर इत्यादींचा समावेश असलेल्या सीसॅल्पिनिऑइडी या फुलझाडांच्या उपकुलातील वनस्पती. ही बहुवर्षायू वनस्पती मोठी आणि काटेरी वेल असून तिचे शास्त्रीय नाव सीसॅल्पिनिया बोंड्यूसेला आहे. बहुधा कुंपणावर किंवा इतर झाडांवर ही चढलेली आढळते. भारत, पाकिस्तान आणि उष्ण कटिबंधातील इतर प्रदेशांत हिचा प्रसार झलेला दिसतो. भारतात सर्वत्र पडीत जमिनीत आणि समुद्रकिनारी ही वनस्पती दिसून येते.

गजग्याची वेडीवाकडी वाढणारी वेल काट्यांच्या आधारे वर चढते. हिच्या बहुतेक सर्व भागांवर कठीण, सरळ किंवा हुकाप्रमाणे पिवळसर काटे असतात. पाने संयुक्त, पिसांसारखी आणि आकाराने मोठी असून पर्णिकांच्या सात जोड्या असतात. फुले पिवळी, फांदीच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत येतात. शेंगा लंबगोल, फुगीर व काटेरी असतात. बिया एक-दोन टणक, गुळगुळीत, गोल किंवा लंबगोल असतात. कालांतराने या हिरव्या बिया राखाडी होतात. या बियांनाच सागरगोटे म्हणतात.

गजग्याच्या मुळाची साल, पाने, फुले आणि बिया औषधी आहेत. या झाडात बोंड्यूसीन नावाचे कटुद्रव्य असते. मुळाची साल दमा व मोठ्या आतड्यांचे विकार यांवर उपयुक्त असून ती ज्वरनाशक आहे. फळे शक्तिवर्धक आणि ज्वरनाशक आहेत. बियांपासून मिळणारे तेल चेहर्‍यावरील मुरुम व पुळ्या जाण्यास लावतात. कानातून पू वगैरे जात असल्यास त्याचे एक-दोन थेंब कानात टाकतात. बियांपासून अलंकारदेखील तयार करतात.