श्वसनमार्गाला झालेला दाहयुक्त व दीर्घकालीन रोग. श्वासनलिका आकुंचित होणे, त्यांच्या श्लेष्मल पटलाच्या अस्तराला सूज येणे किंवा त्यांच्या पोकळीत साचणाऱ्या स्रावामुळे श्वसनक्रियेत वारंवार अडथळा येणे इत्यादी कारणांमुळे दमा उद्भभवतो. तो तात्कालिक किंवा दीर्घकाळ टिकणारा असू शकतो. दम्याचा झटका काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकतो किंवा काही दिवसांपर्यंत अधूनमधून चालू राहतो. जगात सु. ३० कोटी लोक (२०११) या रोगाने त्रस्त असून त्यांपैकी दरवर्षी सु. अडीच लाख लोक या रोगाला बळी पडतात.

दम्याचा झटका वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकतो. श्वासवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे छातीतून घरघर आवाज येतो व खोकला येतो. शरीराला ऑॅक्सिजनाचा पुरवठा कमी झाल्यामुळे छातीत दुखणे, ओठ व शरीर निळे पडणे, घाम येणे, छातीत धडधड होणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे टिकून राहिल्यास श्वासवाहिन्यांचे स्थितिस्थापकत्व नाहीसे होते. त्यामुळे छाती भरल्यासारखे वाटते. याला एम्फीसिमा किंवा सीओपीडी (क्रॉनिक ऑॅबस्ट्रक्टीव्ह पल्मनरी डिसीज) म्हणतात.

अधिहर्षता, श्वसनमार्ग रोगकारक संक्रामण आणि काही वेळा मानसिक कारणे ही दम्याची मुख्य कारके आहेत. परागकण, धूलिकण, प्राण्यांचे केस किंवा त्यांच्या त्वचेचा कोंडा, माइट (संधिपाद प्राणी) सौंदर्यप्रसाधने, इतर रसायने, अन्नपदार्थ, हवेतील प्रदूषकांचे वाढते प्रमाण तसेच ऑॅक्सिजन वायूचा कमी पुरवठा यांमुळे अधिहर्षता होते. जीवाणू, विषाणू व कवके यांच्या संक्रामणामुळे श्वासनलिकेचा दाह होऊन दमा होतो. मानसिक ताण, चिंता, उद्वेग, विषण्णता इत्यादी मानसिक बाबींमुळे दम्याची लक्षणे दिसू शकतात. दमट व धुरकट वातावरणात दम्याचा जोर वाढतो. तसेच गर्दी व शहरातील अस्वच्छ वातावरण हेही दमा होण्यास कारणीभूत असतात.

दम्याच्या विकारामुळे शरीरावर तात्कालीन किंवा कायम स्वरूपी परिणाम होऊ शकतात. त्याच्या झटक्यामुळे लगेच मृत्यू ओढवण्याची शक्यता कमी असते; परंतु शरीरातील कायम स्वरूपी परिणामांमुळे फुप्फुस आणि हृदय या इंद्रियांवर परिणाम होऊन मृत्यू संभवतो.

कोणत्याही वयाच्या व्यक्तीला दमा होऊ शकतो. लहान मुलांना तो विशेषेकरून सुरू होतो. मात्र, लहान मुलांत झालेला दमा मोठेपणी आपोआप बरा होतो, याला बाल दमा म्हणतात. हृदय विकारात रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल तर त्याला हृदय विकारजन्य दमा म्हणतात. स्त्री-पुरुषांमधील दम्याचे प्रमाण सारखेच आहे. दम्यावर औषधोपचार पुढील तीन प्रकारांनी करतात : (१) श्वासनलिकांचे आकुंचन न होऊ देणे किंवा त्यांचा विस्फार करणे. (२) श्वासनलिकामधील स्राव पातळ करून शोषून घेणे किंवा कमी करणे आणि (३) अधिहर्षतेचा परिणाम शरीरावर कमी करणे किंवा होऊ न देणे.

दम्याची औषधे स्वतंत्रपणे किंवा एकत्रित मात्र तोंडावाटे, फवारा उडवून किंवा अंत:क्षेपकाद्वारे दिली जातात. तसेच तज्ज्ञांमार्फत कफोत्सारक किंवा मन:शांती देणाऱ्या औषधांची योजना केली जाते. ज्या गोष्टींची अधिहर्षता आहे, त्या गोष्टी टाळण्याचा सल्ला देतात. श्वसनाचे व्यायाम केल्यास स्राव काढून टाकण्यास किंवा ऑॅक्सिजनाचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. योगाभ्यास आणि प्राणायाम यांमुळे हे साध्य होते. होमिओपॅथीतही यासंबंधी औषधे दिलेली आहेत. आंबा, हळद, लवंग, हिंग, सुंठ, लसूण, कांदा, गाजर या वनस्पतींच्या मुळाचा रस औषधी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्यावा.