बडिश मीन(लोफियस पिस्केटोरियस)

अस्थिमत्स्य वर्गाच्या लोफिइफॉर्मिस गणातील १८ कुलांमधील सागरी माशांना सामान्यपणे बडिश मीन म्हणतात. जगात सर्वत्र त्यांच्या सु. ३२० जाती आहेत. त्यांपैकी काही जाती समुद्रतळाशी, काही २-३ किमी. खोलीवर तर काही समुद्राच्या पृष्ठावर राहतात. बडिश म्हणजे अँग्लर आणि मीन म्हणजे मासा. अँग्लर या इंग्रजी शब्दाचा अर्थ ‘मासे पकडायचा गळ’ असा आहे. या माशांच्या तोंडावर एक लांब व काटेरी शूल असतो. या शूलाचा वापर मासे पकडायच्या गळासारखा करून बडिश मीन त्यांचे भक्ष्य पकडतात. त्यामुळे त्यांना ‘गळवाला मासा’ असेही म्हणतात. अटलांटिक महासागराच्या पूर्व भागात उथळ पाण्यामध्ये राहणाऱ्‍या बडिश माशाच्या जातीचे शास्त्रीय नाव लोफियस पिस्केटोरियस आहे. महाराष्ट्रालगतच्या समुद्रात अँटेनॅरियस हिस्पिडसहिस्ट्रिओ हिस्ट्रिओ या त्यांच्या दोन जाती आढळतात. अँटेनॅरियस हिस्पिडस जातीची मादी सु. २० सेंमी. लांब असते.

बडिश माशाची मादी आकाराने नरापेक्षा मोठी असते. सर्वांत मोठ्या बडिश माशाची मादी  १–१·५ मी. लांब असून वजन सु. २३ किग्रॅ. असते. नराच्या शरीराची लांबी सु. ४० सेंमी. असते. बडिश माशांचा पोटाकडील भाग सपाट व पाठीकडचा भाग फुगीर असतो. तोंडाकडील भाग रुंद व अंडाकार असून शेपटीचा भाग निमुळता होत गेलेला असतो. त्वचा खडबडीत असून त्यावर मांसल उंचवटे असतात. दिसायला हा मासा कुरूप दिसतो.

बहुतेक बडिश माशांच्या पृष्ठपरातील पहिल्या शूलाचे रूपांतर मासे पकडायच्या गळासारख्या दिसणाऱ्‍या भागात झालेले असते. हा शूल इतर शूलांच्या मानाने अधिक लांब असतो आणि त्याच्या टोकाला एक मांसल पुंजका असून त्याची हालचाल करता येते. त्याचा वापर तो गळ लावलेल्या लवचिक छडीसारखा करतो. फसव्या आमिषाला भुलून ते खाण्यासाठी भक्ष्य जेव्हा जवळ येते, तेव्हा बडिश मासा भक्ष्याला तोंडात घेतो आणि गिळतो. लहान मासे, इतर लहान सागरी प्राणी इ. तो खातो. बडिश माशाची त्वचा पार्श्वभूमीला मिळतीजुळती असल्यामुळे त्याचे अस्तित्व शत्रूला तसेच भक्ष्याला अजिबात लक्षात येत नाही. हे मायावरणाचे एक उदाहरण आहे. हे मासे सोयीच्या जागी निश्चल राहून भक्ष्य जवळ येण्याची वाट पाहतात आणि भक्ष्य जवळ आले की त्याला गिळतात.

बडिश माशांमधील प्रजनन वैशिष्ट्यपूर्ण असते. नर मासे मादीपेक्षा आकाराने लहान असतात. खोल समुद्रात त्यांना अन्न मिळविणे अवघड जात असल्यामुळे ते मादीच्या शरीरावर परजीवी म्हणून वाढतात. नर त्यांच्या शरीरातील गंधपेशींच्या साहाय्याने मादीचा गंध ओळखून तिचा माग काढतात. मादी सापडली की ते मादीच्या त्वचेमध्ये जबड्यातील तीक्ष्ण दात खुपसून मादीच्या शरीराला चिकटून राहतात. मादीच्या शरीरातील रक्तवाहिन्यांशी नराच्या रक्तवाहिन्या जुळतात. तिच्या रक्तावर नराचे पोषण होत राहते, मात्र त्याच्या इतर अवयवांची वाढ खुंटते. एका मादीच्या शरीरावर ५-६ नर परजीवी म्हणून वाढू शकतात. एकदा नर मादीला चिकटला की तो कायमचा मादीवर पोषणासाठी अवलंबून असतो. नराची पचनसंस्था, मेंदू, हृदय व डोळे हे अवयव नष्ट होऊन केवळ त्याची प्रजनन इंद्रिये कार्यक्षम राहतात. मादी जेव्हा पाण्यात अंडपेशी सोडते तेव्हा तिच्या शरीरावर असलेल्या नरांद्वारे शुक्रपेशी पाण्यात सोडल्या जातात आणि अंडांचे बाह्यफलन घडून येते.

समुद्रतळाशी राहणारे काही बडिश मासे भक्ष्य पकडण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा वापर करतात. ते त्यांच्या गळाच्या टोकाला असलेल्या मांसल पुंजक्यातून प्रकाश बाहेर फेकतात. जीवाणूंबरोबर घडून आलेल्या सहजीवनामुळे हा जीवदीप्तीचा आविष्कार घडून येतो. समुद्रातील जीवाणू लहान छिद्रावाटे या मांसल पुंजक्यात शिरतात आणि जोपर्यंत पुरेसा प्रकाश बाहेर फेकला जात नाही, तोपर्यंत ते जीवाणू गुणित होत राहतात. काही बडिश माशांचे वक्षीय पर तळव्यांसारखे मजबूत असून त्यांच्या मदतीने ते समुद्रतळावर रांगतात. या माशांना भक्ष्याच्या आकारमानानुसार जबडा आणि पोट मोठे करता येते. त्यामुळे ते त्यांच्यापेक्षा दुप्पट आकाराच्या भक्ष्याला खाऊ शकतात. बडिश माशांच्या काहीं जाती जलजीवालयात देखील ठेवल्या जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा