त्वचेपासून निघणार्‍या लांबट तंतूसारख्या व केराटीन या प्रथिन पदार्थांनी बनलेल्या बाह्य वाढींना केस म्हणतात. स्तनी वर्गाचे हे वैशिष्ट्य आहे. बहुतेक सस्तन प्राण्यांमध्ये तळहात व तळपाय यांखेरीज सर्वत्र केस आढळतात. डोके, भुवया, हातपाय आणि जांघ अशा शरीराच्या वेगवेगळ्या भागांत केस असले, तरी ते वेगवेगळ्या प्रकारांचे असतात. लांबी, जाडी, रंग आणि कुरळेपणा यांमध्ये हे फरक दिसून येतात.

संरचना आणि वाढ 

केसाचा उभा छेद

त्वचेच्या पृष्ठभागाखाली केसाचा भाग एका पिशवीत असतो. या पिशवीला केशपुटक (फॉलिकल) असे म्हणतात. या पुटकाच्या बाजूस मेदग्रंथी व मेदग्रंथिनलिका असते. मेदग्रंथीचा तेलकट स्राव केसांना मिळतो. त्यामुळे केस कोरडे आणि ठिसूळ होत नाहीत. पुटकालाच एक सूक्ष्म स्नायू जोडलेला असून त्याच्या आकुंचनामुळे केस ताठ उभे राहतात. केसाच्या तळाकडील भाग म्हणजे केसाचे मूळ. ते टोकाला फुगीर, मऊ आणि फिकट रंगाचे असते. याला लोमपुटक (रोमकंद) म्हणतात. या लोमपुटकातील पेशींपासून केसांची वाढ होते. या पेशींचे विभाजन वेगाने घडून येते. यात संयोजी ऊती आणि रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे वाढणार्‍या पेशींना रक्तपुरवठा होतो.

लोकपुटकातील तळाकडील भागात नवीन पेशी तयार होत असताना आधीच्या पेशी वरवर सरकतात व त्यांना मिळणारी पोषक द्रव्ये कमी होतात. त्वचेच्या पृष्ठभागावर केस आला की, या पेशींचे रूपांतर कठीण प्रथिनांत (केराटिनात) होते. पेशींचे रूपांतर केराटीनमध्ये झाले की, केसांच्या पेशी मृत होतात. केसाच्या या केराटीन भागाला केशदंड म्हणतात.

केशदंड मृत पेशींच्या स्तरांनी बनलेला असतो. सर्वांत बाहेरचा क्युटिनस्तर चपट्या पेशींचा बनलेला असतो. क्युटिनस्तराच्या आत बाह्यांग स्तर असतो. बाह्यांग स्तरात पेशी खडूच्या आकाराच्या असून एकमेकांना घट्ट जोडलेल्या असतात. बाह्यांगात ‘काली’ किंवा ‘कृष्ण’ (मेलॅनीन ) यांसारखी रंगद्रव्ये असल्यामुळे केसांना रंग प्राप्‍त होतो. केशदंडाच्या गाभ्याला मध्यांग म्हणतात. या स्तरात खोक्याप्रमाणे दिसणार्‍या पेशी एकमेकांशी सैलपणे जोडलेल्या असतात. याच पेशींपासून प्रामुख्याने केराटीन बनते.

सस्तन प्राण्यांच्या शरीरावर आढळणार्‍या केसांचे प्रमाण आणि स्वरूप यांत विविधता असते. हिप्पोपोटॅमस, गवा, गेंडा, हत्ती इ. प्राण्यांच्या अंगावर अगदी थोडे केस असतात. त्यांना ‘दृढरोम’ म्हणतात. देवमाशाच्या तोंडाभोवती थोडे केस असतात. हे केस खरखरीत व खुंटासारखे असून त्यांना ‘स्पर्शरोम’ म्हणतात. त्यांच्यामुळे स्पर्शसंवेदना निर्माण होतात. काटेरी मुंगीखाऊ आणि जाहक यांच्या अंगावरचे छोटे काटे, सायाळीच्या अंगावरील तीक्ष्ण शलली (पिसे), खवल्या मांजराचे खवले आणि गेंड्याचे शिंग हे सर्व प्रकार केसांच्या परिवर्तनाने उत्पन्न झाले आहेत. गेंड्याचे शिंग म्हणजे एकमेकांत गुंतून एकजीव झालेल्या केसांचा घट्ट जुडगाच असतो.

केस ही कायम स्वरूपाची संरचना नसते. सस्तन प्राण्यांच्या जीवनक्रमात पहिल्या केसांच्या जागी नवीन केस उत्पन्न होत असतात. केसांमुळे त्वचेच्या तापमानाचे नियंत्रण होते. थंड हवामानात केसांची मुळे स्नायूंच्या आकुंचनाने उचलली जाऊन केसांच्या आवरणाची जाडी वाढते व थंडीपासून संरक्षण होते. काही प्राण्यांना केसांमुळे आघातापासून संरक्षण मिळते. काही प्राण्यांत केसांच्या रंगांत फरक पडून परिस्थितिसदृश असा रंग येऊन त्यांना संरक्षण मिळते. काही प्राण्यांमध्ये विशिष्ट ठिकाणच्या केसांची वाढ ही गौण अथवा दुय्यम लैंगिक लक्षणे असतात. उदा., सिंहाची आयाळ, माणसाच्या दाढी-मिशा इत्यादी.

केसांचा रंग त्यांमध्ये असणार्‍या कृष्णरंजक या घटकाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हा घटक कृष्णरंजी कोशिकांद्वारे ( मेलॅनोसाइट) तयार होत असतो. कृष्णरंजकाखेरीज केसांमध्ये पिवळसर-लाल रंगद्रव्यही असते. हे रंगद्रव्य केसांमध्ये मेलॅनीन कमी प्रमाणात झाल्यास दिसून येते. कृष्णरंजी कोशिका पेशी मृत पावल्या की, या रंगद्रव्याची निर्मिती थांबते आणि केस राखाडी वा पांढरे होतात. केसांचा पोत मोठ्या प्रमाणात त्यांच्या आकारावर ठऱतो. सरळ केस आकाराने वाटोळे असतात, तर कुरळे केस आकाराने चपटे असतात.

माणसांमध्ये डोक्यावरील केसांची संख्या सर्वसाधारणपणे एक लाख असते. टाळूवरील केशपुटकांची वाढ थांबल्यास केसांची निर्मिती थांबून टक्कल पडते. याशिवाय संसर्ग, किरणोत्सार इ. कारणांमुळे टक्कल पडते. आनुवंशिक कारणांमुळे पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण अधिक आढळले आहे.

नियमित केस विंचरणे, रिठा, शिकेकाई किंवा शॅम्पूने केस धुणे आणि संतुलित आहार घेणे इत्यादींमुळे केस स्वच्छ राहतात. तसेच त्यांची वाढ चांगली होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा