कोंबडीसारखा दिसणारा एक पक्षी. टर्कीचा समावेश पक्ष्यांच्या गॅलिफॉर्मिस गणाच्या फॅसिअ‍ॅनिडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव मेलिअ‍ॅग्रिस गॅलोपॅव्हो आहे. त्यांना सामान्यपणे वन्य टर्की (वाइल्ड टर्की) असे म्हणतात. हे पक्षी मूळचे अमेरिका, द. कॅनडा आणि मेक्सिको भागातील असून तेथील वनांमध्ये मोठ्या संख्येने होते. ते घोळक्याने राहत; परंतु बाहेरून तेथे आलेल्या लोकांनी पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत बेसुमार शिकार केल्याने त्यांची संख्या फारच घटली. आता ते मूळच्या ठिकाणी केवळ दुर्गम भागात आढळतात. पाळीव टर्की वन्य टर्कीपासूनच निर्माण झाले आहेत, असे मानतात. टर्की पक्ष्याला सुरुवातीला गिनी कोंबडी म्हणत. मध्ययुगीन काळात कॉन्स्टँटिनोपल शहरात तुर्कस्तानी व्यापारी त्या पक्ष्याचा व्यापार करीत. म्हणून त्याला ‘टर्की’ हे नाव पडले आहे.

टर्की (मेलिअ‍ॅग्रिस गॅलोपॅव्हो)

टर्की टर्की हा डौलदार आणि आकाराने कोंबड्यांहून मोठा असलेला पक्षी आहे. त्याच्या बिरंजी रंगावर निळ्या, हिरव्या किंवा काळ्या रंगाची झळाळी असते. डोके व मान यांवर पिसे नसल्यामुळे हा भाग उघडा दिसतो. या पक्ष्याच्या चेहऱ्यावर चोचीजवळून एक लांब मांसल भाग वाढलेला दिसतो. त्याला कॅरंकल म्हणतात. तसेच केसांसारख्या पिसांचा एक झुबका त्याच्या छातीवरून खाली लोंबत असतो.

टर्की बहुतांशी काळ जमिनीवर वावरतात. ते जलद पळू शकतात व उडून झाडाच्या फांद्यांवर बसू शकतात. ते जास्तीत जास्त दीड किमी. अंतरापर्यंत उडत जाऊ शकतात. कोंबड्याप्रमाणे तेही पायांनी माती उकरून त्यातील कीटक, अळ्या, इतर लहान प्राणी किंवा लहान फळे, बिया इत्यादी खातात. अन्य प्राण्यांप्रमाणे नर हे मादीपेक्षा आकर्षक असतात. त्यांच्यात बहुयुग्मकता (पॉलीगॅमी) आढळते. ते प्रजननकाळात जमिनीवर झुडपांच्या आडोशाला खळगा करून त्यात पाने घालून घरटी तयार करतात. त्यात मादी ८-१५ अंडी घालते. काही वेळा दोन किंवा तीन माद्या एकाच घरट्यात अंडी घालतात. अंडी फुटून त्यातून स्वत:चे अन्न वेचू शकतील अशी पिले बाहेर पडतात. मादी त्यांचे संरक्षण करते.

अनेक पाश्चिमात्य देशांत मांसाकरिता टर्की पक्ष्याला मागणी असते. पीक कापणीपूर्वी आभार मानण्याचा उत्सव साजरा करताना त्या दिवशी दिल्या जाणाऱ्या भोजनात टर्की पक्ष्यांचे मांस असते. इंग्रजांनी हे पक्षी भारतात आणले. परंतु भारतात त्यांच्या पालनाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही.