एक सागरी मासा. बांगड्याचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या पर्सिफॉर्मिस गणाच्या स्काँब्रिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव स्काँबर मायक्रोलेपिडोटस आहे. तांबडा समुद्र आणि पूर्व आफ्रिका येथील समुद्रकिनारा, भारताचा समुद्रकिनारा, चीनचा दक्षिण किनारा तसेच ऑस्ट्रेलिया व मलेशिया यांचा समुद्रकिनारा अशा विस्तृत सागरी प्रदेशांत बांगडा आढळतो. भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर तो मुबलक प्रमाणात आढळत असल्यामुळे तेथील मासे खाणाऱ्या लोकांच्या आहारात त्याचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. महाराष्ट्रात बांगड्याला लबलबा, तेल-बांगडा, बांगडई अशीही नावे आहेत.

बांगडा (स्काँबर मायक्रोलेपिडोटस)

बांगडा माशाची लांबी २०–२५ सेंमी. असते. काही वेळा सु. ३१ सेंमी. लांबीचे बांगडे आढळले आहेत. त्याच्या शरीराचा रंग हिरवट-काळा असून दोन्ही बाजूंच्या निळसर-जांभळ्या रंगाला धातूसारखी चमक असते. तो लांब असून शेपूट व डोके अशा दोन्ही टोकांना निमुळता होत गेलेला असतो. डोके व डोळे मोठे असतात. खालचा जबडा वरच्या जबड्यापेक्षा थोडा पुढे आलेला असतो. दोन्ही जबड्यांवर एकसारखे बारीक दात असतात. बांगड्याला दोन पृष्ठपर असतात. पृष्ठपर पिवळे असून त्यांची टोके काळी असतात. पुच्छपर म्हणजे शेपटीचा पर पिवळा असून त्याच्या कडा काळ्या असतात. हा पुच्छपर दोन टोकदार भागांत विभागलेला असतो. दुसरा पृष्ठपर व गुदपर यांच्यानंतर ५-६ लहान व टोकदार पर असतात. गुदपरावर काळे ठिपके असतात. शरीरावर काळपट करडे ठिपके असतात. ताज्या बांगड्यावर सोनेरी चमकदार छटा आढळते. स्पेनमध्ये आढळणारा बांगडा ७६ सेंमी.पर्यंत लांब असतो.

बांगडा मासे थव्याने वावरतात. वनस्पतिप्लवक, प्राणिप्लवक, लहान मासे, नळ, म्हाकूळ, अष्टपाद यांसारखे मृदुकाय आणि झिंगे व कोळंबी यांसारखे कवचधारी संधिपाद प्राणी यांवर ते उपजीविका करतात. एप्रिल-मे आणि सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत असे वर्षातून दोन वेळा ते प्रजनन करतात. मादी एका हंगामात सु. ९४,००० अंडी घालते. प्रजनन हंगामात २-३ वेळा अंडी घातली जातात. अंड्यांचा व्यास सु. एक मिमी. असून त्यांत ०·२५ मिमी. व्यास असलेला तेलाचा थेंब असतो. अंडी हलकी असून पाण्यावर तरंगतात.

बांगडे मोठ्या पिशवी जाळ्याने तसेच रापण जाळ्याने पकडले जातात. बांगड्यात सु. २०% प्रथिने तसेच कॅल्शियम, फॉस्फरस व लोहयुक्त घटक असतात. मेदाचे प्रमाण सु. १५% असते. बांगडा हा ओमेगा-३ या मेदाम्लाचा उत्तम (३ ग्रॅ. प्रति १०० ग्रॅ.) स्रोत आहे. तो ताजा, सुकवून किंवा खारवून-सुकवून खातात. जाळ्यात सापडलेल्या अतिरिक्त बांगड्यांपासून खत आणि बांगडा चूर्ण तयार करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा