शरीराला ऊर्जा पुरविणाऱ्या पोषकद्रव्यांच्या कर्बोदके, मेद आणि प्रथिने या तीन मुख्य गटांपैकी एक गट. सर्व सजीवांच्या पेशींमध्ये निरनिराळे मेद पदार्थ असतात. निरनिराळ्या पेशींमध्ये त्यांचे प्रमाण कमीजास्त असून शरीराच्या विविध कार्यांसाठी मेद आवश्यक असतात. शरीरातील ऊर्जेची साठवण आणि संदेशन ही मेदांची प्रमुख कार्ये आहेत. तसेच पेशींच्या पटलाच्या संरचनेमध्ये मेद हे प्रमुख घटक असतात. मेदांच्या रेणूमध्ये कार्बन व हायड्रोजन यांचे प्रमाण (८९%) ऑक्सिजनच्या प्रमाणापेक्षा जास्त असते. कार्बन व हायड्रोजन यांचे हे मेदातील प्रमाण प्रथिने (५७%) व कर्बोदके (४७%) यांतील प्रमाणापेक्षा जास्त असते. १ ग्रॅ. मेदांपासून ९ किकॅ. उष्मांक मिळतात, तर प्रथिने व कर्बोदके यांच्या १ ग्रॅ.पासून ४ किकॅ. उष्मांक मिळतात. मनुष्य आणि अन्य प्राण्यांमध्ये मेदांचे संश्लेषण आणि विघटन होते. मात्र काही मेद शरीरात तयार होत नसल्याने त्यांचा पुरवठा बाहेरून करावा लागतो. मेद संपूर्णपणे किंवा भागश: दोन भिन्न ‍प्रकारच्या जैविक एककांपासून बनलेली असतात; १. किटोॲसील गट. २. आयसोप्रीन गट. मेदांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारे केले जाते. या नोंदीत त्यांचे पुढीलप्रमाणे गट केलेले आहेत; १. मेदाम्ले आणि त्यांची अनुजाते २. ट्रायग्लिसराइडे (वसा व चरबी ) ३. मेणे ४. फॉस्फोलिपिडे ५. स्फिंगोलिपिडे आणि ६. आयसोप्रिनॉइडे.

१. मेदाम्ले : या गटात हायड्रोकार्बनची कमीअधिक शृंखला असलेल्या कारबॉक्सिलिक आम्लांचा समावेश होतो. या रेणूंच्या एका टोकाला कारबॉक्सिल (-COOH) गट असतो, तर दुसऱ्या टोकाला मिथिल (-CH3) गट असतो. निसर्गात मेदाम्ले सुटी आढळत नाहीत. ती सामान्यपणे ट्रायग्लिसराइडे किंवा फॉस्फोलिपीडे यांच्यापासून तयार होतात. मेदाम्लांतील कार्बन शृंखला ४–२८ कार्बनच्या अणूंपासून बनलेली असते. मेदाम्ले दोन प्रकारची असतात; असंपृक्त  आणि संपृक्त. ज्या मेदाम्लांत एक ‍किंवा अधिक दुहेरी बंध असतात, त्यांना असंपृक्त मेदाम्ले म्हणतात, तर ज्या मेदाम्लांत दुहेरी बंध नसतात त्यांना संपृक्त मेदाम्ले म्हणतात. मेदाम्लांतील कार्बन शृंखला ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा सल्फर अशा अणूंचा समावेश असलेल्या क्रियाशील (फंक्शनल) गटाशी जोडलेली असू शकते. मिरिस्टिक आम्ल, पामिटिक आम्ल, स्टिरीक आम्ल, अराकिडीक आम्ल, लिग्नोसेरिक आम्ल इ. संपृक्त मेदाम्लांची उदाहरणे आहेत. ओलेइक आम्ल, लिनोलिक आम्ल, अराकिडॉनॉइक आम्ल इ. असंपृक्त मेदाम्लांची उदाहरणे आहेत.

असंपृक्त मेदाम्लांमध्ये समसूत्रता (समघटकता) आढळते. अशा मेदाम्लांमध्ये दुहेरी बंधांच्या निकट असलेले H अणू एका बाजूला असल्यास त्याला अपार-समसूत्री (सिस-आयसोमर) आणि H अणू विरुद्ध बाजूला असल्यास त्याला पार-समसूत्री (ट्रान्स-आयसोमर) म्हणतात. पार असंपृक्त मेदाम्लांची रेणुशृंखला सरळ असते तर अपार असंपृक्त मेदाम्लांची रेणुशृंखला वाकलेली असते. जितके दुहेरी बंध जास्त तेवढा रेणुशृंखलेचा बाक अधिक असतो. पार मेदाम्ले निसर्गात आढळत नाहीत, ती मानवनिर्मित असतात. उदा. वनस्पती तेलांचे हायड्रोजनीकरण करून मार्गारीन बनवितात. या प्रक्रियेत ट्रान्स-फॅट (पार असंपृक्त मेदाम्ले) तयार होतात. वैद्यकीय संशोधनात असे आढळून आले आहे की ट्रान्स-फॅटच्या सेवनामुळे हृद्‌धमनी रोध होण्याचा धोका संभवतो.

असंपृक्त मेदाम्लांमध्ये दोन किंवा अधिक दुहेरी बंध असल्यास ते दुहेरी बंध बहुधा मिथिलीन (-CH2-) गटाने अलग झालेले असतात. अशा मेदाम्लांना बहुअसंपृक्त मेदाम्ले म्हणतात. ती शरीरात पुरेशा प्रमाणात तयार होत नसल्याने आहारातून पुरवावी लागतात. शरीरात संप्रेरकांसारखी महत्त्वाचे कार्य करणारी प्रोस्टाग्लॅंडिन ही संयुगे अराकिडॉनॉइक या असंपृक्त मेदाम्लांपासून संश्लेषित होतात.

२. ट्रायग्लिसराइडे : ग्लिसरॉल रेणू आणि मेदाम्लाचे तीन रेणू यांचा संयोग होऊन एस्टर गटातील संयुगे तयार होतात. त्यांना ट्रायग्लिसराइडे म्हणतात. त्यांच्यावर कोणताही प्रभार नसतो. निसर्गात आढळणाऱ्या ट्रायग्लिसराइडांमध्ये मेदाम्लांचे रेणू भिन्न असतात. मात्र मानवनिर्मित ट्रायग्लिसराइडांमध्ये मेदाम्लांचे तीनही रेणू सारखे असू शकतात.

बहुतेक ट्रायग्लिसराइडातील मेदाम्लांच्या संरचनेनुसार त्यांचे वसा (चरबी) ‍आणि तेले असे वेगवेगळे गट करतात. वसा ही सामान्य तापमानाला स्थायूरूप असते आणि तीत मोठ्या प्रमाणात संपृक्त मेदाम्ले असतात. तेले सामान्य तापमानाला द्रवरूप असतात आणि त्यांच्यात असंपृक्त मेदाम्लांचे प्रमाण अधिक असते. प्राण्यांमध्ये वसेद्वारे मेदाम्ले साठविली जातात आणि वाहून नेली जातात. वसा उष्णतारोधक असल्यामुळे थंड तापमानात ती शरीराचे संरक्षण करते. चरबी, लोणी, ऑलिव्ह तेल, सरकीचे तेल, जवसाचे तेल, खोबरेल तेल इ. ट्रायग्लिसराइडांची काही उदाहरणे आहेत.

३. मेणे : ही वनस्पतिजन्य व प्राणिजन्य प्रकारची असतात.बहुतेक मेणांमध्ये दीर्घ-शृंखलायुक्त मेदाम्ले व अल्कोहोले इ. घटक असतात. वनस्पतींची पाने, खोडे व फळे, तर प्राण्यांमध्ये त्वचा यांवर ती संरक्षणात्मक आवरण तयार करतात. कार्नोबा पाम या वृक्षाचे मेण, मधमाश्यांचे मेण इ.चा या गटात समावेश होतो. त्यांचा वापर बूट पॉलिश, कार पॉलिश, मेणबत्ती, लिपस्टिक इ. उत्पादने तयार करण्यासाठी करतात.

४. फॉस्फोलिपिडे (फॉस्फोग्लिसराइडे) : पेशीपटलांतील हे प्रमुख घटक आहेत. या रेणूंमध्ये फॉस्फरसचा अणू असणे, हा त्यांचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. फॉस्फोलिपिडांचे रेणू उभयधर्मी असतात: जलरोधी आणि जलकर्षी. जलरोधी भाग मुख्यत: मेदाम्लांच्या शृंखलेनी बनलेला असतो, तर जलकर्षी भाग हा फॉस्फेट व इतर प्रभारित गटांपासून बनलेला असतो. पेशीबाहेरील द्रव आणि पेशीतील द्रव यांमध्ये पेशीपटलातील फॉस्फोलिपिडे एक द्विस्तर तयार करतात. या द्विस्तराच्या दोन्ही बाजूस जलकर्षी भाग असतो आणि जलरोधी भाग पाण्यापासून दूर म्हणजे आतल्या बाजूस असतो. हा द्विस्तर अर्धपार्यपटलासारखे कार्य करतो. या पटलातून केवळ जलरोधी पदार्थ प्रवेश करू शकतात. याच द्विस्तरात प्रथिने व मेद (उदा. कोलेस्टेरॉल) असतात. पेशी संदेशन व चयापचय यांसाठी ही संरचना उपयुक्त असते. मेंदूसह चेता ऊतींमध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फोलिपिडे असतात. त्यांच्या अभावी चेतासंस्थेचे काही विकार उद्‌भवू शकतात.

५. स्फिंगोलिपिडे : ही स्फिंगोसीन या संयुगाची मेदाम्लांपासून बनलेली अनुजाते असतात. स्फिंगोसीन हे १८ कार्बन अणू असलेल्या, असंपृक्त दीर्घ-शृंखलेचे ॲमिनो अल्कोहोल आहे. प्राण्यांमध्ये स्फिंगोलिपिडे मेंदूपेशींच्या व चेतातंतूंच्या मायलिन आवरणात उच्च प्रमाणात असतात. पेशी संदेशन व पेशी ओळखण्याच्या क्रियेत ती महत्त्वाचे कार्य करतात. वनस्पतींच्या पेशीपटलात स्फिंगोलिपिडे असतात आणि ती पेशींतील जैविक प्रक्रियांच्या नियमनाचे महत्त्वाचे कार्य करतात. काही कवके व जीवाणू यांच्या पेशीपटलातही स्फिंगोलिपिडे आढळतात.

६. आयसोप्रीनॉइडे : या रेणूंमध्ये ५ कार्बनी एककांची आयसोप्रीन ही संरचना पुनरावृत्त होत असते. निसर्गात आढळणाऱ्या कार्बनी पदार्थांपैकी सु. ६०% पदार्थ आयसोप्रीनॉइडे असतात. सर्व वर्गाच्या सजीवांमध्ये आयसोप्रीनॉइडे आढळून येतात. आयसोप्रीनॉइडांमध्ये टर्पिने किंवा स्टिरॉइडे यांचाही समावेश होतो. टर्पिने मुख्यत: वनस्पतीच्या तेलांपासून मिळतात. स्टिरॉइडे ही हायड्रोकार्बनांपासून तयार झालेली वलयी व जटील संयुगे असतात.

टर्पिनांचे वर्गीकरण त्यांच्यात असलेल्या आयसोप्रीन एककांनुसार होतो. मोनोटर्पिनमध्ये दोन आयसोप्रीन एकके असतात. उदा., ऑईल ऑफ जिरॅनियम. तीन आयसोप्रीन एकक असलेल्या टर्पिनाला सेस्क्वीटर्पिन म्हणतात. उदा., साबणे व अत्तरांमध्ये वापरले जाणारे ऑईल ऑफ सिट्रोनेला. ४० पेक्षा अधिक आयसोप्रीन एकके असलेल्या रेणूला पॉलिटर्पिन म्हणतात. नैसर्गिक रबर हे पॉलिटर्पिन असून त्यात ३०००–६००० आयसोप्रीन एकके असतात. कॅरोटिनॉइडे (टेट्राटर्पिने) ही वनस्पती, कवके व जीवाणू यांमध्ये आढळतात. प्राण्यांमध्ये ती कमी प्रमाणात असतात आणि ती अन्नातून मिळविली जातात. ती प्रतिऑक्सिडीकारक म्हणून कार्य करतात. बीटा कॅरोटिन हे अ-जीवनसत्त्वाचे पूर्वगामी म्हणून महत्त्वाचे आहे. काही कॅरोटिनॉइडे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत सहभागी असतात. -जीवनसत्त्व, के-जीवनसत्त्व व काही सायटोकिनीने (वनस्पती संप्रेरके) इ. बिगरटर्पिन घटक आणि आयसोप्रीन गट यांनी बनलेले असतात. त्यांना मिश्र टर्पिनॉइडे म्हणतात.

स्टिरॉइडे ही ट्रायटर्पिनांची अनुजात संयुगे आहेत. सर्व दृश्यकेंद्रकी सजीव आणि काही मोजक्या जीवाणूंमध्ये ती आढळतात. प्रत्येक स्टिरॉइडमध्ये चार वलये असतात. या वलयांमधील कार्बन – कार्बन दुहेरी बंधाची जागा व क्रियाशील गटांची जागा यांनुसार ती ओळखली जातात. प्राण्यांमध्ये आढळून येणारे महत्त्वाचे स्टिरॉइड म्हणजे कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉलपासून टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन इ. संप्रेरके, ड-जीवनसत्त्व आणि सोडियम ग्लायकोकोलेट, सोडियम टॉरोकोलेट हे पित्त क्षार तयार होतात.

लिपोप्रथिने : लिपिड गट आणि कोणतेही प्रथिन यांपासून लिपोप्रथिने तयार होतात. रक्तद्रवातील लिपोप्रथिनांद्वारे ट्रायग्लिसराइडे, फॉस्फोलिपिडे आणि कोलेस्टेरॉल असे मेद पदार्थ एका इंद्रियापासून दुसऱ्या इंद्रियाकडे वाहून नेली जातात. लिपोप्रथिनांच्या घनतेनुसार त्यांचे अतिनिम्न, निम्न आणि उच्च असे वर्गीकरण केले जाते. वयोमानानुसार रक्तातील लिपोप्रथिनांचे प्रमाण बदलत असते. हृदयरोग व तत्सम आजारांमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइडे यांच्या प्रमाणाबरोबर लिपोप्रथिनांचे प्रमाण तपासतात. रक्तामध्ये अतिनिम्न घनता लिपोप्रथिने व निम्न घनता लिपोप्रथिने यांचे प्रमाण वाढलेले असेल, आणि उच्च घनता लिपोप्रथिनांचे प्रमाण कमी असेल तर ते धोक्याचे लक्षण मानतात.

मेदांच्या चयापचयात वसा, वसाम्ले व इतर मेद यांच्या चयापचयाचा अंर्तभाव होतो. पचनक्रियेत लायपेज या विकराद्वारे मेदाचे रूपांतर वसा आणि मेदाम्ले यांत होते. ग्लिसरॉल आणि कोलेस्टेरॉल यांचे रूपांतर ग्लिसरोफॉस्फेटमध्ये होते. ग्लिसरोफॉस्फेट हे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आणि ३-फॉस्फोग्लिसरालल्डिहाइड या संयुग स्वरूपात असते. ही संयुगे एकमेकांची समसूत्री आहेत. ग्लायकॉलिसिस अभिक्रियेतून त्यांचे पायरूव्हिक आम्लात रूपांतर होते. यात एटीपी निर्मिती होते. मेदाम्लांच्या अपचयात प्रथम त्यांचे ऑक्सिडीभवन होते. ऑक्सिडीभवनाला बीटा-कार्बनपासून सुरूवात होते. नूप या वैज्ञानिकाने वसाम्लांचे चक्रीय ऑक्सिडीभवन होते, हे सिद्ध केले. म्हणून त्याला नूपचे बीटा-ऑक्सिडीभवन म्हणतात. याद्वारे ॲसिटल-को-एंझाइम-ए रेणू तयार होतो. उदा., पामिटिक आम्लात कार्बनचे १६ अणू असतात. त्यापासून ॲसिटल-को-एंझाइम-ए चे ८ रेणू मिळतात. यासाठी बीटा-ऑक्सिडीकरणाची सात वेळा पुनरावृत्ती होते. या प्रक्रियेत एकूण १३० एटीपीची निर्मिती होते. ॲसिटल-को-एंझाइम-ए नंतर क्रेब्ज चक्रात प्रवेश करते व त्यापासूनही एटीपी निर्मिती होते. एटीपी या रेणूद्वारे पेशींमधील चयापचयासाठी लागणारी ऊर्जा पुरवली जाते. म्हणून त्याला पेशींचे ऊर्जा चलन म्हणतात.

दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये फॉस्फोलिपिडे ही पेशीपटल, तसेच पेशींच्या आतील पेशीअंगके यांच्याभोवती असलेले आवरण यांचा महत्त्वाचा घटक असतो. प्राण्यांमध्ये पेशीपटलामुळे आंतरपेशीय घटक पेशीबाहेरील घटकांपासून वेगळे असतात. मात्र फॉस्फोलिपिडे पेशीपटलातील मुख्य घटक असले, तरी बिगर- ग्लिसराइड मेद, जसे, स्फिंगोमायलीन, कोलेस्टेरॉल इ. स्टिरॉइडे पेशीपटलात असतात. वनस्पतींमध्येही काही ट्रायग्लिसराइडे असतात, ज्यांच्यात फॉस्फेट गट नसतो आणि ती तंतुकणिकांच्या आवरणातील महत्त्वाचे घटक असतात.

प्राणी आणि वनस्पती यांच्या मेद ऊतींमध्ये ट्रायग्लिसराइडे साठलेली असतात. ती महत्त्वाची ऊर्जास्रोत असतात. प्राण्यांच्या मेदपेशींमध्ये या ट्रायग्लिराइडांचे सतत संश्लेषण आणि विघटन चालू असते. मेदाम्लांच्या ऑक्सिडीकरणातून अन्य कोणत्याही अन्न घटकांपेक्षा अधिक उष्मांक उपलब्ध होतात. पेशी संदेशनामध्ये मेद महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांद्वारे कॅल्शियम आयनांची हालचाल होते, पेशींची वाढ होते, प्रजनन व चयापचय क्रियांसाठी लागणारी संप्रेरके तयार होतात. मेद शरीराला विशिष्ट आकार देतात. काही मेद मृत पेशींच्या भक्षणक्रियेत सहभागी होतात. यकृत आणि मेद ऊतींमध्ये साठलेली , , आणि के ही मेदविद्राव्य जीवनसत्त्वे पोषक घटक म्हणून निरनिराळी कार्ये करतात. मेदांच्या चयापचयात बिघाड झाल्यास अतिमेदोवृद्धी, वसार्बुद व काही इंद्रियात वसा साठणे इ. विकार उद्‌भवतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा