(इंडियन पॉर्क्युपाइन). स्तनी वर्गाच्या कृंतक गणात या प्राण्याचा समावेश होतो. त्याला सायाळ, साळ, साळू असेही म्हणतात. कृंतक गणात एरेथीझोंटिडी व हिस्ट्रिसिडी ही दोन कुले साळींदराची आहेत. जगात त्यांच्या सु. २९ जाती आहेत. एरेथीझोंटिडी कुलातील साळींदरे उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथे आढळतात. ती झाडावर राहतात व त्यांना ‘नवीन जगातील साळींदरे’ म्हणतात. हिस्ट्रिसिडी कुलातील साळींदरे आशिया, यूरोप व आफ्रिका येथे राहतात; ती जमिनीत बिळे करून राहतात. त्यांना ‘जुन्या जगातील साळींदरे’ म्हणतात. शरीरावरील राठ व टणक पिच्छदंड (क्विल) हे साळींदराचे वैशिष्ट्य मानले जाते. भीतीदायक परिस्थितीत संरक्षणासाठी शरीरावरचे हे पिच्छदंड ताठ होतात. भारतात साळींदर सर्वत्र आढळत असून भारतात साळींदराची हिस्ट्रिक्स इंडिका असे शास्त्रीय नाव असलेली जाती आढळते. अफगाणिस्तान, चीन, इराण, टर्की या देशांपासून भारत, श्रीलंका यांदरम्यानच्या देशांत साळींदराची ही जाती दिसून येते. पुढील वर्णन मुख्यत्वे भारतात आढळणाऱ्या साळींदराचे आहे.

साळींदर (हिस्ट्रिक्स इंडिका)

पूर्ण वाढलेल्या साळींदराची लांबी ७०–९० सेंमी. व शेपटी ८–१० सेंमी. लांब असते. पाय रुंद असून नख्या लांब असतात. जमीन उकरण्यासाठी तो नख्यांचा वापर करतो. संपूर्ण शरीर काटेरी पिच्छदंडांनी आच्छादलेले असते. हे पिच्छदंड केसांचे रूपांतर असून केसासारखेच केरॅटिनपासूनच बनलेले असतात. पिच्छदंडावर तपकिरी व पिवळसर पांढरे असून प्रत्येक पिच्छदंड त्याच्या मुळाशी स्नायूंना जोडलेले असतात. ते साधारणपणे १५–३० सेंमी. लांब असतात आणि सु. ५० सेंमी.पर्यंत लांब वाढू शकतात. खांदा व पाठ या भागातील पिच्छदंड सु. २० सेंमी. लांब, टणक व दाट असतात. शत्रूवर हल्ला करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. शेपटीवर असलेले पिच्छदंड आखूड व पांढरे असतात. साळींदर कधीही पिच्छदंड फेकत नाही. मात्र शत्रूला सूचना देण्यासाठी शरीरावरच्या लांब व पोकळ पिच्छदंडांनी तो आवाज काढतो.

साळींदर सामान्यपणे खडकाळ टेकड्या, झुडपे, गवताळ जागा, वने, मळे अशा निरनिराळ्या ठिकाणी राहतो. मुळे, फळे, धान्य, कीटक, लहान पृष्ठवंशी प्राणी इ. तो खातो. पिच्छदंडांची वाढ होण्यासाठी तो हाडे व शिंगे चघळतो. तो निशाचर असून दिवस बिळात घालवतो. मात्र अधूनमधून ऊन खाण्यासाठी तो बिळाबाहेर पडतो. यावेळी संपूर्ण वेळ तो अन्न शोधतो; परंतु अन्नासाठी खूप दूर न जाता बिळाच्या आजूबाजूचा परिसर धुंडाळतो. तो वर चढू शकत नाही किंवा त्याला उडी मारता येत नाही. त्यामुळे तो जमिनीवर किंवा जमिनीखाली राहतो. तो उत्तम पोहतो. लांडगा, तरस, वन्य मांजरे, वन्य कुत्रे आणि मानव हे त्याचे शत्रू आहेत.

साळींदराचा फेब्रुवारी ते मार्च हा प्रजननकाळ असतो. गर्भावधी सु. २४० दिवसांचा असतो. मादी एकावेळी दोन-चार पिलांना जन्म देते. जन्माला आलेल्या पिलांच्या शरीरावर मऊ व लहान पिच्छदंड असतात, जे जन्मानंतर काही तासांत टणक होतात. पिले व नर-मादी एकत्रच वर्षभर बिळात राहतात. साधारणपणे दोन वर्षांत पिले प्रौढ होतात. आयु:काल त्यांचा निश्चित माहीत नसला, तरी एक मादी सु. २७ वर्षे जगल्याची नोंद आहे. साळींदर अन्नासाठी पिकांची नुकसान करीत असल्याने त्यांना उपद्रवी समजले जाते; परंतु बिया व परागकण यांचा प्रसार त्यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर होतो. साळींदराचे मांस रुचकर असल्याने त्याची हत्या होत असे; पण आता साळींदराच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.