कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्यासंबंधी माहिती मिळविणे, संकलित करणे व त्याचे वर्णन करणे, या तंत्राला पृथ्वीवरील दूरस्थ संवेदन म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या निरीक्षणासाठी विमाने व कृत्रिम उपग्रह यांचा दूरस्थ संवेदनासाठीची साधने म्हणून उपयोग केला जातो. कृषिक्षेत्र, जलस्रोत, वन आणि पारिस्थितिकी, खनिज उद्योग, मत्स्योद्योग व सागरी व्यवस्थापन, संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत या तंत्राचा वापर केला जातो.

२००९ सालामध्ये घेतलेल्या दूरस्थ संवेदन चित्रावरून भारतातील भूजल उपशाची स्थिती

अवकाशातील कृत्रिम उपग्रहांमार्फत सर्वरंगसंवेदी (पॅनक्रोमॅटिक) कॅमेऱ्याच्या साहाय्याने पृथ्वीच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेऊन त्या छायाचित्रांचे वेगवेगळ्या बाबींसाठी उपयोजन करणे हे एक दूरस्थ संवेदन तंत्र आहे. ही छायाचित्रे दूरसंवेदी उपग्रहांमार्फत घेतली जातात. या कॅमेऱ्यांची वियोजन शक्ती अधिक असल्यामुळे छायाचित्रे स्पष्ट येतात आणि मिळालेल्या माहितीचे विश्लेषण अचूक करता येते. तसेच रात्रीच्या काळोखातही घेतलेली छायाचित्रे स्पष्ट असतात. विशेष म्हणजे या तंत्राद्वारे भूतकाळातील पर्यावरणासंबंधी माहिती मिळविता येते. उदा., दक्षिण ईजिप्तमधील सहारा वाळवंटाच्या भागात घेतलेल्या छायाचित्रांवरून असे लक्षात आले आहे की, एके काळी त्या भागातील हवामान आर्द्र होते.

एखाद्या प्रदेशाचे सर्वेक्षण करण्यासाठी दूरस्थ संवेदन हे एक प्रभावी आणि अचूक तंत्रज्ञान आहे. दूरस्थ संवेदनामुळे विश्वसनीय व अचूक माहिती त्वरित मिळते. ही माहिती सतत अद्ययावत करता येत असल्यामुळे अत्यंत सूक्ष्म कालावधीमध्ये झालेले बदलदेखील या तंत्राच्या साहाय्याने नोंदविले जातात.

भारतामध्ये दूरस्थ संवेदनासाठी स्वदेशी-तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या भारतीय दूरस्थ-संवेदी उपग्रहांचा (इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट) वापर केला जातो. हवामानासंबंधी माहिती, पिके, वने आणि पूर व भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती यांची माहिती अचूक व तत्परेतेने मिळत असल्यामुळे आणि माहितीचे संस्करण व विश्लेषण लवकर होत असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी व पीक नियोजनासाठी या तंत्राची मदत होत आहे. भारताच्या अवकाश संशोधन संस्थेकडून विविध क्षेत्रांसाठी विशेष उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. भूगोल या विषयाची व्याप्ती पाहता त्याच्या अभ्यासासाठी अशा तंत्राचा वापर करणे आवश्यक ठरले आहे. भारतीय दूरस्थ संवेदी उपग्रह प्रणालीची सुरुवात १७ मार्च १९८८ रोजी झाली.

भारतीय दूरस्थ संवेदी उपग्रह सु. ९०४ किमी. उंचीवर, ध्रुवसमीप आणि सूर्यानुगामी असलेले कृत्रिम उपग्रह आहेत. त्यांची कक्षा उत्तर-दक्षिण, ध्रुवीय व वर्तुळाकार असते. हे कृत्रिम उपग्रह कमी उंचीवर असल्यामुळे त्यांनी घेतलेली छायाचित्रे अधिक स्पष्ट असतात.

इन्सॅट मालिका : भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली ही बहुद्देशीय उपग्रह प्रणाली आहे. दूरसंचार, हवामान अंदाज व निरीक्षणे करणे, त्यांचे सांख्यिकी संकलन करणे, आकाशवाणी-दूरदर्शनचे राष्ट्रव्यापी प्रसारण करणे, माहितीची प्रस्तुती करणे आणि नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देणे इत्यादींसाठी या कृत्रिम उपग्रहांचा वापर करतात.